राधाचा बाप्पा

दिंनाक: 28 Aug 2017 22:48:36

 

पर्यावरणपूरक गणपती 

आज रविवार असूनही राधा लवकर उठली होती. सगळं आवरून ती केतनमामाची वाट पाहत होती. तिचा तो उत्साह, अधीरता पाहून आईला एकीकडे गंमत वाटत होती आणि कौतुकही. शेवटी एकदाचा मामा आला. आल्या आल्या राधाने त्याचा ताबाच घेतला. आई त्याला चहा देईस्तोवरही तिला धीर धरवेना. केतनमामा आज घरच्या घरी गणपती बनवणार होता. एरवी राधाचे बाबा मालुसरेकाकांकडून गणपतीची मूर्ती घेत, पण या वर्षी राधाने हट्टच धरला होता इकोफ्रेंडली गणपती बनवण्याचा. कल्पना मावशीने शाडू माती आणून ठेवली होती. मावशीने सांगितल्याप्रमाणे राधाने वर्तमानपत्राचे तुकडे पाण्यात आधीच भिजवून त्याचा लगदा तयार केला होता. राधाच्या घराला छान गच्ची होती. गणपती बनवण्याचं सगळं सामान तिथेच एकत्र केलं होतं.

राधाची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. तिचा आनंद ओसंडून वाहत होता. मूर्ती कशी बनतेय याची उत्सुकता आजी-आजोबांनाही होती.  मोठ्या आरामखुर्चीत बसून आजोबा प्रत्येक कृती न्याहाळत होते. आजीही वातीचा कापूस घेऊन कोपर्‍यात भिंतीला टेकून बसली होती.

मामाने एकदा ‘गणपती बाप्पा मोरया!’ असा जोरात गजर केला आणि शाडू माती घमेल्यात घेऊन कामाला सुरुवात केली. प्रथम त्याने शाडू माती आणि भिजवून कुटलेला वर्तमानपत्राचा लगदा एकत्र मिसळला आणि दोन्ही गोष्टी एकजीव होतील, इतका मऊ गोळा मळून घेतला. तोवर मावशीने गणपतीच्या साच्याच्या दोन्ही भागांना शंखजिर्‍याची पावडर लावून घेतली. मामाची माती मळून  पूर्ण झाल्यावर त्याने मातीच्या गोळ्यांच्या, पोळपाटावर लाटतात तशा पोळ्या लाटल्या. आता या पोळ्या तो साच्यात दाबून बसवू लागला. राधाला त्याने यात मदतीला घेतलं होतं. आपल्या छोट्या हातांनी दाब देत तीही मोठ्या आनंदाने ते करत होती. शेवटी साचा पूर्ण भरून झाल्यावर मामाने त्याचे दोन्ही भाग जोडले आणि व्यवस्थित जुळवून ते घट्ट केले. पुढचं काम जरा अधिक कौशल्याचं होतं, ते म्हणजे साचा सोडवण्याचं. ते काम मावशीने केलं. हळूवार ठोकून घेत तिने फार सावकाशीने गणपतीची मूर्ती सोडवून घेतली. आता मात्र मूर्ती सुकेपर्यंत थांबायला हवं होतं. मावशीने ती तयार मूर्ती पाटावर ठेवली, तिच्या कडा नीट कोरून जास्तीची माती काढून टाकली. गणपतीची ती देखणी मूर्ती मोठी सुबक दिसत होती.

मूर्तीचं आजचं काम संपलं होतं, पण उद्याच्या रंगकामाची तयारी करायची होती. त्यासाठी राधाने मावशीला आपला खजिना उघडून दाखवला. मुलतानी माती, चंदन पावडर, एका डबीत कुटलेली शुद्ध हळद असं सगळं मावशीपुढेे मांडताना तिला काय करू नि काय नको असं झालं होतं. हळद राधाच्या गच्चीतच तयार झालेली होती. कुंकवाचं झाडं (चरश्रर्श्रेींीी झहळश्रळिशिपीळी) घरी लावलं होतं. त्यामुळे हळद-कुंकू अगदी घरचं होतं. कात आईने कुटून ठेवला होता. गच्चीतच उगवलेल्या मक्याच्या झाडावरची पिवळी बुरशी राधाने डबीत आधीच जमा करून ठेवली होती. इकोफ्रेंडली गणपतीचे रंगही अगदी इकोच होते.

राधाला दुसरा दिवस कधी उजाडतोय असं झालं. आज मूर्तीचं रंगकाम करायचं होतं. पुन्हा मावशी, मामा आणि राधा अशी सॉलिड टीम जमली. मामाने गणपती रंगवायला घेतला. मुलतानी मातीचे दोन थर दिले, तेव्हा कुठे गणपतीच्या शरीरावर रंग बसला. मग कुंकू पाण्यात भिजवून घेतलं. एवढ्यात आजी सहाण आणि रक्तचंदन घेऊन आली आणि तिने सहाणेवर रक्तचंदन उगाळून त्याचा दाटसर लाल रंग तयार करून रंगाच्या परळात काढून ठेवला. आजोबा चुन्याची डबी आणि भरपूर गुलाबाची ताजी फुलं घेऊन आले.

राधाने मावशीच्या सूचनेप्रमाणे डबीतील बुरशीची पावडर खलून, त्यात ओला चुना मिसळून गणपतीच्या रेशमी कदासाठी गडद अंजिरी रंग तयार करून घेतला. डाळिंबाच्या सालींपासून पिवळट सोनेरी, गुलाबाच्या फुलांपासून गुलाबी नीलमोहराच्या (जाकरंडा) फुलांपासून जांभळा असे विविध रंग तयार झाले. कधी चुना, तर कधी लिंबाचा रस मिसळून राधा त्या रंगांच्याच अनेक छटा तयार करत होती. मामा मोठ्या कौशल्याने रंगवत होता. हसत-खेळत गणपतीचं रंगकाम पुरं झालं.

आता फक्त उरली होती ती गणपतीची आखणी; म्हणजे डोळे रंगवण्याचं काम आणि राधाचा लाडका उंदीरमामा.

मामाने शिकवल्याप्रमाणे राधाने साच्यात माती भरून घेतली आणि हलक्या हाताने तयार झालेला उंदीरमामा अलगद सोडवून घेतला.

हे काम तिने अगदी एकटीने केलं. आता हवा होता तो काळा रंग. आजीने लोखंडाच्या कढईत आवळ्याची पूड उकळवून गडद काळा रंग तयार केला होता. आईने कंदिलाची काजळी जमा केली होती. मामाने काजळीचा काळा रंग आणि चुना वापरून गणपतीचे डोळे रंगवले. राधाने आवळ्याच्या रंगाने उंदीरमामा रंगवला.

गणपतीची रंगवलेली मूर्ती मोठी देखणी दिसत होती. राधाला खूप आनंद झाला होता.

राधाचा खराखुरा इकोफ्रेंडली गणपती तयार होता. यासाठी घरातल्या सगळ्यांनीही तिला खूप मदत केली होती. आजोबा-आजींनी खूप मेहनतीने नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी भरपूर प्रयोग केले होते. थोड्या मेहनतीने  आणि सर्वांच्या सहकार्याने एक पर्यावरणपूरक सुंदर मूर्ती घडली होती.

पर्यावरण रक्षणाचा नुसता उपदेश न करता, राधाच्या घरच्यांनी प्रत्यक्ष कृती करून त्याचं महत्त्व तिच्या मनावर ठसवलं होतं.

- मैत्रेयी केळकर

[email protected]