रंगांची उधळण

चला तर या वेळेस आपण जंगलामध्ये रंग पाहायला जाऊ या. बघू या तरी आपला निसर्ग किती प्रकारचे रंग दाखवतो ते. कल्पना करा एक असं जंगल आहे की जे घनदाट तर आहेच पण जिथे पाण्याची कमतरता नाही, प्रचंड प्रमाणात डोंगर-दऱ्या आहेत, गवती कुरणे आहेत, पाणथळ जागा आहेत. चला तर मग सकाळपासूनच सुरुवात करू या भटकंतीला! मे महिन्याच्या दिवसात सव्वा पाचच्या सुमारालाच उजाडतं. चहूबाजूनी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागतो आणि काही वेळातच सूर्यनारायण आपले साम्राज्य पसरवायला सुरुवात करतो. सूर्योदयाच्या वेळची पसरणारी लालसर केशरी, त्यात किंचित गुलाबी छटा हळूहळू निळ्याशार आसमंतात पसरू लागते. त्यात एखादा लहानसा पांढरा ढग आला की, असं वाटून जातं की, रात्रीची झोप संपवून तो त्याच्या मित्रांकडेच निघालाय. समोर फिकट हिरवी-निळी नदी. खरं तर तिचा स्वतःचा रंगच कळत नाही, कारण त्यात पडलेल्या प्रतिबिंबामुळे सगळंच तिच्यात सामावल्यासारखं दिसतं, एकरूप झालेलं दिसतं. काही ठिकाणी मातीसुद्धा रंग उधळत असते. कधी काळीशार तर कधी तांबडी. नुकताच पाऊस पडून गेला असल्यास लाल माती भिजल्याचा एक वेगळाच गडद रंग येतो. हीच माती आणि हाच हिरवागार निसर्ग संधिप्रकाशात एक वेगळेच रूप दाखवतो. सगळीकडे सोनेरी मुलामा चढल्यासारखं वाटतं. जंगलामध्ये जसजसं आत जावं तसं सोनेरी किरणं दाटीवाटीत असलेल्या पानांमधून खाली येऊ पाहतात. नव्या कोवळ्या पालवीवर जेव्हा सूर्यकिरण पडतात ना तेव्हा त्यांचा हिरवा रंग खूप भाव खाऊन जातो. पाण्याचा एखादा थेंब त्यात जर राहिला असेल तर मात्र रत्नच चमकल्याचा भास होतो. त्यातच एखादा सरडा आपले डोके लाल करून ऊन खात बसलेला असतो. काही प्रकारचे सरडे तर असतातच विविध रंगांचे. बहुतेकांना सरपटणारे प्राणी हे मातकट रंगांचेच माहीत असतात. सरडेच काय पण पावसाळ्याची चाहूल लागली की विविध रंगांचे बेडून देखील दिसायला लागतात. त्यांचे रंग तर कधीकधी पक्ष्यांच्या रंगांपेक्षा लाजवाब असतात.


आतल्या दाट जंगलामध्ये हिरव्या रंगाच्या शेकडो छटा दिसतात. पोपटी, पाचूसारखा चमकणारा, गर्द हिरवा, काही झाडात तर निळसर हिरवी झाक पण दिसते आणि या पार्श्वभूमीवर मधूनच काही रंगीबेरंगी पक्षी विविध रंगांची झलक देऊन जातात. तांबट, वेडा राघू, सुभग, पर्णपक्षी यासारखे काही हिरव्या रंगाचे पक्षी त्यात दिसतंच नाहीत, त्यांना त्या झाडात शोधायला तसेच तयार डोळे लागतात. निरनिराळ्या प्रकारची घुबडं, गरुड, शिक्रा, खरुची, मधुबाज यासारखे काही शिकारी पक्षी झाडाच्या खोडाच्या रंगात असे काही मिसळून जातात की पत्ताच लागत नाही. घुबडं तर फारच कठीण शोधायला. खडकाळ भागात, कोरड्या जमिनीत किंवा वाळलेल्या गवतात पारवे, हुदहुद, अनेक प्रकारचे चंडोल, धोबी, तीरचिमणी, रातवा, तित्तीर, लावा यासारखे मातकट रंगाचे पक्षी जवळ जाईस्तोवर कळत नाहीत, एकदम भुर्र असा उडण्याचा आवाज झाला की त्यांचं अस्तित्व जाणवतं. हे सगळे करडे किंवा मातकट रंगाचे पक्षी कधी मोकळ्या जागेत दिसले तर त्यांच्यामध्ये पण काही छान छटा दिसतात ज्या एरवी कधीही आपल्या नजरेत पण आलेल्या नसतात. मादीला आकर्षित करण्यासाठी सर्व नर-पक्ष्यांना मुळातच खूप आकर्षक रंग असतात. हे आकर्षक रंग कधीकधी अक्षरशः आपल्याला भडक वाटतात. यात पिवळाधम्मक हळद्या, लाल भडक मनोली, निळाशार मोर, गुलाबी रोहितपक्षी, काळीनिळी निलपरी, जांभळा शिंजीर, पांढरा स्वच्छ स्वर्गीय नर्तक यासारखे बरेच पक्षी केवळ आपल्या रंगांमुळे कुठूनही उठून दिसतात.


अशा या रंगीबेरंगी पण तरीही एकरूप झालेल्या या जंगली दुनियेत मनुष्य प्राणीच काय तो वेगळा भासतो. निसर्गाने सर्व प्राणीमात्रांना नेमून दिलेल्या रंगाला अनुसरून त्यांचे अधिवास दिलेले आहेत. शक्यतो ते त्याच्या बाहेर पडत नाहीत. माणूस मात्र त्याच्या राज्यात फिरत असताना सांगूनसुद्धा आपल्या आवाजाने आणि भडक पेहेरावामुळे नको ते अरिष्ट ओढवून घेतो आणि त्यात अडकतो आपल्याच विश्वात रमणारा एक निष्पाप जीव. 

प्राण्यांचीही एक भाषा असते, त्यालाही एक निश्चित अर्थ असतो, त्यातून एक मूक संवाद साधला जात असतो. कस ते वाचा या लेखात. 

मुके संवाद

- अमोल बापट
 
छायाचित्र सौजन्य - मंदार मोटे