करिअरच्या निर्णयाचे २ महत्त्वाचे टप्पे मानता येतील. पहिला आहे दहावीचा. दहावीनंतर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स असे तीन मुख्य प्रवाह आहेत. त्यात सायन्सच्या पर्यायात पुढे २ महत्त्वाचे प्रवाह होतात. एक इंजिनियरिंगचा आणि दुसरा मेडिसिनचा. ११वी आणि १२वी सायन्सला काय विषय घ्यायचे हे इंजिनियरिंगचा पर्याय स्वीकारायचा आहे की, मेडिसिनचा यावर अवलंबून असतात. म्हणजेच सायन्सला जाणाऱ्या मुलांना दहावीनंतर एक निर्णय घ्यावाच लागतो - इंजिनियरिंगचा पर्याय निवडायचाय की मेडिसिनचा. या दोन्ही शाखांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा होतातच. त्याही बारावीच्या परीक्षेनंतर. यातला काही पर्याय जमला नाही तर बी.एससी.चा पर्याय असतोच. आर्ट्स आणि कॉमर्सला जाणाऱ्या मुलांना मात्र सर्वसाधारणपणे बी.ए. आणि बी.कॉम. हे मुख्य पर्याय असतात. त्यानंतर कॉमर्सला जाणाऱ्या मुलांना चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाउंटिंग असे पर्याय असतात. बी.ए. केलेल्या मुलांना एम.ए.चा पर्याय असतो. अलीकडे काही कोर्सेस असे उपलब्ध आहेत की, जे बारावीनंतर करता येतात. त्यांचीही माहिती आधीच करून घेतली पाहिजे म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यापैकी दहावीनंतर काय घ्यायचं हे ठरवता येतं.

काही डिप्लोमा हे दहावीनंतरही करता येतात. इंजिनीयरिंगचे डिप्लोमा दहावीनंतर करता येतात. म्हणजेच इंजनियरिंगचा डिप्लोमा करता येतो दहावीनंतर किंवा १२वी नंतर प्रवेश परीक्षा देऊन डिग्री करता येते. डिप्लोमा केलेल्या मुलांना नंतर डिग्री करण्याचा पर्याय असतोच. लॉमधलं शिक्षणही दोन प्रकारे होऊ शकतं. एक म्हणजे कोणत्याही विषयातल्या ग्रॅज्युएशननंतर ३ वर्षांचा एल.एल.बी.चा कोर्स करता येतो किंवा १२वीनंतर ५ वर्षांचा कोर्स करता येतो. लॉमध्ये करिअर करण्याचा ज्यांचा निश्चित विचार आहे अशा मुलांनी १२ वी नंतर ५ वर्षांचा कोर्स स्वीकारणं जास्त योग्य मानलं जातं.

