पु. शि. रेगे  
 
रेगे, पुरुषोत्तम शिवराम  
कवी, कथाकार, कादंबरीकार 
२ ऑगस्ट १९१० - १७ फेब्रुवारी १९७८
पुरुषोत्तम शिवराम रेगे  यांचा जन्म मिठबाव (जि.रत्नागिरी) येथे झाला.त्यांचे शालेय शिक्षण वडील कराचीला असल्याने तेथे झाले व पुढे मुंबईच्या विल्सन हायस्कूल  व एल्फिन्स्टन महाविद्यालयातून शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर १९३२ साली रेगे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलीटिकल सायन्स या मुंबईच्या संस्थेतून अर्थशास्त्राची बी.एस्सी. पदवी संपादन केली. त्यानंतर मुंबईच्या व अहमदाबादच्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्राचे  प्राध्यापक म्हणून तसेच मुंबईच्या एल्फिन्स्टन व गोव्याच्या कॉमर्स कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून त्यांनी आपली व्यावसायिक कारकीर्द पूर्ण केली. 
१९५४ ते १९६० या काळात त्यांनी 'छांदसी' या नियतकालिकाचे संपादन  केले. तसेच १९७७ साली 'अनुष्टुभ' या वाङ्मयीन नियतकालिकाच्या निर्मितीत त्यांनी सक्रिय सहभाग दिला. १९६१ साली केरळ येथे ते अखिल भारतीय लेखक परिषदेचे उदघाटक होते व त्यानंतर त्यांनी वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले .   
१९३१ साली त्यांचा 'साधना आणि इतर कविता 'हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानांतर 'फुलोरा '(१९३७), 'हिमसेक '(१९४३), 'दोला'(१९५०), 'गंधरेखा'(१९५३), 'पुष्कळा '(१९६०), 'दुसरा पक्षी'(१९६६), 'स्वानंदबोध '(१९७०), 'प्रियाळ' (१९७२), 'सुहृदयगाथा '(१९७५) आणि 'मरणोत्तर'(अनिह) असे एकूण अकरा काव्यसंग्रह प्रकाशित झाले. 
पु.शि. रेगे  हे मर्ढेकरांचे समकालीन होत . मर्ढेकरांच्या कवितेत तत्कालीन महायुद्धाच्या झळा, मानवी संबंधांतील परात्मता, मानवी मूल्यांच्या आणि सौंदर्याच्या ओसाडीचे  नकारात्मक दर्शन घडते; परंतु पु.शि. रेगे यांच्या कवितेत मात्र जीवनोत्सुकतेचे उत्कट दर्शन घडते. याचे कारण वाङ्मयाकडे आणि जीवनाकडे पाहण्याची त्यांची भूमिका वेगळी होती. तात्कालिकतेमध्ये ते रमत नसत. स्त्रीशक्तीची 'अजाणबाला', 'मुग्धाप्रिया' इथपासून 'आदिमाते'पर्यंतची विविध रूपे त्यांच्या कवितेतून चित्रित झाली आहेत. या सर्व विविधतेतून एक समान सूत्र आहे. स्त्रीशक्ती ही सर्जनशक्ती आहे, आनंदाचे केंद्र आहे; त्यामुळे प्रेमभाव, सौंदर्यभाव, कामभाव हा सर्व या सर्जनशक्तीचा विलास आहे, सर्जनाचा उत्सव आहे, अशी त्यांची धारणा आहे. 
रेगे यांची अनुभव घेण्याची रीतच त्यांच्या कवितेचा घाट घडवते. शब्द हे अनुभवद्रव्य बनून येते. 
त्यांच्या 'पुष्कळा ', 'त्रिधाराधा ', 'शहनाज', 'मस्तानी' इत्यादी कवितांतून स्त्रीच्या आदिप्रतिमेचा विविधांगी प्रत्यय कवितेतून वाचकाला मिळतो.
