आपण भारतीय माणसं उत्सवप्रिय आहोत. देशभरात वर्षभर कुठेना कुठे सण, उत्सव साजरे होत असतात. सध्या सुरू असलेला गणेशोत्सव हा महाराष्ट्रातला सर्वांत मोठा उत्सव आहे. गणपती हे मराठी माणसाचं आराध्य दैवत आहे आणि या गणपतीचा उत्सव फक्त महाराष्ट्रातच, नाही तर इतरही अनेक शहरात, राज्यात साजरा होत असतो. आता उत्सव म्हटला की खूप गोष्टी आल्या. गणपतीच्या मूर्तीपासून ते मिरवणुकांमधल्या वाद्यांपर्यंत आणि डेकोरेशनपासून ते भक्तांना वाटल्या जाणाऱ्या प्रसादापर्यंत कितीतरी गोष्टी या उत्सवाशी निगडित आहेत. या सगळ्या निमित्ताने किती छोट्या-मोठ्या आर्थिक उलाढाली होत असतील? जे तुम्ही या उत्सवाच्या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने पाहिलंत तर तुमच्या लक्षात येईल. 
गणपती उत्सव म्हणजे सर्वांत पहिली येते ती  गणपतीची मूर्ती. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या अनेक वर्ष लोकप्रिय होत्या, पण त्यांचे पर्यावरणावर होणारे घातक परिणाम लक्षात आल्यावर शाडूच्या मातीच्या किंवा इतर पर्यावरणस्नेही गणपती मूर्ती बनायला लागल्या.  पर्यावरणाला पोषक असणाऱ्या मूर्ती तयार करण्याचा मोठा उद्योग अनेक शहरांमध्ये आता सुरू झालेला आहे. मूर्तींना रंगवण्यासाठी वेगवेगळे रंग लागतात. मूर्ती घडवणाऱ्या कारखान्यांमधले कारागीर, त्यांचे पगार असे कितीतरी आर्थिक पदर आहेत. 
गणेशोत्सवांमधला मूर्तीइतकाच महत्त्वाचा भाग जर असेल तर तो आहे आरास किंवा सजावट. ही सजावटसुद्धा कितीतरी प्रकारची असते. गेल्या काही वर्षांत या सजावट साहित्यातल्या कितीतरी रंगीबेरंगी वस्तू चीनमधून भारतात यायला लागल्या आहेत. वेगवेगळ्या रंगांची कृत्रिम फुलं, माळा, मुकुट, विजेचे दिवे-माळा चीनमधून येत असतात. गंमत अशी की उत्सव भारताचा पण त्याला लागणाऱ्या गोष्टी येतात चीनमधून. या वस्तू दिसायला आकर्षक असतात आणि स्वस्तही असतात, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर खपतातसुद्धा. एका बाजूला चीनमधल्या स्वस्त मालाची जोरदार खरेदी होत असते, त्याच वेळी चीनमधल्या स्वस्त मालामुळे स्थानिक उद्योगांचे नुकसान होते, चीनशी आपले राजकीय संबंध सध्या ताणलेले आहेत, त्यामुळे चिनी मालावर बहिष्कार टाकावा असंही आव्हान होत असतं. 
या वर्षी बऱ्याच गणेशोत्सव मंडळांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी खास टी-शर्ट तयार करून घेतले आहेत. या टी-शर्ट्सचे डिझाईन करून घेतले आहे. टी-शर्ट डिझाईन करणाऱ्या कलाकारांनीही यातून मानधन मिळवलं असणार. मुंबईसारख्या शहरात १५,००० गणेशमंडळं आहेत. मंडळ किती लहान-मोठं आहे यावर किती टी-शर्ट घेणार हे ठरतं.  टी-शर्टच्या विक्रीतूनही मंडळांना काही आर्थिक फायदा झाला असणार हे नक्की. 
गणेशोत्सवाच्या काळात मंडळाच्या दानपेट्यांमधूनही खूप रक्कम जमा होत असते. केवळ पैशाच्याच स्वरूपात नाही तर, अनेक मोठ्या मंडळांमध्ये गणपतीसाठी दागिने, कार अशा वस्तूही मिळत असतात. गणपतीच्या दिवसात फुलं-फळं यांचेही भाव चढेच असतात. प्रसादाचाही मोठा व्यापार या दिवसांमध्ये होतो. पेढे, मावा मोदक यांची हजारो किलोने विक्री होत असते. प्रसादाचे इतर पदार्थ उदाहरणार्थ साखर फुटाणे, सुकं खोबरं, सुका मेवा यांचाही खूप खप होत असतो. 
गेल्या काही वर्षांपासून गणपतीजवळ आले की अनेक ढोलपथकं मैदानांमधून, रात्रीच्या वेळी रिकाम्या रस्त्यांवर सराव करताना दिसतात. पूर्वी मिरवणुकांमधून ढोल, ताशे वाजायचे. मग डीजेचा जमाना आला. आता पुन्हा पारंपरिक ढोलपथकं, लेझीमपथकं मिरवणुकांमधून दिसायला लागली आहेत. या ढोलपथकांनाही बऱ्यापैकी मानधन या उत्सवाच्या काळात मिळतं. 
गणेशोत्सवाच्या निमित्ताने खूप मोठी आर्थिक उलाढाल होते, ती विमा किंवा इन्शुरन्सच्या क्षेत्रात. उत्सवाच्या काळात सुरक्षिततेचा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. अनेक मोठ्या उत्सवांमधल्या गणेश मूर्तीच्या अंगावर सोन्याचे, हिऱ्याचे अत्यंत महागडे दागिने असतात, मंडपावर सजावटीवर मोठा खर्च झालेला असतो. काही नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा आग, बॉम्बस्फोट अशा संकटांमुळे मोठं नुकसान होऊ शकतं. यावर नियंत्रणाचा एक मार्ग म्हणजे विमा काढणे. मुंबईतल्या काही महत्त्वाच्या गणेशमंडळांचा कट्यावधी रुपयांचा विमा असतो. 
एक आनंदाचा, उत्साहाचा, भक्तीचा उत्सव. या उत्सवात किती लोक सामील असतात, किती लोकांचे श्रम हा उत्सव साजरा करण्यासाठी लागलेले असतात आणि किती छोट्या मोठ्या आर्थिक उलाढाली यानिमित्ताने होत असतात हे पाहणंसुद्धा मनोरंजक आहे की नाही? 
- सुप्रिया देवस्थळी