खाद्याभ्रमंती 

भारतीय सण हे चराचरांत, मनांमनांत उत्साहाचं भरतं घेऊन येतात. कौटुंबिक, सामाजिक वातावरणातून जाणवणारा या सण-उत्सवांचा आनंद अलीकडे बाजारपेठांमधूनही ओसंडत असल्याचं चित्र दिसतं. त्या त्या उत्सवासाठी आवश्यक असणारं सारं काही घेऊन बाजारपेठा सजलेल्या असतात, ते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी! खाद्यपदार्थांची बाजारपेठही याला अपवाद नाही. चोखंदळ ग्राहकांच्या आवडीनिवडीचा विचार करून, नवीन ट्रेंड्सचा स्वीकार करत ही बाजारपेठ ग्राहकांच्या सेवेत रुजू होते.

सण-उत्सव, उत्साह, आनंद यांच्या पंक्तीला अपरिहार्यपणे येऊन बसतं ते गोडाचं जेवण. आनंद साजरा करण्यात या गोडाचा वाटा खूप मोठा असतो. सण कुठलाही असो, गोडाचं जेवण हवंच! मग प्रत्येक सणाचा ऋतू, देवता यांनुसार गोड पदार्थही ठरलेले. 

भाद्रपद चतुर्थीला येणार्‍या आपल्या लाडक्या गणपतीबाप्पाला ‘लाडू-मोदक अन्ने परिपूर्ण पात्रे’ असा नैवेद्य अर्पण करण्यासाठी प्रत्येक जण आतूर असतो. बाप्पांचा पारंपरिक नैवेद्य म्हणजे ‘उकडीचे मोदक’! त्यासाठी लागणार्‍या गूळ, खोबरं, तांदूळ पिठी अशा कच्च्या मालाला गणेशोत्सवाच्या काळात खूप मागणी असते. आजच्या धकाधकीच्या जीवनव्यवहारातही गणपतीबाप्पाला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा हौसेने जपली जात आहे. त्यामुळे कच्च्या मालाला मागणी आहेच; परंतु त्यामानाने अधिक मागणी आहे ती ‘तयार’ मोदकांना! ग्राहकांची हीच गरज व्यावसायिकांना अधिक उत्पन्न देणारी ठरत आहे. अगदी २५ रुपयांपासून ३५ रुपयांपर्यंत एका उकडीच्या मोदकाची किंमत आकारली जाते. तर मावा मोदक ४०० रुपये किलो ते ८०० - १००० रुपये किलो या दराने विकले जातात. दर वर्षी या किमतीत वाढ होत असली, तरी ग्राहकांची संख्या मात्र कायम असते, किंबहुना ती वाढतच असते. 

बदलत्या काळातील; सतत नवीन, वेगळं, हटके काहीतरी हवं असणारा ग्राहक हा व्यावसायिकांमधील नवनिर्मितीला आणि पर्यायाने त्यांच्या व्यवसायवृद्धीला चालनाच देतो. म्हणूनच की काय, मोदक आपला मूळ पिंड कायम राखून दर वर्षी आगळ्यावेगळ्या रस-रंग-गंधांनी युक्त होऊन बाप्पांच्या भेटीला येतो. अर्थातच, मोदकाला या विविध रूपांत घडवणार्‍यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना आणि त्या कौशल्यपूर्णतेने प्रत्यक्षात उतरवण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगीच असते. चौसष्ट कलांचा अधिपती असणार्‍या गणपतीबाप्पाचं आगमनच जणू या कलाकारांना प्रेरणादायक ठरतं. म्हणूनच मावा मोदक, चॉकलेट मोदक अशा मोदकांच्या मुख्य प्रकारामध्ये दर वर्षी असंख्य चवीचे, रंगांचे उपप्रकार जन्म घेतात. आंबा मोदक, गुलकंद मोदक,काजू मोदक, बेसन मोदक, संत्रा मोदक, स्ट्रॉबेरी मोदक, व्हाईट चॉकलेट मोदक, डार्क चॉकलेट मोदक असे कितीतरी प्रकार बाजारात नव्याने येत आहेत.

पारंपरिक उकडीच्या मोदकांमध्येही डबल मोदकासारखे बाह्यरूपात बदल झालेले मोदक तर पाहायला मिळतातच, तसंच आतील सारणातही अनेक प्रयोग होताना दिसतात. याशिवाय पंचखाद्य, तळलेले मोदक, करंज्या (नेवर्‍या), पेढे, बर्फी, श्रीखंड, आम्रखंड, सुका मेवा या पदार्थांनाही या काळात मान असतो.

ऋषीपंचमीच्या दिवशी बैलाने नांगरलेल्या शेतात तयार झालेल्या कंदमुळांना विशेष महत्व असतं. म्हणूनच, अशा पदार्थांना या दिवसांत विशेष ‘भाव’ही मिळतो. या दिवसाचा विचार करून केवळ तेवढंच पीक घेणारा शेतकरीही या काळात आर्थिक संपन्नता अनुभवतो. गौरीपूजनासाठी अनारसे, पुरणपोळ्या, चिवडा, लाडू, चकल्या, शंकरपाळ्या असे फराळाचे सर्व पदार्थ अशा अनेक पदार्थांना प्रचंड प्रमाणात मागणी असते.

मागणी खूप असल्याने मोठ्या व्यावसायिकांबरोबरच छोटेछोटे घरगुती व्यवसायही या काळात जोमाने चालतात. कित्येक स्त्रियांना यानिमित्ताने रोजगार उपलब्ध होतो. हे पदार्थ नाशिवंत असल्याने जेवढी मागणी तेवढेच उत्पादन केले जाते. त्यामुळे व्यावसायिकांच्या दृष्टीने या काळातील खाद्यपदार्थांचा व्यवसाय फायद्याचा ठरतो.

आत्तापर्यंत आपण नैवेद्य म्हणून मागणी आसलेल्या पदार्थांचाच विचार केला. या काळात विशेषतः विसर्जन मिरवणुकांच्या काळात साबुदाणा वडा, बटाटा वडा, सामोसा, बुट्टा, चहा, कॉफी अशा विविध खाद्यपदार्थांची हातगाड्यांवरून ठिकठिकाणी होणारी विक्री ही इतर दिवसांच्या तुलनेत कितीतरी पटींनी वाढते.

गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांची मानसिकता ओळखून त्याप्रमाणे योग्य नियोजन करून खाद्यपदार्थांचं उत्पादन घेणाऱ्या अथवा विक्री करणाऱ्या व्यावसायिकाच्या मेहनतीला या सुखकर्त्याच्या आशीर्वादाने धनरूपी फळ मिळणारच  आहे, हे निश्चित!

- चित्रा नातू-वझे

[email protected]