शांतिनिकेतन : वृक्षरोपण उत्सव

शांतिनिकेतनमधे वर्षभर अनेक उत्सव साजरे केले जातात. जसे, नववर्ष उत्सव, वसंतोत्सव, हलकर्षण, वृक्षरोपण इ. रवींद्रनाथांचा मुलगा रथींद्रनाथ हे वन-उपवन शास्त्रातले जाणकार. त्यांनी वृक्षरोपण उत्सव सुरु केला. रवींद्रनाथांच्या मृत्यूनंतर हा उत्सव २२ श्रावण, म्हणजे त्यांच्या स्मृतीदिनी साजरा करतात. या दिवशी कुठल्या देवाची नाही तर बालतरूची पालखी निघते. माणसांच्या परिवाराइतकेच वृक्षपरिवारावर गुरूदेवांचे प्रेम होते. मातीतून वर प्रकाशलोलूप झाडे, वेली, गवताची पाती हे सारे त्यांच्यामते कलात्मक निर्मितीचे सुंदर आविष्कार. वृक्षवल्ली त्यांची भावंडे, त्यांची आबाळ त्यांना सहन होत नसे.

मातीच्या दानावर जगणार्‍या शेतकर्‍यांवर प्रेम करणार्‍या गुरूदेवांनी कृषीसंस्कृतीशी निगडित असे हे उत्सव आकाशाच्या मांडवाखाली साजरे करायला सुरुवात केली. वास्तविक एक झाड लावणे, एवढेच कार्य, पण गुरूदेवांनी आपल्या उच्च प्रतिभेने ते एक सुंदर मंगलकार्य बनवले. "बाईशे श्राबोन" या दिवशी वृक्षरोपण होते आणि दुसर्‍या दिवशी "हलकर्षण"चा म्हणजे जमिनीत नांगर घालायचा सोहळा साजरा होतो. २२ श्रावण या दिवशी मुले, मुली नटून-थटून, रंगीबेरंगी पोशाख घालून येतात. अंगण पानाफुलांच्या रांगोळीने म्हणजे आल्पनाने सजवतात. बालतरूचे आगमन होण्यापूर्वी गीत गायले जाते --

  मरुविजयेर केतन उडाओ शून्ये । हे प्रबल प्राण

  धुलिरे धन्य करो पुण्ये । हे कोमल प्राण ...

हे बालतरु, वाळवंटावरच्या विजयाची पतका फ़डकवत ये. आपल्या करुणेच्या पुण्याने धुळीला धन्य कर ...

वाटसरुंच्या या मित्राने रौद्र उन्हात छायेचे घोंगडे पसरावे, अधीर वार्‍याबरोबर खेळावे, रात्रीच्या वेळी झोपणार्‍या गीतांसाठी घर रचावे, अशी ही प्रार्थना वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात. रात्री झाडांच्या कुशीत झोपलेले पक्षी म्हणजे झोपी गेलेली गीतं वाटतात या महाकवीला !

सजवलेल्या पालखीतून मिरवणूकीने बालतरू आणला जातो. छोटी छोटी मुले पालखीवर फुलांचे छत्र धरतात, फुलांच्या चव‍र्‍या ढाळतात. स्त्रिया मंगल शंखध्वनी करतात, वाद्ये वाजवली जातात. मुले गुरूदेवांची गीतं गातात --

     आय आय आय आमादेर अंगने

     अतिथी बालक तरूदल ...

अर्थात, ये ये ये अंगणात आमुच्या,

     अतिथी बालवृक्षा ।

तुझ्या नवपल्लवात सूर्यतेज नाचू दे, पवनाचा, श्रावणाचा आशीर्वाद लाभू दे, तुझ्या मस्तकावर अमरावतीचे धाराजल पडू दे, अशा शुभेच्छा गीतातून दिल्या जातात. त्यानंतर पंचमहाभूतांच्या म्हणजे पृथ्वी, आप, तेज वायू आणि आकाश यांच्या पोशाखात उभ्या असलेल्या छोट्या मुलांपुढे येऊन आवाहन केले जाते --

पृथ्वी - या वृक्षाच्या मुळांना तुझे काठिण्य आणि कोमलता दे.

आप - मेघांच्या भेरी वाजवून याला जागव आणि जगव.

तेज - तुझी शुभदृष्टी याच्यावर राहो आणि याच्या पालवीच्या तळाशी तू भरून रहा.

वायू - तुझ्या तालात याच्याबरोबर खेळ आणि याला संगीताचे संस्कार दे.

आकाश - या बालतरूला चिरंजीव मूर्तिरूप धारण करण्याची प्रेरणा दे.

अशा प्रकारे प्रार्थना करून बालतरूची स्थापना होते आणि "मांगलिक" म्हणजे मंगल गीते गायली जातात. त्यात हे बालतरू, तू आमचा शेजारी हो, मित्र हो. तुझी सावली अंगणात पडू दे. तू शतायुषी हो.. इ. म्हटले आहे. असे हे वृक्षरोपण ! गुरूदेवांच्या उत्तुंग कल्पनेतून आणि गीतांतून साजरे होताना एक सुंदर, आनंददायी कर्मकांड होऊन जाते. त्यातून बहरणारा हा तरूवर घेतल्या दानाची दामदुपटीने परतफेड करेलच, होय ना ?

- स्वाती दाढे.

- [email protected]

- संदर्भ - शांतिनिकेतनेर कथा,

 - मुक्काम शांतिनिकेतन - पु.ल.देशपांडे.