मायेची लेकरं..

दिंनाक: 13 Sep 2017 16:04:08

सकाळची वेळ होती, त्यात पावसाची रिपरिप चालू होती आणि या सर्वांत मुलींची लगबग सुरू होती. कार्यक्रमाला अजून ५ दिवस बाकी होते, पण मुलींना कार्यक्रमाचे नियोजन करण्याची घाई लागली होती. दर वर्षीप्रमाणे यंदाही हा दिवस आपल्या सर्वांसाठी कायम स्मरणात राहील असा साजरा करायचा असं मुलींनी मनाशी पक्क ठरवलं होतं. उणीव होती ती फक्त सर्वांच्या लाडक्या सुप्रिया बाईंची.. 
  सुप्रिया बाई सर्वांच्या आवडत्या, उत्साही, प्रेमळ आणि शाळेच्या सर्वच कार्यक्रमात आनंद भरणाऱ्या.. दर वर्षी त्याच सर्व नियोजन करून देत. मुलींना सारं हसत खेळत समजावून सांगत.. आज प्रकर्षाने मुलींना त्यांची आठवण येत होती.. या दिवशी आपल्या लाडक्या मॅडम नाही ही कल्पनासुद्धा त्यांना करवत नव्हती.. पण काय करावं हे कुणालाही सुचेना.. गेल्या चार महिन्यांपासून सुप्रिया मॅडम रजेवर होत्या.. नऊ महिने पोटात सांभाळलेल्या बाळाचं जगात येण्याआधीच सोडून जाणं हे दुःख त्यांना पेलवत नव्हतं.. आणि तेव्हापासून त्या अंथरुणाला खिळल्या होत्या.. मुलींना त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं खूप वाटायचं पण मॅडम माहेरीच असल्याने तिथे जाणं कठीण होतं.. पण त्याच्या आठवणीने साऱ्या मुलींचे डोळे पाणावले होते. कार्यक्रमास कुठल्याही परिस्थितीत त्यांना शाळेपर्यंत आणायचं मुलींनी ठरवलं आणि सुरू झालं दुसरं मिशन.. 
  वर्षाच्या बाबांची रिक्षा होती. तिने बाबांना मनवून बाईंच्या माहेरगावी ५-६ जणींनी जायचं ठरवलं.. सर्वांनी आई-बाबांची परवानगी काढली. आणि निघाल्या.. पोहोचताच सर्व बाईंच्या बेडजवळ गेल्या. 'आताच डोळा लागलायं' असं त्यांच्या आई सांगत होत्या, पण मुलींची कुजबुज ऐकताच बाईंचे डोळे उघडले त्याच क्षणी साऱ्या बाईंना बिलगल्या.. किती दिवसांनी आज साऱ्या भेटल्या होत्या.. बाईंच्या डोळ्यात अश्रूंचा जणू पूर वाहत होता.. थोड्या वेळात सारं शांत झालं आणि मुलींनी विषय काढला, "बाई, यंदाच्या कार्यक्रमाला तुम्हाला यावेच लागेल.." " प्लीज मॅडम या ना!!" चिमुकली नेहा सांगत होती.. मुलींचा इतका आग्रह पाहून बाईंनी होकारार्थी मान डोलावली. खूप साऱ्या गप्पा झाल्यावर मुली निघाल्या आणि जाताना म्हणाल्या, "तुमच्याविना शाळेत खूप सुनं सुनं वाटतय प्लीज या ना.." 
  बाईंनी येण्याचं कबुल केल्यामुळे मुली आणखी उत्साहाने तयारीला लागल्या. अखेरीस दिवस उजाडला.. साऱ्या चिमुकल्या सजून नटून आल्या होत्या.. सुप्रिया बाईंना काय काय सरप्राईज द्यायचं सारं ठरलं होतं... फक्त त्यांच्या येण्याचा उशीर होता..
बाई गेटमध्ये दिसताच साऱ्या मुली त्यांना घ्यायला धावल्या..  हात धरून बाईंना शाळेत आणलं.. आज सुप्रिया बाईंना सारी शाळा निराळीच वाटत होती. बाळाच्या जाण्याच्या दुःखाने त्या किती दिवसात घराबाहेरही पडल्या नव्हत्या, पण मुलींच्या भेटीने त्यांना जणू बळ दिले होते.. बाई मुलींसोबत थोडं चालून वर्गाकडे आल्या.. दारात असलेल्या मुलींनी फुलांचा वर्षाव करत बाईंचे स्वागत केले.. आत शिरताच साऱ्या जणींच्या स्वागतगीताने बाई मोहरून गेल्या.. त्यांना खूप रडावंस वाटलं, डोळ्यातून भराभर अश्रू वाहू लागले.. हे अश्रू होते, इतके दिवस या चिमुकल्यांना मुकल्याचे.. सर्वांनी बाईंना वेगवेगळे गिफ्ट आणले होते. बाईंचं जंगी स्वागत झालं होत.. त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. लहानगी श्वेता बाईंच्या कुशीत येऊन बसली आणि गालावरचे अश्रू पुसत म्हणाली, "बाई तुम्ही रडू नका, आम्ही पण तुमची लेकरेच आहोत ना.. प्लीज आमच्यासाठी तरी रोज शाळेत या ना आता.." तिचे बोलणे ऐकून साऱ्याच जणी बाईंना विनवू लागल्या.. आज बाईंच्या अंगात निराळीच शक्ती आली होती.. मुलींचं प्रेम पाहून त्या जणू दुःखातून बाहेर आल्या होत्या.. 
बाईंनी उद्यापासून रोज येण्याचं ठरवलं आणि मुलींच्या उत्साहाला पारावार राहिला नाही.. आज कसला कार्यक्रम हे बाईंना आता कळलं होत.. शिक्षकदिनाची ही अनोखी भेट होती..  आणि खऱ्या अर्थाने या मुलींनी शिक्षकदिन साजरा केला होता.. बाईंना ही सारी मायेची लेकरं परत मिळाली होती....
 
- भाग्यश्री शिंदे