गणेश पूजन

गणेश चतुर्थीनिमित्त अभ्यासाचे किंवा नवनवीन ज्ञानाचे संकल्प करावयाचे असतातरसरसलेला निसर्ग आणि माझ्या आतला ‘मी’ यांचे सामरस्य घडवावयाचे असतेविनम्र मनाने साधना करावयाचीप्रसन्न मनानेआर्ततेने श्री गजाननाची आरती करावयाचीत्याला हात जोडून म्हणावयाचेहे प्रभोआम्हाला निरोगी ठेवज्ञानाने आणि सत्कृतींनी आमची मने सुंदर ठेवआम्हाला निर्भय करकोणीही आमच्यावर हल्ला केल्यास त्याला चोख उत्तर देण्याचे सामर्थ्य दे.

आपल्याकडे वेदकाळापासून श्री गणेशपूजनाची प्रथा आहे. वेदाने ॐकाराला गणेशाचे रूप मानले. गणेशाने अखंड ज्ञानाचे व्रत घेतले. बुद्धीच्या जोरावर राक्षसांचा नाश केला. ज्ञानी साधकाशी संवाद साधला. पृथ्वीला दृष्टी दिली. रसाला प्रतिष्ठा दिली. तेजाला अंतरिक्षाची झेप दिली. ज्ञानाच्या आकाशातून जगण्याच्या कक्षा विशाल केल्या. ज्ञानासाठी आसुसण्याची वृत्ती महत्त्वाची आहे. आज ज्ञानापेक्षा त्याचे मार्केटिंग सवंग झाले आहे. त्यामुळे ज्ञानाला खोली लाभत नाही. वरवर पृष्ठभागावर मिरवायच्या सवयीने ज्ञानातली अस्सल तहान नाहीशी झालेली दिसते. विज्ञानातील संशोधनापेक्षा तंत्रज्ञानातील तांत्रिकता महत्त्वाची ठरली आहे. यातून झटपट पैसा मिळतो. माणूस स्वस्थ होतो. ही सवय घातक आहे. यामुळे आपण पुढे जात नाही. आहे तिथेच डबक्यात वळवळ करीत राहतो. गणपती अथर्वशीर्षाने या मानवी स्वभावावर नेमके बोट ठेवले आहे. गणेशाला असे आवडत नाही; म्हणून गणेश पुराणात स्पष्ट म्हटले आहे, मुळापासून ज्ञान घ्या. जीवनात सतत शिकत राहा. त्यामुळे आपण व्यापक होतो. आपल्यात संघटनकौशल्य येते. यातून अपप्रवृत्तींविरुद्ध संघर्ष करता येतो. समाज सुविद्य होतो. सहतत्त्वाचा उपासक बनतो.

चतुर्थी ही आत्मज्ञानाची चंद्रकोर आहे. तशीच ती विज्ञानाची प्रकाशवाहिनी आहे. संवादातून नवे ज्ञान प्रकटते. असे ज्ञान मननात उतरते. मननातून चैतन्याला आमंत्रित करते. चैतन्य सर्वगत होते. विराटपणाची नवी जाणीव निर्माण होते. हे आत्मज्ञानाचे सूत्र आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी हे सूत्र लक्षात घेऊन पूजा करावयाची असते. वैदिक काळात गणेशाची पार्थिव पूजा होई. पार्थिव पूजेचे महत्त्व आजही आहे. आपला देह पंचमहाभूतांपासून निर्माण झाला आहे. त्यातील पृथ्वी मानवी भूतमात्राला निवास करू देते. पृथ्वीवरील मातीपासून आपला देह होतो. देह चांगला असेल, तर तिथली मातीही चांगली असते. मातीमुळे सर्जनाच्या नववाटा खुलतात. मूलाधार चक्राजवळची कुंडलिनी मातीत वास करते. मातीतून वृक्ष येतो. फळे येतात. फुले येतात. शिवाय शरीर हे मातीतून येते आणि मातीतच जाते. माती आहे म्हणून माणूस आहे. आज लहान मुलांना खेळायला माती नाही. त्यामुळे मुले हिंस्र होत आहेत. आम्हाला लहानपणी मुद्दाम मातीत खेळायला लावायचे. त्यामुळे अवयव निरोगी होत. सर्दी क्वचित होई. मातीत लपलेले ऋतू अंगात फुलत. मातीतल्या स्वच्छ हवेने मनाला तरतरी येई. माती पृथ्वी आहे. अशा पृथ्वीविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मानवाने पार्थिव पूजा निर्माण केली. पार्थिव म्हणजे पृथ्वीने दिलेले आणि पृथ्वीने घेतलेले. पार्थिव पूजा मानवाला जगण्याचे भान देते. म्हणून भारतीय संस्कृतीत शिवपूजा, हरितालिकेची पूजा, गणेशपूजा, देवीपूजा या महत्त्वाच्या पूजा मानल्या जातात.

