मित्रमैत्रिणींनो, शब्दांच्या सहलीचा हा तिसरा टप्पा. शब्दांचे स्वभाव, शब्दांचे प्रकार, शब्दांची व्युत्पत्ती, अशा काही मुद्द्यांवर, गेल्या दोन टप्प्यात आपण संवाद साधला. अनेक जण आपल्या या सहलीत अगदी मनापासून सहभागी होत आहेत, सहलीचा आनंद घेत आहेत.
मुलुंडच्या अलका कुलकर्णी यांनी विस्मृतीत गेलेल्या शब्दांची मोठी यादीच पाठवली. त्यातले काही शब्द - पायली, अधेली ही मापं, गंज, परसदार, बारव, साकव, गडवा, इरलं, घोंगडी, झारी, गढी (जमिनीवरील किल्ला), बळद इत्यादी.
राधा मराठे यांनी जीभ लडबडवणारं एक मजेशीर वाक्य सांगितलं, " फडकंही मळकं, मडकंही मळकं, मळक्या फडक्याने मळकं मडकं पुसलं." कदाचित काहींना हे वाक्य माहीत असेलही. चला, म्हणा बरं हे वाक्य आणि मित्रमैत्रिणींनो, घरातल्या मंडळींनाही म्हणायला सांगा. मजा तर येईलच आणि जिभेलाही छान व्यायाम होईल. तुमच्याकडे अशी काही वाक्यं असतील तर नक्की सांगा.
उद्योगपती प्रदीप ताम्हाणे यांनी, इंग्रजी आणि मराठी शब्दात असलेलं साम्य लक्षात आणून दिलं. उदा., इंग्रजी 'door' आणि मराठी 'दार' , संस्कृत 'द्वार', इंग्रजी 'mixture' आणि मराठी 'मिश्रण', इंग्रजी 'bottle' आणि मराठी 'बाटली', इंग्रजी 'wow' आणि मराठी वा!, इंग्रजी 'me 'आणि मराठी 'मी ', हिंदी 'मैं'. तुम्हालासुद्धा असं साम्य आढळलं तर टिपून ठेवा.
रुमाल, बोकणा या शब्दांची व्युत्पत्ती वाचून मजा वाटली, असंही बऱ्याच जणांनी सांगितलं.
विद्याताईने 'बोकणा'ला समानार्थी 'तोबरा' हा शब्द सांगितला. आपण बरेचदा 'पानाचा तोबरा' हा शब्दप्रयोग करतो. 'तोबरा ' हा शब्द कुठून बरं आला असेल? शोधा म्हणजे सापडेल.
'च' आणि 'ज' या अक्षरांच्या उच्चारांमध्ये असलेली गंमत प्रज्ञाताईने लक्षात आणून दिली. उदा., "सचिनने चार चौकार मारले" या वाक्यात, 'सचिन'आणि 'चार' या शब्दातील 'च' आहे. 'चिमणी 'आणि 'चहा'मधला, तर 'चौकार'मधला 'च' आहे, 'चोच' आणि 'चौरंग'मधला. आता दुसरे वाक्य बघा हं, "या जगात आनंदात जग." यात 'जगात' शब्दातील 'ज'आहे 'जाहिरात'मधला तर 'जग' शब्दातील 'ज 'आहे 'जहाज 'मधला.' झ' या अक्षराची पण मजा आहे बरं. 'झब्बू' आणि 'झबलं' या दोन्ही शब्दातील 'झ' चा उच्चार वेगळा. च, ज, झ यांचे वेगवेगळ्या उच्चारांचे शब्द शोधा आणि त्यांची वाक्यं तयार करा. उदा., 'मज मजा येत आहे', अशी वाक्यं करताना तुम्हाला नक्कीच मजा येईल. मलाही अशी वाक्यं सांगा हं.
आज आपण काही वाक्प्रचार पाहणार आहोत. 'छत्तीसचा आकडा असणे', हा  वाक्प्रचार कसा बरं आला असेल? ३६ या अंकात ३ आणि ६ची तोंडं विरुद्ध दिशेला आहेत, यावरून ज्यांच्यात अबोला आहे, जे एकमेकांची तोंडं पाहत नाहीत, त्यांच्यात ३६ चा आकडा आहे, असं म्हटलं जातं.
'अकांडतांडव करणे', यातील 'अकांड' या संस्कृत शब्दाचा अर्थ अनपेक्षित असा आहे. 'तांडव 'म्हणजे शंकराचे नृत्य, पण साधे नव्हे तर विध्वंसक. 'अकांडतांडव' म्हणजे अचानक गोंधळ किंवा विध्वंस.
'अंगाची लाही लाही होणे' म्हणजे काय? आगीमुळे धान्याची लाही होते ना, म्हणजे मक्याच्या दाण्यांचे पॉपकॉर्न करून खातो ना आपण, तसंच संतापाने शरीर फुलून येणे, शरीराचा भडका उडणे.
वाकप्रचारांबद्दल तुमच्याकडे काही वेगळी माहिती असेल तर आवर्जून सांगा. आई, बाबा, आजी, आजोबा आणि मित्रांबरोबर वाकप्रचारांविषयी बोला. तुम्ही सगळ्यांनी या सहलीत सहभाग घेतलात, तर सहल अधिक रंगतदार होईल.
सहलीचा हा टप्पा कसा वाटला? ते आठवणीने सांगा. पुन्हा भेटूच पुढील स्थानकावर.  


दीपाली केळकर
[email protected]