शांती निकेतन 

आपण सारे बालपणापासून "जन गण मन अधिनायक ..." हे राष्ट्रगीत अभिमानाने गात आहोत आणि त्याचे कवी आहेत गुरूदेव रवीन्द्रनाथ ठाकूर, हेही आपल्याला माहीत आहे. पण त्यांचे इतर अनेक पैलूही आपण जाणून घेऊयात.

रवीन्द्रनाथ या एकाच व्यक्तीमधे अनेक उत्तम गुणांचा आणि कलांचा समुच्चय झाला आहे. कवी, लेखक, नाटककार, भाषातज्ज्ञ, चित्रकार, शिक्षक, समाजसुधारक ते होतेच, पण मुख्य म्हणजे ते बालमानस जाणणारे सहृदय व्यक्तीही होते.

गुरूदेवांचे शांतिनिकेतन म्हणजे त्यांच्या जीवनव्यापी तत्त्वज्ञानाचा सुंदर आविष्कार. ज्ञान, विज्ञान, कला आणि प्रत्यक्ष कार्यप्रवणता हे व्यक्तीच्या आणि समस्त समाजाच्या देहाचे अवयव आहेत आणि त्यातील कुठलाही अवयव गौण नाही, हे तत्त्व त्यांनी अमलात आणले. इंग्रजी कारकून निर्माण होऊ नयेत म्ह्णून त्यांनी आपली प्रतिभा आणि परीश्रम शिक्षणाच्या कार्यी लावले. चार भिंतीतून त्यांनी पोरांची सुटका केलीच आणि इंग्रजीच्या जोखडातूनही.

स्वधर्म, स्वभाषा, आणि स्वसंस्कृती यांबद्दल रास्त अभिमान निर्माण करणं, हाही शांतिनिकेतनचा उद्देश. वास्तव आणि कल्पना यांतून खेळत जाणारं आणि आनंददायी विकास करणारं शिक्षण देण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं.

१९०१ साली शांतिनिकेतन सुरू झालं, नव्हे चैतन्याने रसरसलेली नवी शैक्षणिक चळवळ सुरू झाली. निसर्गाशी असलेली मानवाच्या एकात्मतेची जाणीव जागी केल्याखेरीज खरा विकास होणार नाही, अशी गुरूदेवांची धारणा. म्हणून वॄक्षांच्या सावलीत विद्यादान देणारं गुरूकूल सुरू केलं. मानसिक अध्ययनाला शारीरिक श्रमांची जोड हवी, ग्रंथांइतकंच हातांनी काहीतरी निर्माण करण्याला महत्त्व आहे, असा त्यांचा आग्रह होता. म्हणून शाळेत सुतारकाम, बागकाम, शेती, झाडझूड करणं याबरोबर नॄत्य, संगीत, चित्रकला, पोहणे इ. अनेक विषय शिकवले जात. कृषी-संस्कृती आणि ऋषीसंस्कृती हातात हात घालून चालल्या पाहिजेत, वाढल्या पाहीजेत, यासाठी त्यांनी श्रीनिकेतनची स्थापना केली.

बालकांसाठी लिहिलेले "सहजपाठ" म्हणजे रवीन्द्रनाथांनी बंगालवर केलेले उपकारच. आजही तिथे सहजपाठ शिकवले जातात, ज्यामधे मुलं रोज पाहात असलेली शब्दचित्र आहेत, जी शिकताना मुलांना मजा वाटते. कारण एखादी गोष्ट आवडली नाही तर मुले चटकन तिथे मनानं गैरहजर होतात, हे गुरूदेवांना छानच माहीत होते.

    बघा हं, छॊटो खोका बोले अ आ ।

           शेखे नि शे कोथा कोवा ।

   म्हणजे, छोटा बाळ बोले अ आ, शिकला ना तो शब्द बोलण्या, किंवा,

छायार घोमटा मुखे टानि, बोशे आमादेर पाडाखानि - म्हणजे सावलीचा घुंघट मुखावर ओढून, बसली आमची छोटी वस्ती. अशा छोट्या छोट्या रचनांमधून गुरूदेवांनी मुलांच्या मनांचा विकास केला.

शिकण्याच्या पद्धतींच्या चौकटी बांधू नका, मुलांच्या कानांवर पडणार्‍या भाषेतून त्यांना शिक्षण द्या, संगीत-नाट्य-नृत्य ही शिक्षणाची अविभाज्य अंग करा, मुलांचे हात चित्र, शिल्प यांच्या निर्मितीत गुंतवा इ. रवींद्रनाथांच्या शिक्षणविषयक विचारांकडे आज गंभीरपणे पाहण्याची वेळ आली आहे.

   गुरूदेवांची एक सुंदर प्रार्थना आहे --

   अंतर मम विकसित करो, अंतरतर हे ।

   निर्मल करो, उज्ज्वल करो, सुंदर करो हे ।

   जागृत करो, उद्यत करो, निर्भय करो हे ।

   मंगल करो, निरलस नि:संशय करो हे ॥

 

- स्वाती दाढे

[email protected]