प्रकल्प समजून घेताना
"आई, आज इतिहासाच्या टीचरनी 'लाल, बाल आणि पाल' या विषयावर प्रोजेक्ट करायला दिला आहे. दीड महिन्यात तो तयार करून टीचरना द्यायचा आहे. यंदाच्या इतिहासाच्या प्रदर्शनात हे प्रोजेक्ट ठेवणार आहेत. म्हणून तुझी आणि बाबांची मदत लागेल मला. बाकीच्या इतर प्रोजेक्टसाठी मदत नाही करत तुम्ही पण यासाठी तरी कराच" च वर जरा जास्त जोर देऊन फर्मानवजा आदेश देऊन लेक निघून गेली.
 
खरं तर असे माहिती संकलनाचे प्राथमिक धडे शालेय विद्यार्थ्यांना मिळावेत यासाठी हल्ली अनेक शाळांमधून असे विविध उपक्रम राबविले जातात. सुरुवातीला इतर पालकांप्रमाणे आम्हीच तिचे हे प्रकल्प पूर्ण करून द्यायचो. पण आई-बाबा आपल्या लेखांसाठी, अभ्यासासाठी संदर्भ कसे शोधतात, कुठून शोधतात, यासाठी पुस्तके, ग्रंथ, वाचनालय, वृत्तपत्र यांची मदत कशी घेतात हे ती सतत बघत असल्याने खूप लहान वयातच स्वतंत्रपणे तिने प्रकल्प बनवायला सुरुवात केली होती.
 
लाल, बाल, पाल या प्रकल्पासाठी लाला लजपत राय आणि बाळ गंगाधर टिळक यांची माहिती जितकी सहज उपलब्ध होती तितकी बिपिनचंद्र पाल यांच्यावर नव्हती. पण त्यासाठी गुगल नावाच्या जादूगाराची मदत शक्यतो घ्यायची नाही असाच तिचा विचार होता. त्यामुळे शाळेतील वाचनालय, तिची स्वतःची लायब्ररी, जुनी वर्तमानपत्रे यांची मदत घेऊन तिने हा प्रकल्प पूर्ण केला. त्यामुळे इतरांपेक्षा तो अतिशय वेगळा ठरला.
 
खरं तर माहिती संकलन हा ज्ञान मिळवण्याचा म्हणजे आपण जे शिकतो त्याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. पण त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी हवी. हल्ली अनेक मराठी वर्तमानपत्रांतून आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये घडणार्‍या घडामोडींसंदर्भात माहिती, वृत्त, लेख प्रकाशित होतात. आपल्या आवडीनुसार त्या त्या विषयासंदर्भातील बातम्या, रेखाचित्रे, छायाचित्रे गोळा करून तारीखेनुसार एका वहीत चिकटवून ठेवा. ही माहिती मिळाल्यानंतर तिचं वर्गीकरण, विश्लेषण करून नंतर तुमचं त्यावरचं मत खाली नोंदवून ठेवा. सध्या पावसाचा मोसम आहे त्यामुळे पर्जन्यमान, तापमान, रोज पडणारा पाऊस, पावसाचा प्रवास, इतर घटकांचा पावसावर होणारा परिणाम, कमी दाबाचा पट्टा असे असंख्य लहान मोठे विषय आपल्या आवडीनुसार निवडता येतील. पण या संपूर्ण प्रकल्पात आपल्या पालकांची भूमिका फक्त मार्गदर्शनापुरतीच घ्यायची. 
 
हल्ली इंटरनेटच्या मदतीने कोणतीही माहिती क्षणार्धात आपल्यासमोर येते. अशा वेळी कशाला हा एवढा पसारा घालायचा? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण विषय समजून घेत त्यावरून अभ्यास करणं आणि गाईडवरून अभ्यास करणं असा जो फरक आहे तोच फरक अशा प्रकारच्या प्रकल्पांमध्ये आहे. यातून तुमची विविध विषयांवरची उत्सुकता वाढेल, संशोधनाची सवय लागेल, मुख्य म्हणजे स्वतः मेहनत केल्यानंतर तयार होणारे हे प्रकल्प तुम्हालाच समाधान देणारे असतील हे नक्की! 
 
- आराधना जोशी