कास ध्येयाची

मित्रांनो, मागच्या लेखात आपण अभ्यासाला बसायची जागा कशी असावी? कुठे असावी? हे काही मुद्दे बघितले. मला खात्री आहे की, तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरातील आपली अभ्यासाची जागा निश्‍चित केली असेल.

मुलांनो, अभ्यास कुठे करायचा? हे आपलं ठरलं. आता अभ्यास का करायचा? किती करायचा? कधी करायचा ? आणि कसा करायचा? याचा विचार आपण पुढच्या काही लेखांंत करणार आहोत.

समजा, मी तुम्हाला म्हटलं की, हा लेख वाचता वाचता उठा, पुणे स्टेशनवर जा आणि जी गाडी मिळेल त्या गाडीत बसा आणि प्रवास करा... हसलात ना? रश्मीताई हे असं काय एकदम सांगायला लागलीस? असं कसं आम्ही कोणत्याही गाडीत बसू? आणि नेमकं कुठं जायचंय, का जायचंय हे माहीत नसल्याशिवाय आम्ही जाऊ तरी कसे?...

अगदी बरोबर विचार केलात मुलांनो तुम्ही.असेच प्रश्न तुम्हाला पडले पाहिजेत. म्हणजेच प्रत्येक कृतीचा हेतू आणि उद्दिष्ट जर ठरलं असेल तर ती कृती जास्त नेमकेपणाने आणि परिणामकारक होते. हे आता तुम्हाला पटलं असेल.

आता हेच तत्त्व आपण आपल्या अभ्यासाबाबत जोडू या. मला अभ्यास का करायचाय? असा प्रश्न स्वत:ला विचारा आणि त्याचं उत्तर एका कागदावर लिहून काढा. हे उत्तर म्हणजे तुमच्या अभ्यास करण्याच्या कृतीचा ‘हेतू’ आहे. आता पुढचा प्रश्न म्हणजे माझा हा हेतू साध्य होण्यासाठी मला किती गुण मिळवायचे आहेत? प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुमचे ध्येय असेल.

एकदा अभ्यास कौशल्यांची कार्यशाळा घेताना मी मुलांना विचारंल की, 10वीला किती टक्के गुण मिळावेत असं तुम्हाला वाटतं? तेव्हा एकाने उत्तर दिलं, पास झालो तरी खूप आहे. (त्याला 9वीत 50% गुण होते.) दुसर्‍यानं उत्तर दिलं 80 ते 85% (त्याला 9वीत 70% गुण मिळाले होते.) तर तिसर्‍याने उत्तर दिले, 95%च्या वर (ह्याला 9वीत 60% गुण मिळाले होते.)

आता बघा हं मुलांनो, पहिल्या मुलाला 9वीत असताना 50% गुण मिळाले होते तर त्याचं नुसतं पास होण्याचं ध्येय हे अगदीच सहजसाध्य आहे. तिसर्‍या मुलाला 9वीत 60% गुण मिळाले आहेत, पण त्याचं ध्येय 95%च्या वर आहे. म्हणजे त्याला 35% ची भर म्हणजे जवळपास 210 मार्क (6 गुणांचा 1% धरल्यास) जास्त मिळवावे लागतील की, जे जवळजवळ असाध्य आहे; पण दुसर्‍या मुलाच्या ध्येयाचा विचार केल्यास 70% 9वीत मिळालेले असताना वर्षभर नियमित अभ्यास करून 10-15%ची वाढ त्याच्या टक्केवारीत नक्की होऊ शकते. म्हणजेच या दुसर्‍या मुलाचं ध्येय कष्टसाध्य आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. या तीनही उदाहरणांवरून तुमच्या काय लक्षात येतंय? तर जे शक्य आहे, तुमच्या क्षमतेच्या आवाक्यात आहे असं ध्येय ठरवल्यास ते साध्य होण्याची शक्यता नक्कीच वाढते. अगदीच सोपं किंवा खूपच अवघड या दोन्ही टोकाचं ध्येय ठरवल्यास यश आणि समाधान याचं गणित काही फारसं जुळत नाही बरं का.

चला, तर मग आता आपण स्वत:चे ध्येय ठरवू या. हे ठरवताना पुढील मुद्द्यांचा काळजीपूर्वक विचार करू या.

1) ध्येय नेहमी ‘कष्टसाध्य’ असावे.

2) एकदा मोठे ध्येय ठरविल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी छोटी छोटी ध्येय ठरविणेही हिताचे असते.

3) ध्येय हे नेमके असावे.

4) ध्येय मोजता येणारे असावे. (मला चांगले गुण मिळवायचे आहेत ऐवजी मला 85% मिळवायचे आहेत असे म्हटल्यास ध्येय अधिक स्पष्ट होते.)

5) आपल्या क्षमतेनुसार जे साध्य होणार आहे, असेच ध्येय ठरवावे.

6) ठरवलेले ध्येय वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने वेळेचे नियोजन करावे.

7) त्यासाठी कामांचा प्राधान्यक्रम ठरवावा.

8) एकदा ध्येय ठरवल्यानंतर ते सतत आपल्या डोळ्यांसमोर असावे. त्याचा विसर पडता कामा नये.

9) ध्येय काही प्रमाणात लवचीकही असावे.

10) ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे।’ हा सुविचार लक्षात ठेवून ध्येयाचा सतत पाठपुरावा करावा.

मुलांनो, एकदा का ध्येयाची कास धरली की अभ्यासाची पुढील वाटचाल खूपच सोपी असते, तेव्हा विचारपूर्वक ध्येय ठरवा आणि मनापासून ते पूर्ण करा. तुम्हाला योग्य आणि वास्तव ध्येय ठरवण्यासाठी मनापासून शुभेच्छा!

अभ्यास कसा करायचा यासंबंधातील ही लेखमाला नक्की वाचा.

 अ अ अभ्यासाचा : मी अभ्यास करू तरी कुठे?

- रश्मी पटवर्धन

 [email protected]