पाया रचताना 
पहिलीचा वर्ग हा बालकांच्या शालेय जीवनात सर्वात महत्त्वाचा वर्ग आहे, कारण तिथूनच त्याच्या औपचारिक शिक्षणाचा पाया घातला जातो. हा पाया जितका मजबूत, तितकी इमारत अधिक भक्कम बनते यात शंका नाही. अन्यथा गैरहजरी, गळती, अप्रगत, शाळाबाह्य अशा समस्या उद्भवतात. म्हणूनच मूल शाळेत कसं येईल, खेळ, गप्पागोष्टी, गाणी यातून शाळेची गोडी निर्माण झाली की त्याच्या पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर होतो.
मी पहिलीचा वर्ग घेण्यापूर्वी एक काम केलं. माझ्या वयातून ४१ वर्षे वजा केली. हो, मुलांना सतत ओरडणारा, छडी उगारणारा, हुकूमशहा न वाटता मनातलं बोलता येऊ शकणारा मित्र वाटला पाहिजे. यामुळे उबदार घरातली मायेची माणसं सोडून आल्यावरचा ताण त्यांना उरणार नाही. अन्यथा मूल शिकतं होण्याऐवजी त्याच्या मनात शिक्षक आणि शिक्षण याविषयी तिटकारा निर्माण होतो आणि प्रथम ग्रासे मक्षिकापात घडतो.
माझी ही बालकं म्हणजे मुक्तपणे भिरभिरणारी निरागस रानपाखरंच आहेत. कुठलंच औपचारिक पूर्वप्राथमिक शिक्षण न घेतलेल्या या बालकांना पहिलीत शिकवणं खरंच आव्हानात्मक. त्यातून त्यांची मातृभाषा पावरी परिसरातील बोली अहिराणी. त्यांच्याकडे टीव्ही, वर्तमानपत्र, रेडिओ काही नाही म्हणून मराठी ऐकवण्याचा एकमेव स्त्रोत म्हणजे वर्गशिक्षक अर्थात मी. अशा परिस्थितीत अध्ययन अनुभवांची कल्पक आणि सातत्यपूर्ण योजना करणं एवढंच शिक्षकांच्या हाती असतं. शिक्षकानं नुसते उपक्रम, कृती, न करता त्यामागील उद्दिष्ट स्पष्ट असले पाहिजे म्हणजे नेमकेपणा येतो.
अनेकदा शिक्षकांचे संबोध स्पष्ट झालेले नसतात. ज्ञानरचनावाद हा हल्लीचा परवलीचा शब्द आहे. ज्ञानरचनावाद म्हणजे केवळ फरशा रंगवणं असा मर्यादित अर्थ काही मंडळींनी घेतला आहे. विद्यार्थी स्वतः आपल्या ज्ञानाची  निर्मिती करतो आणि शिक्षक संसाधक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.
वर्ग जितका लहान, तितकं शैक्षणिक साहित्य जास्त महत्त्वाचं ठरतं. फार चकाचक, महागडं शैक्षणिक साहित्य मी वापरत नाही. साडीचे जुने खोके, साडीचे कव्हर, पुठ्ठे, जुन्या लग्न पत्रिका, इ. साहित्यातून शून्य खर्चात शैक्षणिक साहित्य बनवते आणि या स्वहस्ते निर्माण केलेल्या साहित्याला मुलांना मुक्तपणे हाताळू देते. प्रत्येक घटकनिहाय साहित्याचा वापर अध्ययनात, तसेच अध्ययन दृढीकरणासाठी करता येतो.
सुरुवातीला मी बडबडगीते, बालगीते घेतली. जुन्या पुस्तकातील / रद्दीतील चित्रे कापून पुठ्ठ्यावर चिकटवून दिली. मग ही चित्रे कटरने कापली. अशा प्रकारे बनवलेली पझल जोडताना मुलांना खूप मजा आली.
भाषेच्या पाठ्यपुस्तकातील सर्व शब्दांची कार्डे तयार केली. यामुळे प्रत्येक घटकावर कृती, खेळ घेणे शक्य होईल. सारख्या शब्दांच्या पट्ट्या करून मुलांना चिंचोके ठेवण्यास सांगितले. जमिनिवर मुळाक्षरे कोरून त्यात शिंपले, खडी, रांगोळी भरणे यात मुलं रमतात. रांगोळीची धूळपाटी लेखन सराव करण्यासाठी उत्तम. अशीच रंगीत चित्रे गोळा करून मुलांना दाखवली की मुलं त्यांचं निरीक्षण करतात आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. मुलं एकदा बोलकी झाली की त्यांचा आत्मविश्वास दुणावतो..
मुलांच्या नावांचे दोन संच बनवले. प्रत्येक मुलाच्या बाकावर त्याचे नाव चिकटवून दिले. 
यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आपले नाव ओळखता येऊ लागले.
मुलांत लिंग समभाव निर्माण व्हावा म्हणून एका बाकावर एक मुलगा आणि एक मुलगी बसवली. गट करतानाही मुलं-मुलींचा जाणीवपूर्वक एकत्र गट बनवू लागले.
दररोज मैदानावर सोपे खेळ मी आवर्जून घेते. पाऊस असला तर वर्गात खेळ घेते. यामुळे शरीर, मन निरोगी राहते. मुलांच्या मनावरील ताण दूर होतो. खेळणं ही बालकांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. माझ्या वर्गात मी रोज साधे, सोपे खेळ घेते. यात रुमाल लपवणे, कावळा भुर्र, डोळे बांधून स्पर्शाने जोडीदार ओळखणे, चित्रातल्या बाईला डोळे बांधून टिकली लावणं अशा खेळांचा मुलं मनापासून आनंद लुटतात.
ही सारी कष्टकरी, स्थलांतरित, भूमिहीन शेतमजूरांची मुलं. पोटासाठी जिवाचं रान करणारे पालक मुलांच्या स्वच्छतेकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नाहीत. मग हेही काम आमच्याकडे येतं. मी वर्गात नेलकटर, आरसा, कंगवा, रुमाल इ. ठेवते. वर्गातील जे मूल सर्वांत स्वच्छ, नीटनेटके असेल ते मूल मी whatsApp profile वर टाकू लागल्याने मुलांत चुरस निर्माण झाली आहे.
अशा प्रकारे माझ्या वर्गातली चिमुकली उमलू लागली आहेत. गती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. पण सुरुवात झाली आहे हे खरंय. well begun is half done अशी इंग्रजी म्हण आहे.सुरुवात चांगली झाली आहे आणि माझा उत्साह सुद्धा वाढला आहे.
- स्मिता प्रमोद सराफ
जिल्हा परिषद शाळा नं - ४ - कापडणे, धुळे.