वर्गात पाठ्यपुस्तक शिकणे म्हणजेच शिक्षण नव्हे; तर अनेक विषयाचे ज्ञान ग्रहण करणे आणि त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग करणे म्हणजे खरे शिक्षण. ही संकल्पना मॉडर्न हायस्कूल या शाळेने प्रत्यक्षात आणण्यासाठी ‘भिंतीपलीकडची शाळा’ असा उपक्रम राबवायचे ठरवले. या उपक्रमांतर्गत बुधवार, दि. २३ ऑगस्ट रोजी शिक्षणविवेक आयोजित ‘पपेट तयार करणे’ ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत सुरुवातीला स्वाती देवळे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. शिक्षणविवेक उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे यांनी शिक्षणविवेक मासिक व संकेतस्थळाबद्दल माहिती सांगितली. शिक्षणविवेक समुपदेशक मानसी भागवत आणि रानडे बालक मंदिर शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका वर्षा जोशी यांनी ‘पपेट शो’ला सुरुवात केली. गोष्ट ऐकण्यापेक्षा पाहण्यात जास्त मजा येते, असा आपला अनुभव आहे. त्यामुळे या कार्यशाळेत पपेटच्या माध्यमातून गोष्ट सांगण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सुरुवातीला मानसी भागवत यांनी ‘पपेट शो’ म्हणजे काय ते सांगून  सुरेश शेलार लिखित ‘रेस २’ ही गोष्ट पपेटच्या माध्यमातून सादर केली. वेगवेगळ्या प्राण्यांच्या पपेट, आवाजातील चढ-उतार, गमतीशीर शब्दफेक यांमुळे प्रत्यक्ष प्राणी बोलत आहेत, असा भास होत होता. गोष्ट ऐकताना मुलांना वेगळीच मजा येत होती.

गोष्टीतील पपेट पाहून मुलांनासुद्धा पपेट तयार करण्याचा व गोष्ट सांगण्याचा अनुभव घ्यायचा होता. म्हणून मानसी भागवत यांनी फिंगर पपेट, स्टिक पपेट, कॅप पपेट, ग्लव्ह पपेट, सॉक्स पपेट, रॉड पपेट असे पपेटचे प्रकार दाखवले आणि त्याबद्दल माहिती सांगितली. सर्वांत सोपी वाटणारी पण तरीही बनवायला अवघड असणारी स्टिक पपेट या वेळी मुलांनी बनवली. पपेट तयार करण्याचे प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर मुलांनी झाड, माकड, टोपीवाला, फुलपाखरू, भोपळा, म्हातारी, पोपट अशी गोष्टीतील भूमिकांची स्टिक पपेटस बनवली. रुपाली निरगुडे यांनी विद्यार्थ्यांना पपेट तयार करायला मदत केली. एका विद्यार्थ्यांने ‘रावणा’चे पपेट तयार केले होते. त्याने मंचावर येऊन रावणाचे पपेट आणि त्याचे एक गाणे सादर केले. ते पाहून ४-५ विद्यार्थ्यांनी ‘टोपीवाला आणि माकड’ ही गोष्ट सादर करायचे ठरवले. गोष्ट सदर करताना कोठे थांबायचे, हातांची व बोटांची हालचाल कशी करायची, कोणत्या वेळी कोणती पपेट पडद्यावर धरायची याच्या सूचना मानसी भागवत यांनी दिल्या. या गोष्टीला वर्षा जोशी यांनी आवाज दिला. कोणताही सराव नसताना उस्फुर्त अशी गोष्ट विद्यार्थ्यांनी उत्तमप्रकारे सादर केली. विद्यार्थ्यांना या सादरीकरणाचा वेगळा आनंद मिळाला, हे त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होते. पहिल्यांदाच असे सादरीकरण केल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनादेखील मजा येत होती.  

      इ. ५वी ते ७वी च्या ९२ विद्यार्थी आणि ८ शिक्षकांनी या कार्यशाळेचा अनुभव घेतला. दीड तासाच्या या कार्यशाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांना गोष्ट सांगण्याच्या एका नवीन पद्धतीची माहिती मिळाली. विद्यार्थी आणि शिक्षकांना कार्यशाळा खूप आवडल्याचे त्यांच्या अभिप्रायातून समजले. यानंतरही असा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांनी ‘पपेट शो’ चे सादरीकरण करण्याची कल्पना मांडण्यात आली. कार्यशाळेत शेवटी तृप्ती वाव्हळ यांनी शिक्षणविवेकचे आभार मानले आणि कार्यशाळेची सांगता झाली.

- प्रतिनिधी 

[email protected]