 पु.शि. रेगे यांनी १९५० पासून आपल्या कथालेखनाला प्रारंभ  केला. 'रूपकथ्थक' (१९५६) आणि 'मनवा' (१९६८) या दोन कथासंघातून या कथा समाविष्ट झाल्या आहेत. मात्र रेग्यांची कथा समकालीन नवकथेच्या प्रवाहातून पूर्णपणे अलिप्त होती. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले यांच्या नवकथेतून ज्या वेळी किडलेल्या माणसांचे चित्रण होत होते, त्याच वेळी पु.शि. रेगे यांच्या कथेतून जीवनातल्या वेल्हाळ कथांची अलवार वेचणी सुरू होती. आपल्या कथांना कथा म्हणण्याऐवजी गोष्ट म्हणणे त्यांनी पसंत केले. भारतीय साहित्य परंपरेतील 'वृत्तक' या प्रकाराशी नाते सांगणारी कथा त्यांनी लिहिली .'स्वतःच स्वतःच्या मनाशी केलेली गोष्टीवेल्हाळ क्रीडा' असे रेग्यांच्या कथांचे स्वरूप आहे. 'मनू' ही त्यांची कथा बरीचशी आत्मचरित्रात्मक गोष्ट आहे. त्यांच्या कथेतील नायक बरेचसे अनासक्त आहेत. मनभाविनी, आनंदभाविनी अशा स्वभावविशेषांच्या या स्त्रिया पुरुषांच्या सहवासात वावरताना स्वतःला विसरू पाहतात. आपल्या 'होण्याच्या' शक्यता आजमावतात. मितभाषी शैली, आटोपशीर संवाद व वेल्हाळ कथनपद्धती ही रेग्यांच्या कथेची वैशिष्ट्ये आहेत.  
'सावित्री'(१९६२), 'अवलोकिता'(१९६४), 'रेणू'(१९७२), 'मातृका'(१९७८) अशा चार कादंबऱ्या लिहून रेग्यांनी कादंबरीलेखनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांची कादंबरी मराठीतल्या वास्तववादी वा समस्याप्रधान कादंबरीलेखनाच्या परंपरेत बसत नाही. याचे कारण तात्कालिकतेत त्यांना रस नाही. 'सावित्री 'त येणारे युद्धाचे संदर्भ', 'रेणू'तली राजकीय क्षेत्रातल्या माणसांची वर्दळ, 'मातृका'तले स्थानांतरण हे स्थळकाळाचे संदर्भ केवळ पार्श्वभूमीच्या पडद्यसारखे असून कथानकाला आधार पुरविण्यापुरते असतात. त्यांच्या सर्व कादंबऱ्यांमध्ये माणसांच्या परस्पर संवादांचा आणि स्वतःचा स्वतःशी असलेल्या आत्मसंवादातून, परस्परांच्या संपर्कातून व देवघेवीतून विकसित होणारे मानवी अनुभवविश्व हा त्यांच्या कुतूहलाचा विषय आहे.
'सावित्री' या कादंबरीला १९३९ ते १९४७ या युद्धकालाची पार्श्वभूमी आहे. रूढ अर्थाने या कादंबरीला कथानक नाही. सावित्रीने आठ वर्षात लिहिलेली ३९ पत्रे म्हणजे ही कादंबरी.    
कलावंत नवीन काही निर्माण करीत नसतो. तो आपल्या साक्षात्काराच्या प्रकाशात कालद्रव्याची एक नवीन जुळणी करीत असतो. पूर्णापासून पूर्ण उदित होते, पूर्णातून पूर्ण काढून घेतले तरी पूर्णच शिल्लक राहते. रेग्यांची सर्जनशीलता या जातीची होती. त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व एखाद्या यक्षासारखे होते. आणि त्यांचे साहित्यविश्वही असेच अलौकिक व वेगळ्या धाटणीचे होते. त्यामुळेच कदाचित रेग्यांच्या गद्यलेखनाची परंपरा पुढे फारशी विस्तारित झाली नाही. कवितेच्या क्षेत्रात मात्र ग्रेस, आरती प्रभू इत्यादी अनेक कवींवर रेग्यांच्या कवितेची छाप आढळते . 
              - डॉ. रमेश वरखेडे   
साभार - शिल्पकार चरित्रकोश