गणेशाची प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ही पार्थिव होऊ शकत नाही. म्हणून मातीची गणेशाची मूर्ती करायची. कारण मातीच्या पार्थिवातूनच ॐकार प्राणप्रतिष्ठेच्या रूपातून फुटतो. माती स्वसंवेद्य होते. ती आत्मरूपाला प्रकाशित करते. नव्या शोधाच्या वाटा दिसू लागतात. ही पार्थिवता जगण्याचे भानही देते. मृत्यूची खूण दाखवते. जन्म आणि मृत्यू या दोन ध्रुवांमध्ये वावरणारा ‘मी’ आत्मज्ञानी झाला पाहिजे. त्याने विज्ञाननिष्ठ राहिले पाहिजे. जगण्यातील जाणीव सश्रध्द असली पाहिजे. म्हणून गणेशाची पार्थिव पूजा नेहमीच प्रेरणादायी ठरते. मोठमोठया मूर्ती करून आपण पृथ्वीला विनाकारण त्रास देतो. माती खणून आपण अल्पायुषी होतो. अकारण होणारे अपघात हे गाडीच्या वेगाचे नसतात. ते मनाच्या (आ)वेगाने निर्माण केलेले मृत्यूचे थांबे असतात. थर्माकोलच्या आराशी करून आपण हवा विनाकारण दूषित करतो. मोठमोठे दिवे लावून झोपडपट्टया मात्र अंधारात ठेवतो. प्रकाशाच्या बेगडी रूपात श्री गणेश कसा थांबणार? रस्त्यांवर कर्कश रेकॉर्ड्स लावून आपणच माणसाला नाहीसे करीत आहोत. आवाज पसरल्याने माणसे गोळा होत नाहीत. उलट आवाज नसलेल्या ठिकाणी गणेश सुंदर दिसतो. म्हणून ज्ञानदेवांनी त्याला  सकलमतिप्रकाशु असे म्हटले आहे.

आरास नैसर्गिक असते. कृत्रिम नसते. दोन वृक्षांच्या फांद्या इतक्या सहजपणे मिसळतात की त्यातून मैत्रीचे सुंदर फूल फुलते, ते बघत राहावेसे वाटते. तशी आरास असावी. असे जगणे माणसाचे गाणे होते. माणूस अशा आराशीतून बहरतो. नाहीतर गणपतीला अंगभर सोन्याचे दागिने घालावयाचे, शेजारी पोलिसांचा ताफा ठेवावयाचा. यातून गणेश दिसतो का? ‘दुरून दर्शन घ्या’ अशी पाटी अनेक ठिकाणी असते. परंतु ही पाटी लावणार्‍यांना याचा अर्थ कितपत कळला आहे, कोणास ठाऊक? आमच्या अध्यात्मशास्त्रात दुरून म्हणजे व्यापक होऊन, मग दर्शन घेणे हा अर्थ आहे. अवयव मोकळे होऊन देवाला गाढ आलिंगन देणारा वारकरी हरिपाठ गाता गाता जसा मोकळा होतो, तसे देवाचे मोकळे दर्शन घ्यायचे असते. गर्दीच्या रांगा देवाशी कितपत भिडतात. अशांशी गणेश बोलतो का? एका हातात नारळ, फुले, दुसरा हात खिशातील पाकिटाशी घट्ट धरलेला. डोक्यावर डोके आपटतेच आहे. श्वासात श्वास गुदमरत आहेत. अशांना ‘देवाचिये द्वारी। उभा क्षणभरी। तेणे मुक्ती चारी। साधियेल्या॥ हे कसे लक्षात येणार? गर्दीतून सुंदर दर्शन घेता येते. त्यासाठी आपल्याबरोबर दर्शन घेणारे इतरही आहेत, याचे गर्दीतल्या माणसांना भान असावे लागते. गर्दीने शिस्त स्वीकारली; तर गणेशही आनंदित होतो. मूर्तीवर फुले फेकायची नसतात. मोदक आपटायचे नसतात. सगळयांना दर्शनाचा आनंद मिळतो. हे पथ्य थोडेसे पाळले, रस्त्यारस्त्यातून बसवलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांनी थोडीशी सभ्यता प्रकट केली आणि गर्दीने त्यांना जराशी चांगल्या शिस्तीची सोबत केली, तर गणेश उत्सवाचा आनंद थेट लो. टिळकांपर्यंत पोहोचेल, यात शंका नाही. आजच्या गर्दीतून निर्माण होणार्‍या विकृती नाहीशा होतील.

