राजूची आई

दिंनाक: 21 Aug 2017 12:10:36

 


राजू शाळेतून घरी आला, तेव्हा त्याची आई आणि शेजारची मेघाकाकू दोघी गप्पा मारत बाल्कनीमध्ये उभ्या होत्या. ‘आई!’ राजूने मोठ्यांदा आईला हाक मारली. आईचे लक्ष नव्हते. ती बोलण्यात गर्क होती. राजूला खूप राग आला. त्याने बूट, मोजे, दप्तर, डबा, वॉटरबॅग सगळे इकडेतिकडे फेकून दिले आणि जोरात टी.व्ही. लावला. टी.व्ही.चा कर्कश आवाज ऐकून आई लगबगीने आत आली. बघते तर काय राजूच्या गालावर टम्म फुगलेल्या रुसव्याच्या पुर्‍या व आजूबाजूला अस्ताव्यस्त पसारा. बाप रे! एवढा घुस्सा? ‘राजू, अरे इतकं रागवायला झालं तरी काय?’ आईने आश्चर्याने विचारले. राजू आपला गप्प. आईनेसुद्धा न बोलता घर आवरायला घेतले. राजूचे दप्तर उचलले तर त्यातून टपकन काहीतरी पडले. काय? चक्क बक्षीस? हो. ‘मातृदिन’ या विषयावर सुरेख भाषण केल्याबद्दल चिनूला पहिले बक्षीस मिळाले होते.
राजू तसा हुशार, शिवाय बोलणे अगदी गोड. त्यामुळे त्याचे भाषण नेहमी सर्वांना आवडते. त्या दिवशीसुद्धा त्याने आईच्या मुलांच्या गोष्टी शाळेत सांगितल्या. महाकाय असणार्‍या पृथ्वीच्या एका छोट्या भागात आपण राहतो त्याचे नाव भारत. आपल्या देशाला भारत हे नाव कशावरून पडले? भरत नावाच्या शूर पराक्रमी पुत्रामुळे. आपल्या मातृभूमीला जसे  स्वतःच्या गौरवशाली मुलाचे नाव लावायला आवडते, तसेच भारतामधल्या काही मुलांना आपल्या आईचे नाव लेवून मोठे व्हावेसे वाटते, असे इतिहास सांगतो. महाभारतकाळी अशी पद्धत होती. महापराक्रमी अर्जुनाचे एक नाव ‘पार्थ’ असे होते. त्याच्या आईचे म्हणजे कुंतीचे नाव पृथा होते त्यावरून पार्थ. तसेच कर्णाला ‘राधेय’ म्हणत. त्याच्या आईचे नाव राधा होते.
अलीकडच्या काळात विनोबा म्हणत, मी माझ्या आईचा मुलगा आहे. आईने केलेल्या संस्कारांमुळे मी संपूर्ण समाजाला ‘आई’ मानले आणि तिच्या स्वास्थ्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न केले, म्हणजे संस्कार, प्रेम, दया, शिक्षण, आरोग्य आणि सर्व जगाचे कल्याण व्हावे, ही भावना म्हणजे आई. एखाद्या स्त्रीला बाळ झाले म्हणजेच ती आई झाली असे नाही, तर कोणत्याही व्यक्तीमध्ये स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी यांच्यात हे गुण प्रकट झाले म्हणजे सगळे ‘आई’ होतात. राजूचे भाषण सर्वांना खूप आवडले. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. राजूच्या बाईंनी त्याचे खास कौतुक केले. हे सगळे आईला कधी सांगतो असे राजूला झाले होते आणि आई गप्पांमध्ये रमलेली होती. त्यामुळे राजू चिडला. राजूचा राग बघून आईला हसू आले. ‘हसतेस का गं? तुझं मुळी माझ्यावर प्रेमच नाही. माझ्या बक्षिसाचे तुला कौतुक नाही.’ राजू नेहमीप्रमाणे आईला बोलत होता. आई उठली तिने राजूला घट्ट मिठी मारली. त्याच्या केसातून हात फिरवत त्याचा एक पापा घेतला. राजूचा राग कुठल्या कुठे पळाला, तरी तो खोटे खोटे म्हणाला, ‘ए आई, आता मी मोठा झालो आहे. कोणी बघितलं तर?’ ‘असू दे रे राजू. आईसाठी तिचा मुलगा मोठ्ठा होऊनही छोटाच असतो,’ आई म्हणाली. ‘तू जेवून घे. मग तुला मला काही सांगायचं आहे.’ आईचा चेहरा जरा गंभीर झाला.
