भाषा संस्कार

‘नवनिर्मिती ही सुरुवातीला गरजेची जननी असते.’ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असं सांगता येईल की, थंडी वाजायला लागली की, आपण उबेची निर्मिती करतो. भूक लागली की अन्नाची सोय करतो, वातावरणातल्या विविध बदलांना निरोगीपणे तोंड देता यावं यासाठी घराची निर्मिती करतो.

आता अगदी महत्त्वाच्या गरजेकडे जाऊयात. ‘व्यक्त होणं’.. माणूस हा समूहानं राहणारा प्राणी आहे. त्याचं ‘प्राणीपण’ हे त्याला लाभलेल्या ‘बुद्धिमत्ता’ या एक वेगळ्या गुणधर्मामुळे नाहीसं होतं. बुद्धिमत्तेचा वापर करून असंख्य गोष्टींचे त्यानं शोध लावले, प्रगती केली. आता तुम्ही म्हणाल की, ‘भाषिक संस्कार’ या विषयासाठी हे जूनच आणि प्राथमिक पोथीपुराण कशाला? तर याचं उत्तर असं आहे, की भाषेची निर्मिती हीसुद्धा गरजेतूनच झाली. व्यक्त होणं ही माणसाची पोटाच्या भूकेनंतर सर्वांत महत्त्वाची गरज आहे. किंबहुना ती तशी मानली जाते.

अगदी जन्मकाळापासून या मुद्द्याचा विचार केला तर, आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतात. मूल जन्माला येतं तेव्हा ज्या परिसरात जे जन्माला आलंय, आजुबाजीची परिस्थिती हे सगळंच त्याच्यासाठी खूपच नवीन असतं, अनाकलनीय असतं, ओत्सुक्याचं असतं. जसजशी वाढ होत जाते तसतसं जवळचं, आजूबाजूचं वातावरण ओळखीचं व्हायला लागतं. आई, बाबा, आज्जी, आजोबा यांच्या तोंडातून निघणारे उच्चार, हावभाव ओळखीचे व्हायला लागतात आणि ते उच्चार, हावभाव ते लहान मूल आत्मसात करायला लागतं. हळूहळू त्याच्यावर किंवा तिच्यावर भाषिक संस्कार व्हायला लागतात, मग ते मूल अवयवांच्या वृद्धीनुसार हावभाव बघून स्वरयंत्राचा वापर करून, बा, बा बोलायला लागतं. आपल्याला वाटतं, अरे आमचं मूल ‘बाबा’ बोलायला लागलं मग आपण कोणत्या व्यक्तीला बाबा बोलायचं ते सांगतो, मग आई, ताई, दादा, आज्जी, आजोबा असे अनेक स्वतःच्या परिभाषेतले शब्द वापरून भाषिक संस्काराचा पाया रचला जातो.

आता हा जो भाषेचा संस्कार मुलाच्या मनावर, बुद्धीवर आंपण करतो तो कसा करावा याकडेही कटाक्षानं लक्ष दिलं तर ही शिदोरी कायमची संस्काररूपानं आयुष्यभर आपली सोबत पुरवते. यासाठी मुलं अगदीच लहान असताना शक्य असल्यास मुलांना वेगवेगळी स्तोत्र, श्लोक ऐकावेत. त्या लयबद्ध कठीण शब्दांची कानांना ओळख करून द्यावी मग हळूहळू हेच छोटेछोटे श्लोक आपण त्यांच्यासोबत गप्पा मारतानाच्या वेळेत अथवा मूल झोपण्याआधी आपण बोलून त्यांना ऐकावेत म्हणजे मग इतकं जवळचं माणूस जेव्हा असे संस्कार स्वमुखाने करत असतो, तेव्हा ते त्या बालकाला अधिक विश्वसनीय वाटून ते त्याच्या मनःपटलावर कोरले जातात कारण लहान अगदी लहान असताना घर, घरातली माणसं, त्यांचे बोलणे, घरातले वातावरण ही त्या बालकाची शाळेआधी शिकवणी असते.

मुलं घरातून बाहेर पडून शाळेच्या समूहात प्रवेश करतात तेव्हा एक वेगळं विश्व त्याच्या बालपणाला जोडलं जातं शाळेतल्या शिक्षकांव्यतिरिक्त आजूबाजूच्या मुलांकडूनही ते मूल बऱ्याचशा भाषिक गोष्टी आत्मसात करू लागतं, ज्या एकतर चांगल्या असतील अथवा वाईट. परंतु जर मूल घराची हद्द ओलांडून शाळेत जाण्याआधीच आपण त्याची भाषेची घडी व्यवस्थित बसवली तर ते मूल सहसा वाईट संस्कारांकडे वळताना दिसत नाही. पण ज्या पालकांना असं वाटतं की, ‘शिकेल शाळेत जाऊन’ त्या मुलांवर वाईट भाषिक संस्कार लगेचच पकड घेतात.