काही वर्षांपूर्वी करिअरचे अगदी मर्यादित पर्याय उपलब्ध होते. एकतर सरळसोट बी.ए., बी.कॉम., बी.एससी. हे पर्याय होते. नाही तर मग डॉक्टर, ईंजिनिअर, चार्टर अकाउंटंट असे थोडे वेगळे आणि अधिक आव्हानात्मक पर्याय होते. १२ वीचे मार्क्स महत्वाचे होते आणि कुठच्याही प्रवेशासाठी सीईटी नव्हत्या. गेल्या काही वर्षात हे चित्र झपाट्याने बदललं आहे. आता अनेक क्षेत्रात अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. कुठच्याही महत्त्वाच्या प्रवेशासाठी सीईटी आवश्यक आहे. पूर्वी बी.ए. म्हणजे कॉलेजात शिकवायचं किंवा बी.एड. करून शाळेत शिकवायचं एवढंच माहीत होतं. आता मात्र आर्ट्सला गेल्यानंतर शेवटच्या वर्षात तुम्ही कुठच्या विषयात ग्रॅज्युएशन करत आहात यावर तुमचे पुढचे पर्याय बदलतात. उदाहरणार्थ, तुमचा ग्रॅज्युएशनचा विषय इकॉनॉमिक्स असेल तर तुम्हाला अगदी आर्थिक पत्रकारितेपासून ते आर्थिक संशोधन करणाऱ्या संस्थांपर्यंत सगळीकडे संधी मिळू शकतात. तुम्ही जर मानसशास्त्र हा विषय घेतला तर तुम्हाला काउन्सेलर म्हणून शाळा, खाजगी कंपन्या, हॉस्पिटल्स इथे काम करता येईल. बॅचलर ऑफ मास मीडिया हा कोर्स गेल्या काही वर्षात खूप लोकप्रिय झाला आहे. वेगवेगळ्या माध्यमांचा जोरदार प्रसार गेल्या काही वर्षात झाल्यामुळे या कोर्सला महत्त्व आलं आहे. आजकाल खूप सारी माहिती प्रत्येक गोष्टीबद्दलची उपलब्ध असते. या माहितीचे अनालिसिस करून त्याच्या आधारे नवीन निर्णय घेता येतात. या क्षेत्राला डेटा अनालिसिस असं म्हणतात. उदाहरणार्थ, एखादा मोठा मॉल असतो तिथे येणाऱ्या ग्राहकांचे खरेदीचे पॅटर्न, कुठच्या गोष्टी जास्त विकत घेतल्या जातात, कुठच्या गोष्टी कॉम्बिनेशनमध्ये विकत घेतल्या जातात या सगळ्याचा अभ्यास केला जातो त्याच्या आधारे मॉलमध्ये वस्तू मांडल्या जातात. त्यानुसार प्रमोशनल स्कीम ठरवल्या जातात. या क्षेत्राला आजकाल खूप महत्त्व आलं आहे. मॅथ्स, इकॉनॉमिक्स असे विषय घेऊन ग्रॅज्युएशन असेल तर या क्षेत्राचा विचार करता येईल. ईंजिनीयरिंगमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याना या अभ्यासक्रमाच्या प्रवेशामध्ये प्राधान्य असते. काही कोर्स पूर्ण वेळ डिप्लोमा स्वरूपाचे असतात तर काही ६ महिन्यांचे असे असतात. ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडीओ रेकॉर्डिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, वन स्टॉप सर्व्हिसेस अशी अनेक क्षेत्र करिअरसाठी आता उपलब्ध आहेत. नेहेमीच्या क्षेत्रांबरोबर या वेगळ्या वाटांचाही विचार करणं आवश्यक आहे. नुसता विचार नाही तर त्याची सगळी माहिती जमा केली पाहिजे. नाहीतर एखाद्या करिअरसाठी सायन्स ग्रॅज्युएशन आवश्यक असत आणि ते माहीतच नसतं किंवा काही विषय काही क्षेत्रांसाठी आवश्यक असतात आणि ते आपल्याला उशिरा कळतं. पूर्वी शिक्षणाच्या एका लाइनमधून दुसऱ्या लाईनमध्ये जाणं सहज शक्य नव्हतं. म्हणजे आर्टस घेतलं असेल आणि नंतर ते आवडेनासं झालं तर सायन्सला जाता यायचं नाही. पण आता काही कॉलेजांमधून, विद्यापीठामधून मुक्त स्वरूपाचे कोर्सेस उपलब्ध व्हायला लागले आहेत. ज्यात सायन्स, ह्युमॅनिटीज याचं कॉम्बिनेशन घेता येतं. प्रत्येक वेळेला नोकरीचाच विचार झाला पाहिजे असं नाही. स्वतंत्र व्यवसाय किंवा अगदी कन्सल्टन्सी हेसुद्धा उत्तम पर्याय असू शकतात. मोबाइलसाठी ऍप्स विकसित करणं हा करिअरचा पर्याय असू शकतो असं आपल्याला ५ वर्षांपूर्वी खरंच वाटलं नसतं पण आता तो आहे. त्यामुळे वेगळा थोडासा हटके विचार केला तर आपली आवड आणि करिअर यांचा ताळमेळ बसवता येईल.

करिअर निवडताना नेमका कशाचा विचार करायचा असतो याचा धांडोळा घेणारा लेख नक्की वाचा. 

करिअरच्या वळणवाटा : भाग १

 - सुप्रिया देवस्थळे 

[email protected]