त्या दिवशी अंगावरती धावत आल्यासारखा मोठ्या थेंबांचा सतत पाऊस पडत होता. सगळीकडे पाणी साचून जागोजागी तळे साचले होते. राजूच्या घरात मागच्या बाजूला असलेला नाला भरून वाहत होता. त्या पाण्याच्या आवाजाने भीती वाटत होती. नाल्यालगत गरीबांची छोटी-मोठी घरे होती. कष्ट करून जमवलेला संसार होता. रात्री त्या घरांमध्ये पाणी शिरले आणि घरामधल्या सगळ्या वस्तू वाहून गेल्या. तिथले लोक घाबरले. लहान मुले, म्हातारी माणसे यांना कुठे न्यायचे हा प्रश्न पडला. राजूच्या घरी काम करणार्‍या सखूबाई तिथेच राहत होत्या. त्या रडत रडत राजूच्या आईकडे आल्या. ओले कपडे, सुजलेले डोळे सगळे काही पाण्यात वाहून गेल्यामुळे चिंता आणि भुकेली मुलेबाळे. सखूबाईंना काही सूचत नव्हते. आईने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. लगेच कॉलनीमधल्या बायकांना बोलावले. सर्वांनी मिळून विचारपूर्वक निर्णय घेतला. सखूबाई आणि तिच्या आसपास राहणार्‍या लोकांना सोसायटीतील हॉलमध्ये आसरा दिला. लहान मुलांना दूध, फळे, औषधे, सर्वांसाठी चहा, जेवण याची व्यवस्था केली. कॉलनीतल्या सगळ्या काकूंची मिटींग झाली. त्यांनी ठरवले की, जोपर्यंत या लोकांना गरज आहे, तोपर्यंत त्यांना मदत करायची. राजूची आई लिडर होती. ती योजना करून पूर्णत्वाला नेत होती. राजू शाळेतून आला तेव्हा ती शेजारच्या मेघाकाकूंशी हेच महत्त्वाचे बोलत होती. राजूच्या घरात कपडे, चादरी, भांडी असे बरेच सामान गोळा झाले होते. आईने त्यांची लिस्ट करून ते व्यवस्थित लावले. राजूच्या घरी मोठ्या भांड्यात पुलाव शिजत होता. मेघाकाकू तिच्याकडे पुर्‍या करत होती. सर्वत्र गडबड, धांदल होती. प्रेमाने, आवडीने लोक मदत करत होते.
राजूने हे ऐकल्यावर त्याला वाईट वाटले. आपण उगीच आईवर चिडलो. आपण सेल्फीश आहोत की काय, असेही वाटले. त्याचा गळा दाटून आला. आईने हे लगेच ओळखले. ती त्याच्याजवळ येत म्हणाली, ‘राजू, चल ऊठ, तुझ्या मित्रांना गोळा कर. जुन्या-नव्या वह्या, पेन्सिली, पेन, दप्तर कॉलनीमध्ये पुरवायची जबाबदारी तुमची मित्रमंडळींची. नीट काम करा आणि शाबासकी मिळवा. जा पटकन.’ राजू तत्काळ बाहेर पडला.
सोसायटीच्या हॉलमध्ये सर्वस्व हरवलेली ती माणसे बसली होती. त्यांच्या एका डोळ्यात रडू आणि एका डोळ्यात हसू होते. त्यांना समाजातल्या लोकांनी त्यांच्या संकटकाळी देवासारखी मदत केली होती. धीर दिला होता. या बळावर ते पुन्हा उभे राहण्याची मनापासून तयारी करत होते.
राजूच्या हातात त्याच्या वाढदिवसाला बाबांनी गिफ्ट दिलेली रिमोटची लाल दिव्याची गाडी होती. ती गाडी तो सखूबाईंच्या मुलाला - विलासला खेळायला देणार होता. राजूची ही कृती बघून आईचे डोळे भरून आले. आईला वाटले, आई ह्या शब्दाचा खरा अर्थ ‘करुणा’ आहे. दुसर्‍यांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी धावून जाणे म्हणजे मातृत्व. नुसते भाषण करण्यापेक्षा राजूला त्याचा खरा अर्थ कळला हे महत्त्वाचे आहे. राजूवरचे संस्कार त्याला पुढच्या आयुष्यात उपयोगी पडतील, याची आईला खात्री होती. रात्री राजूने आईला नमस्कार केला; म्हणाला, ‘आई आजचा ‘मातृदिन’ माझ्या सदैव स्मरणात राहील.’
- स्नेहा शिनखेडे