भात लावणी २०१७ 

पावसाळ्याचे दिवस म्हणजे निसर्गात मनसोक्त भटकणे, पावसात भिजणे आणि एकत्र भोजनाचा आनंद घेणे. हाच आनंद थोड्या वेगळ्या पद्धतीने अनुभवता आला तो म्हणजे भातलावणीच्या उपक्रमातून. रविवार ३० जुलै रोजी ‘शिक्षणविवेक’ आयोजित भातलावणी उपक्रमात १०० विद्यार्थी, ५ शिक्षक व शिक्षणविवेक टीमने प्रत्यक्ष शेतात जाऊन भाताची रोपे लावली. भोर तालुक्यातील ससेवाडी आणि कोंढणपूर अशा दोन गावांमधील शेतात भातलावणी केली. दोन गटात विभागलेल्या विद्यार्थ्यांना विठ्ठल वाडकर आणि अजय मुजुमले या शेतकऱ्यांनी सर्वांना भात लागवडीचे प्रशिक्षण दिले. स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवत दोन्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही या उपक्रमात आनंदाने सहभाग दाखवला.

सकाळी ९ वा. ससेवाडीत पोहोचल्यानंतर न्याहारी करून सर्वजण शेताकडे निघाले. शेतात गेल्यावर विठ्ठल वाडकर यांनी विद्यार्थ्यांना भाताचे खाचर तयार करण्याची माहिती सांगितली. भातासाठी आवश्यक हवामान व पाण्याचे प्रमाण यांच्याविषयी माहिती ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांनी तांदूळ उत्पादन करणाऱ्या प्रदेशांची नावे सांगितली. त्यानंतर वाडकर कुटुंबातील सदस्यांनी ‘भाताची रोपे हातात कशी धरायची, जमिनीलगत असलेल्या दोरीच्या निशाणावर जमिनीत कशी रोवायची’; याचे प्रात्यक्षिक दाखवले. विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहून सुचनेप्रमाणे भाताची रोपे लावण्याचा प्रयत्न केला. नवीनच प्रयोग असल्यामुळे सुरुवातीला रोपे लावणे थोडे जड जात होते. मात्र विठ्ठल वाडकर यांनी परत परत एक-एक सूचना देत सर्वांकडून रोपे नीट लावून घेतली. वरून पावसाची भुरभूर चालूच होती. तरीही पावसात भिजत सर्वांनी रोपे लावली. संपूर्ण शेत लावून झाल्यावर मुलांना झालेला आनंद अवर्णनीय होता. एकत्र भोजनाच आस्वाद घेऊन सर्वजण कोंढणपूरला देवीच्या दर्शनाला निघाले.

कोंढणपूर गावात अजय मुजुमले यांनी सर्वांना शेतात मार्गदर्शन केले. न्याहारी आटोपल्यानंतर शिक्षणविवेकचे धनाजी जाधव यांनी रोपे तयार होण्यापूर्वीची माहिती सांगितली. तयार रोपे हातात आल्यावर ती लावताना धनाजी जाधव यांनी सांगितलेल्या माहितीची सर्वजण उजळणी करत होते. अजय मुजुमले यांनी तांदूळ तयार होण्याची पूर्ण प्रक्रिया सांगितली. ही प्रक्रिया ऐकून शेतकऱ्यांचे हे कष्टाचे काम विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. संपूर्ण एका भातखाचरात विद्यार्थ्यांनी भातलावणी केली. ओणवे होऊन भाताची रोपे रोवताना सर्वांना आयत्या मिळणाऱ्या भाताची आठवण झाली. एक दिवस शेतात काम करताना शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीची जाणीव सर्वांना होत होती. एकत्र केलेली रोपे खाचरात आणणे, रोपे लावणे, दोरी धरणे व चिखलात घसरणाऱ्या मित्राचा तोल सावरणे अशी अनेक कामे एकाच वेळी केली जात होती. सुरुवातीला अवघड जाणारी कृती थोड्या सरावाने चांगली जमू लागली याचा सर्वांना समाधान वाटले. मुजुमले कुटुंबासोबत भातलावणी झाल्यानंतर सर्वांनी जेवण केले आणि कोंढणपूरला देवीचे दर्शन घेतले.
 
ससेवाडी आणि कोंढणपूर या दोन्ही ठिकाणच्या तुकड्या तुकाई देवीच्या देवळात एकत्र जमल्या. दर्शन घेऊन झाल्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांना आपापले अनुभव सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वेछेने, उस्फुर्त प्रतिक्रिया दिल्या. भातलावणीवर शिक्षकांनी केलेली कविता या वेळी ऐकायला मिळाली. केवळ मजा न करता समाधानाचा एक अनुभव सर्वांनी घेतला होता. शिक्षणविवेक आयोजित काही स्पर्धा व उपक्रमांची माहिती या वेळी विद्यार्थ्यांनी करून घेतली. विठ्ठल वाडकर व अजय मुजुमले यांना राखी बांधून सर्वांनी आभार मानले. अपूर्व आणि अविस्मरणीय अनुभव सोबत घेऊन सर्वजण आपापल्या घरी परतले.
- रुपाली सुरनिस