योगनिद्रा 

नमस्कार मित्रांनो,

मागच्या महिन्यात सांगितलेली योगनिद्रा घेऊन पाहिलीत की नाही? कसं वाटलं योगनिद्रा झाल्यावर? खूप शांत, छान असं वाटले की नाही ? हाच तर या योगनिद्रा प्रक्रियेचा हेतू आहे. या वेळी आपण आता आणखी मोठ्या वयोगटासाठी, म्हणजे साधारण इयत्ता सहावी ते दहावीच्या मित्रांसाठी योगनिद्रा कशी घ्यायची ते पाहू या!

ज्या ठिकाणी आपण योगनिद्रा घेणार आहोत ती जागा शांत, हवेशीर, प्रसन्न असावी, आपल्याला पाठीवर झोपायचं असल्यामुळे एक जाडसर सतरंजी जमिनीवर असावी.

योगनिद्रेला आता सुरुवात करू या.

आपलं पूर्ण शरीर अगदी शिथिल सोडा, ढीलं सोडा. शरीराचा प्रत्येक स्नायू, प्रत्येक अवयव, अगदी जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक शिथिल सोडून द्या, ढिला सोडून द्या. सुटणाऱ्या श्वासाबरोबर आपल्या शरीरावरचा सगळा ताण आपण सोडून देत आहोत अशी कल्पना करा. सुटणाऱ्या श्वासाबरोबर, आपल्या शरीराचं वजन आपण जमिनीला देऊन टाकत आहोत अशी कल्पना करा. आपलं शरीर आता अगदी हलकं झालेलं आहे. कापसासारखं, पिसासारखं हलकं झालेलं आहे आणि हलकं होऊन जमिनीपासून काही अंतरावर तरंगतय अशी जाणीव निर्माण करा. आता आपल्याला झोप लागेल की काय असं वाटतंय. पण योगनिद्रा संपेपर्यंत मी जागा राहणार आहे, झोप येऊ देणार नाही असा निश्चय करा.

आता आपण आपल्या शरीराच्या एकेका अवयवाला मनाने स्पर्श करून येणार आहोत. सुरुवातीला शरीराची उजवी बाजू. उजव्या पायाचा अंगठा, शेजारचं दुसरं बोट, तिसरं बोट, चौथं बोट, करंगळी. उजव्या पायाची पाचही बोटं. उजवा तळपाय, टाच, घोटा, पोटरी, गुडघा, मांडी, संपूर्ण उजवा पाय. उजवी कंबर, उजवी पाठीची बाजू, ओटीपोट, पोट, छाती, खांदा, बगल, उजवा दंड, कोपर, मनगट, उजवा तळहात.

 (याचप्रमाणे डाव्या बाजूच्या अवयवांची नावं घ्यावी)

आता शरीराची जमिनीवर टेकलेली बाजू, शरीराची वरची बाजू, संपूर्ण चेहरा, कपाळ, डोक्याचा वरचा भाग, मागचा भाग.

सगळं शरीर अगदी शिथिल झालंय. श्वास संथ झालाय. तुमच्या मिटलेल्या डोळ्यांसमोर आता मी सांगतोय, त्याप्रमाणे एक सुंदर दृश्य पाहायचं आहे.

आता तुमच्या मस्तकात एक तारा आहे अशी कल्पना करा. त्या ताऱ्यातून निळसर छटा असलेला शुभ्र प्रकाश बाहेर पडतो आहे. तो प्रकाश सगळं काही उजळून टाकतो आहे. तुमच्या मनात असणाऱ्या प्रत्येक वस्तूला तो प्रकाश उजळून टाकतो आहे. आता मी काही वस्तूंची नावं उच्चारणार आहे. त्या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या शांत निळसर प्रकाशात दिसतील. एखादी वस्तू नाही दिसली तरी बिघडत नाही. लाल रंगाची गुलाबाची कळी. ती कळी हळूहळू उमलते आहे आणि तिचं आता टपोरं फुल झालेलं आहे. लाल क्रिकेटचा चेंडू, अथांग समुद्र किनारा, रंगीबेरंगी शंख-शिंपले, समुद्रात तरंगणारी लहान होडी, आकाशात उडणारा पतंग, फुलांवर बागडणारं फुलपाखरू, आकाशातालं इंद्रधनुष्य, पाण्याचा धबधबा, हिरवा फुगा, खेळणारी मुलं, ध्यानस्थ बसलेला योगी, हिमालयातील शिखरं, उगवता सूर्य, निळेभोर आकाश, काळे-पांढरे ढग, उडणारा पक्षी, नदीतली बोट, पिवळा चौकोन, लाल वर्तुळ, पांढरा त्रिकोण, काळं टिंब...

आता तुमचं लक्ष दोन भुवयांच्यामधे न्या. तिथून सोनेरी प्रकाश तुमच्या संपूर्ण डोक्यात पसरला आहे. तो सोनेरी प्रकाश तुमची बुद्धी, तुमची स्मरणशक्ती प्रखर करतो आहे. त्या सोनेरी प्रकाशानं तुम्हाला व्यापून टाकलं आहे.

आता पुन्हा लक्ष शरीराकडे द्या. जमिनीवर तुम्ही झोपलायत तिकडे लक्ष द्या. मनातल्या मनात म्हणा ... मी सगळ्यांवर प्रेम करीन... मी मोठ्यांचं ऐकेन... मी नियमित अभ्यास करेन... मी नियमित खेळेन...

आता हातापायाच्या बोटांची किंचित हालचाल करा. हातपाय हळूवार हलवा. सावकाश डोळे उघडा. इकडे तिकडे पाहा. हातांचे तळवे अलगद डोळ्यांवरून फिरवा. चेहऱ्यावरून फिरवा. सावकाश डाव्या कुशीवर वळा. हळूच उठा.

योगनिद्रेचा अभ्यास संपलाय. सगळ्यांनी माझ्यामागून प्रार्थना म्हणायची आहे...

सदा सर्वदा योग तुझा घडावा I

तुझे कारणी देह माझा पडावा I

उपेक्षू नको गुणवंत अनंता I

रघूनायका मागणे हेचि आता I

 II जय जय रघुवीर समर्थ II

वयानुरूप योगनिद्रा नक्की वाचा या सदरातून 

 विद्यार्थ्यांसाठी योगनिद्रा – भाग ३ (वयोगट ५ ते १० वर्षे)

- मनोज पटवर्धन

patwardhanmano[email protected]