मित्रांनो, 

परीक्षा म्हटली की तुमच्यापैकी बहुतेकांना, थोडं टेन्शनच येतं ना? आणि संगीताची पण परीक्षा? आता तुम्ही म्हणाल, आम्ही आनंदासाठी संगीत शिकतो. अभ्यास करून कंटाळा आला की मनाला विरंगुळा म्हणून संगीत शिकतो. कुणाला गायला आवडतं, कुणाला एखादं वाद्य वाजवायला आवडतं तर कुणाला नृत्यात आनंद मिळतो. मग या विषयातसुद्धा परीक्षा? कशाला उगाच.

खरंय तुमचं... पण मी काय म्हणते, ते परीक्षेत मार्क मिळवून, सर्टिफिकेट मिळवण्यासाठी परीक्षा द्यायचीच नाहीये आपल्याला. सर्टिफिकेट्स मिळवून थोडंच गाणं येणार आहे ?

आपण असं केलं तर? आधी व्यवस्थित शिकायचं, भरपूर प्रॅक्टिस करायची, लोकांपुढे गायला-वाजवायला लागायचं. आणि मग येतंय त्या अभ्यासक्रमाची परीक्षा द्यायची. म्हणजे परीक्षेत हमखास यश. काय? कशी वाटली आयडिया?

आपण कोणत्याही कलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतो ना, त्याला एक आखीव रेखीव अभ्यासक्रम असतो. म्हणजे काय, तर आधी काय शिकायचं, नंतर काय याचा एक मार्ग आखून दिलेला असतो. सोप्याकडून अवघड गोष्टींकडे जाणारा... 

तुम्ही कोणत्याही वयात संगीत शिकायला सुरुवात केलीत, समजा सहावीत असताना किंवा आठवीत असताना, पण तुम्ही त्या कलेच्या विषयात पहिलीतच असताना? मग सुरुवातीला पाया पक्का करण्यासाठी काय शिकायचं? संगीतातील ए बी सी डी... म्हणजे सा रे ग म तर शिकायलाच हवं. नुसतं शिकायलाच नाही तर घोटायलाही हवं. स्वर मनात पक्के व्हायला हवेत. मग ते गायचे असोत किंवा वाजवायचे असोत. 

शुद्ध स्वरांचे अलंकार, नंतर कोमल तीव्र स्वरांची ओळख, सोपे सोपे राग. त्यातील सोप्या बंदिशी (गीतं). मग त्या बंदिशी आलाप तानांसह सजवणं. या सर्वातून आपलं स्वरज्ञान हळूहळू वाढतं. निरनिराळ्या रागांचा, तालांचा परिचय होतो. आपल्या आवाजावर किंवा वाजवत असलेल्या वाद्यावर हळूहळू नियंत्रण यायला लागतं. भूप, दुर्गा, देस, खमाज, काफी, भीमपलास, यमन अशा बेसिक रागांवर सुरुवातीला अभ्यास होतो. एकदम मालकंस, दरबारी, जौनपुरी, तोडी असे कठीण राग सुरुवातीलाच कुणी शिकत नाही. परीक्षा पद्धतीत नेमकं यालाच महत्त्व दिलं जातं.

म्हणजे असं पाहा, कोणतीही भाषा शिकताना एकदम कुणी त्या भाषेतील साहित्याचा अभ्यास करत नाही. तर सुरुवातीला व्याकरणशुद्ध वाक्यांच्या रचनेचा अभ्यास करावा लागतो. अक्षरओळख व्हावी लागते, शब्दसंग्रह वाढवावा लागतो. यात जसं आधी काय, नंतर काय शिकायचं याचा विचार करून पाठ्यपुस्तकं तयार केलेली असतात. तसंच संगीत शिकतानाही याचा विचार करावा लागतो.

तसं पाहिलं तर, आपण जे जे शिकतो ते ते सतत कोणासमोर तरी गाऊन वाजवून दाखवलं ना तरीदेखील आपला सादरीकरणाचा रियाज होतो आणि कालांतराने आपली प्रगती त्या ऐकणाऱ्याला जाणवू लागते. म्हणून मी नेहमी पालकांनाच माझ्या विद्यार्थ्यांचा श्रोता व्हायला सांगते. एकट्यानं सातत्यानं रियाज करणं खरंच कठीण असतं. म्हणून असा हक्काचा, कौतुकाचा श्रोता .....मग तो आई, बाबा, आजी, दादा, मित्र-मैत्रिण कुणी का असेना....मिळाला की आपला रियाज छान आनंदानं होतो.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही कलेत, शास्त्र आणि कला (थिअरी आणि प्रॅक्टिकल) हातात हात घालूनच चालतात. म्हणजेच संगीत शिकताना त्याची शास्त्रीय माहितीही बरोबरीनंच शिकायची असते. म्हणून त्याला शास्त्रशुद्ध शिक्षण म्हणतात. 

गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुस्करांनी या गोष्टीचं महत्त्व ओळखलं आणि संगीताच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्वत: असा अभ्यासक्रम तयार करून, संपूर्ण भारतभर संगीताच्या परीक्षा देण्याची सोय केली. त्यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे अशा संगीताच्या परीक्षा घेतल्या जातात. प्रारंभिकापासून विशारद ( बी.ए.ची पदवी परीक्षा )पर्यंत विचारपूर्वक आखून दिलेला हा सात परीक्षांचा अभ्यासक्रम, आपल्याला अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते ख्याल गायनापर्यंतचे शिक्षण घ्यायला मदत करतो. शास्त्रीय माहितीबरोबरच, आपल्या कलेचे सादरीकरण करण्याबद्दल मार्गदर्शन करतो. 

फक्त हा अभ्यासक्रम शिकताना चांगले गुरू मिळणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. संगीत शिकवणारे गुरू स्वत: जर कलाकार असतील, तर शास्त्रीय शिक्षणदेतानाच, कलात्मकतेनं त्याचं सादरीकरण करण्याची दृष्टी विद्यार्थ्याला देऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक वर्षीच्या अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्याला आपल्या गायन वादनाचा स्तरविकसित करता येतो आणि सात वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर तो विद्यार्थी आपली गायन वादनाची कला श्रोत्यांसमोर सादर करू शकतो. आणि हो, या पहिल्या पदवीनंतरही संगीताचं शिक्षण संपत नाही बरं का, तर त्यापुढेही आयुष्यभर शिकण्यासारखं खूप काही असतं. हे जरी खरं असलं तरी हे संगीताचं पदवी परीक्षेपर्यंतचं शिक्षण, विद्यार्थ्याचा शास्त्रशुद्ध पाया पक्का करण्यासाठी उपयोगी ठरतं, हे मात्रनक्की.

    (या परीक्षांच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी काय करणं आवश्यक आहे, याबाबत लेखाच्या उत्तरार्धात सांगते.)