नमस्कार मित्रहो, मागील लेखांमध्ये आपण खगोलशास्त्राची तोंडओळख करून घेतली, त्याचप्रमाणे आकाशापासून सुरुवात करण्यासाठी आपले स्थान कसे निश्चित करावे यासंबंधी सुद्धा माहीत करून घेतली. आता सदर लेखात आपल्याला आकाशातील दूरदूरवरील अंतरे कशी मोजायची आणि त्यासाठी कोणती पद्धती वापरतात ते पाहायचे आहे.

आपणास ठाऊकच आहे की, या विश्वाचा पसारा किती प्रचंड आहे ते! त्यामुळे तुम्ही आम्ही वापरत असलेली एकके जसे की, मीटर्स, किलोमीटर्स, इ. ही त्या ठिकाणी निकामी ठरतात. याचं सोप्प उदाहरण म्हणजे की, आपला चंद्र आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर हे सुमारे सुद्धा ३ लक्ष ८० हजार किलोमीटर्स इतकं प्रचंड आहे. त्यामुळे जे तारे किंवा इतर आकाशगंगा आपल्यापासून फार दूर आहेत, त्यांची अंतरे मोजणं तर फारच कठीण!

यावर उपाय म्हणून शास्त्रज्ञांनी एक सोप्पा उपाय शोधून काढला. या जगात सर्वात वेगवान वस्तू कोणती असं विचारलं असता आपण पटकन उत्तर देतो की “प्रकाश”, त्यामुळे शास्त्रज्ञांनी या प्रकाशाच्या वेगाच्या प्रमाणात अंतरे मोजायला सुरुवात केली. ही बाब समजायला थोडी किचकट आहे, पण आपण ती सोप्पी करूयात. लहानपणी आपण काळ, काम आणि वेगाची गणितं नक्कीच सोडवली असतील. त्या गणितांमध्ये कोणत्याही दोन गोष्टी आपणास कळल्यास तिसरी गोष्ट आपल्याला सहज काढता येते. आता गंमत बघा, प्रकाशाचा वेग हा सुमारे ३ लाख किलोमीटर प्रती सेकंद इतका आहे. म्हणजे आपल्याला “वेग” ठाऊक आहे. आता प्रयोगांच्या आधारे शास्त्रज्ञांनी हे शोधून काढलंय की, अनेक आकाशीय वस्तूंपासून त्यांचा प्रकाश पृथ्वीपर्यंत येण्यास किती वेळ लागतो म्हणजे जसं सूर्यापासून निघालेला प्रकाशकिरण पृथ्वीवर यायला साधारण ८ मिनिटे २० सेकंद लागतात. आता आपल्याला काळसुद्धा ठाऊक आहे. मग आता पटकन वरील गणित सोडवलं तर आपल्या लक्षात येईल की, सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर हे सुमारे १५ कोटी किलोमीटर इतकं येतं. तुम्ही पटकन “गुगल बाबा”कडून तपासून घेऊ शकाल !!!

आता याच एककाची पुढची पायरी म्हणजे त्याच प्रकाशाचा वेग लक्षात घेऊन पाहा, प्रकाश एका वर्षात किती प्रवास करत असेल हे जर गणित मांडलं तर लक्षात येईल की प्रकाश एका वर्षात सुमारे ९४,६१,००,००,००,००० किलोमीटर इतका प्रचंड प्रवास करतो. आता लांबचे तारे किंवा आकाशगंगा यांची अंतरे या स्वरूपात सहज मांडता येतात, म्हणून याच परिमाणाला “प्रकाशवर्ष” एकक असे संबोधले जाते. आता हीच गोष्ट लक्षात येण्यासाठी काही अंतरे लक्षात घेऊ – आपल्यापासून सर्वांत जवळचा तारा (सूर्य सोडून) हा प्रोक्झिमा सेंटोरी हा आहे. त्याचं प्रकाशवर्ष या एककात अंतर आहे – ४.२ प्रकाशवर्ष. तसेच आपली आकाशगंगा (जिचं नाव “मंदाकिनी”) तिचा व्यास (म्हणजे एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत अंतर) हे सुमारे एक लक्ष प्रकाशवर्ष इतकं प्रचंड आहे आणि आजवर अशा अनेक आकाशगंगा मानवास ठाऊक आहेत. आपल्याला सर्वांत जवळची आकाशगंगा ही आपल्यापासून २५,३७,००,००० प्रकाशवर्ष दूर आहे!!!

खगोलशास्त्रात अनेक वेगवेगळी एकके आहेत, त्यातल्या मुख्य एककाची आपण माहिती करून घेतली. आता जाता जाता अजून दुसऱ्या एककांची माहिती करून घेऊ. यामध्ये “Astronomical Unit” नावाचे एक एकक आहे. यामध्ये पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर हे १ एकक पकडून त्याच्या प्रमाणात इतर अंतरे मोजली जातात. तसेच अजून एक एकेक म्हणजे “पार्सेक”. पार्सेक म्हणजे सुमारे ३.२६ प्रकाशवर्ष. पृथ्वीवरून जर दोन ताराकांमधील अंतर मोजायचे झाल्यास आपण डिग्री हे एकेक वापरतो आणि एक तारा दुसर्‍यापासून साधारण २ डिग्री वर आहे किंवा चंद्राचा दृश्य व्यास हा सुमारे अर्धा डिग्री इतका आहे असे म्हणतो.

तर मित्रहो ही आणि अशी अनेक एकके आकाशाच्या अभ्यासात वापरली जातात, आता अजून कोणती एकके राहून गेली आहेत किंवा तुम्हाला ठाऊक असलेली इतर एकके कोणती आहेत ते नक्की कळवा!!!

खगोल म्हणजे काय? नक्की वाचा खालील लिंकवर. 

 लेख १ – खगोलाची तोंडओळख

अक्षय भिडे

-[email protected]