हल्ली ऐकवणं हे विविध माध्यमांतून होत असतं. कान तीक्ष्ण करणे हे भाषिक संस्कारचं मूळ आहे. चांगलं ऐकलं की चांगलं बोलणं हे तितकंसं कठीण राहत नाही. त्यामुळे श्लोक, स्तोत्र व्यतिरिक्त गाणीही बालमनाला अधिक चांगल्यारीतीनं घडवतात तसं पाहायला गेलं तर गाण हे प्रत्येक वयासाठी असतं, पण बालवयापासून गाणी, गाण्यातले भाव, त्यातले हळुवार शब्द मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत मोलाचं काम करतात पण हल्ली मात्र याविरुद्ध चित्र पाहायला मिळतं. अगदी चालता-बोलता न येणाऱ्या मुलांना मनोरंजनासाठी आपण टीव्हीवरचे वेगवेगळे कार्टून्सचे चॅनल लावून देतो. ती मुलंही अगदी चुंबकाप्रमाणे न हलता तहानभूक हरपून, डोकं बंद करून ती समोर हलणारी चित्र आणि मागून दिलेले बऱ्याचदा आक्रस्ताळे आवाज ऐकत असतात. त्यामुळे पुढे जेव्हा ती बोलायला  लागतात ना तेव्हा त्यांच्या डोक्यात त्या प्रतिमा फ़िक्स बसलेल्या असतात त्या त्यांच्या संवादासकट. 

घरी सर्रास एखादी भाषा बोलली जाते आणि साहजिकच ती मातृभाषा असते. मूल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊ लागलं की सुरुवातीला थोडं थोडं इंग्रजी, मग हिंदी, घरी मराठी आणि टीव्हीवरचं कार्टून हिंदी भाषेतून अशी डोक्यात भाषेची सरमिसळ व्हायला लागते, अशा वेळी त्यांना या तीन भाषा वेगवेगळ्या आहेत आणि आपण त्या वेगळ्या ठेवल्या तर त्या स्वतंत्र राहू शकतात. हवी तेव्हा हवी ती याचा आपण वापर करू शकतो, याचं भान किंबहुना ज्ञान नसतं. अशा वेळी ते भान त्यांच्या डोक्यात आपण जागृत करून द्यायचं. प्रत्येक भाषेचं महत्त्व, त्याचा वापर, त्याचा वेगळेपणा शिवाय हरेक भाषेतलं चापल्य या सगळ्याचं बाळकडू लहानपणीच पाजलं गेलं तर मूल कोणत्याही भाषेत शिक्षण घेवो, कोणत्याही भाषेत टीव्हीवरचे कार्यक्रम बघो ते त्या प्रत्येक भाषा वेगळ्याच ठेवत असतं.

संवादाबरोबरच मराठीतली मुळाक्षरं इंग्रजीतले Alphabets यांचा हेतुपुरस्पर योग्य उच्चार मुलांना करून दाखवला पाहिजे, जेणेकरून ‘कठीण’च्या ऐवजी  ते कठीन किंवा कथीन म्हणणार नाहीत ‘आणि’च्या ऐवजी ते आनी म्हणणार नाहीत किंवा हिंदीतला ‘पानी’ हा उच्चार ते मराठीतही तसाच करणार नाहीत.

 बऱ्याचदा पालकांची, ‘माझा मुलगा ना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातो, त्यामुळे हिंदी मिश्रित मराठी बोलतो, त्यासाठी काय करावं’, ही तक्रार असतेच. आधी सांगितलेले उपाय नेहमी अंगिकारले तर मुलांच्या बाबतीतल्या या भाषिक अडचणींवर नक्कीच मात करू शकू.

सध्याचं युग हे स्पर्धेचं आहे आणि आपलं मूल सगळ्यात अग्रेसर असावं असं आपल्या सर्वच पालकांना वाटत असतं. त्यासाठी एकदम ओझं न लादता, सुरुवातीपासूनच संस्काररूपी अभ्यास जर का सहज चालता बोलता घडवून आणला तर मुलांनाही त्याचा आनंद निश्चित मिळेल आणि भाषारूपी बिजाचं रोप, झाड आणि मग वटवृक्ष होईल.

- माधवी राणे

[email protected]