सार्वजनिक गणेश उत्सव विशिष्ट पध्दतीने केले, तर ते स्मरणीय ठरतात. सक्तीची वर्गणी वसूल न करता, प्रेमाने जी काय वर्गणी मिळेल, ती आनंदाने घ्यायला काही हरकत नाही. भपकेबाजीची गरज नाही. कुणाचा मंडप मोठा, यावर महाचर्चा करण्याची गरज नाही. सुटसुटीत मांडव घालून हजारो लोक दर्शन घेऊ शकतात. पंढरीचे राऊळ तेच आहे. परंतु लक्षावधी वारकरी राऊळातून दर्शन घेऊन पुनीत होतात. मंडळांना असे सहज करता येईल. रस्त्यांवर देव आणण्यापेक्षा देवांसाठी छोटी वाट करता येते. रहदारीला त्रास नको. ध्वनिप्रदूषण अजिबात नको. रात्रभर गाणी वाजवायची कशाला? त्याऐवजी रोज सकाळ-संध्याकाळ श्रींची आरती करावी. मंत्रपुष्पांजली म्हणावी. पसायदान गावे. एवढे पुरेसे आहे. वर्गणीतून गरीब मुलांना पुस्तके द्यावीत, ज्यांच्याकडे कपडे नाहीत, त्यांना कपडे द्यावेत. अभ्यासिका बांधाव्या, गरीब मुलांना शिष्यवृत्ती द्याव्या. संध्याकाळी दोन तास मनोरंजनाचे आणि ज्ञानरंजनाचे कार्यक्रम आयोजित करावे. विद्वानांची व्याख्याने ठेवावी. शांततेने शेतात किंवा नदीकाठी श्रींना निरोप द्यावा. मूर्ती साधी असावी. मातीचा उपयोग शेतीसाठी व्हावा. असा गणेश उत्सव होऊ शकतो. असे काही उत्सव सध्या होत आहेत. पण ते मोजके आहेत. कुणालाही ध्वनिप्रदूषणाचा त्रास नसावा.

गणेश चतुर्थीनिमित्त अभ्यासाचे किंवा नवनवीन ज्ञानाचे संकल्प करावयाचे असतात. रसरसलेला निसर्ग आणि माझ्या आतला ‘मी’ यांचे सामरस्य घडवावयाचे असते. श्रुतिस्मृतिपुराणोक्तपेक्षा हा संकल्प ज्ञानोक्त आणि विज्ञानोक्त आहे. विनम्र मनाने साधना करावयाची. निसर्गाला मोकळिक द्यावयाची. निसर्गाच्या जागेवर आक्रमण करावयाचे नाही. प्रसन्न मनाने, आर्ततेने श्री गजाननाची आरती करावयाची. त्याला हात जोडून म्हणावयाचे, हे प्रभो! आम्हाला निरोगी ठेव. ज्ञानाने आणि सत्कृतींनी आमची मने सुंदर ठेव. आम्हाला निर्भय कर. कोणीही आमच्यावर हल्ला केल्यास त्याला चोख उत्तर देण्याचे सामर्थ्य दे. विकृती संपू दे. आमच्या संस्कारशील मनांना नीट सांभाळ.

आजच्या काळात गणेशपूजन असे असावे!

- यशवंत पाठक

संत ज्ञानदेव अध्यासन प्रमुख, पुणे विद्यापीठ