नववीच्या मुलांना ‘मोठेपणी कोण व्हायला आवडेल?’ हा निबंध मराठी शिकवणाऱ्या बाईंनी दिला होता. अशोक आणि विलास दोघेही घट्ट मित्र. दोघेही शेतकरी कुटुंबातील होते. दोघे नदीकाठी बसले होते. मोठेपणी कोण होणार? याबद्दल चर्चा करत होते.

विलास म्हणाला, ‘मी बारावी झालो की दादासारखा शहरात जाणार, तिथले शिक्षण पूर्ण झाले की परदेशातील पदवी घेणार आणि तिथेच राहणार. मला किनई, खेड्यामध्ये राहण्याचा कंटाळा आलाय आणि शहरातील प्रदूषणामुळे तिथेही नकोच वाटतं. परदेशामध्ये एकदम झक्कास वाटते बघ! काय रे अशोक, तू पण असचं करणार ना?

अशोक म्हणाला नाही रे, मी नाही असं काही करणार.. शहरामध्ये जाऊन शिक्षण घेणार, पण पुन्हा आपल्या खेड्यामध्ये येणार.. माझ्या मातीला नाही विसरणार, बरं का! माझ्या बाबांनी शेतीसाठी कायकाय करता येईल ते समजावून सांगितले आहे. माझी जुळी बहीण आशा आणि मी.... आपल्या वर्गातील आपले काही मित्र मिळून, तसेच आशाच्या वर्गातील काही मैत्रिणी मिळून आपल्या गावामध्ये काही उपक्रम राबवणार आहेत, हे ऐकून विलास म्हणाला, "अरे, माझे बाबा म्हणाले, शिकून मोठे व्हा... अन परदेशात नोकरी करून तिथेच रहा... फक्त शेती करून भागत नाही रे .. आणि तुम्ही कसले उपक्रम करणार आहात?त्यापेक्षा चल तिकडे परदेशी!"

अशोक म्हणाला, ‘हे बघ, आपल्या मातीने आपल्याला वाढविले आहे, तिला सुजलाम- सुफलाम’ बनवण्याचे कारण तिने आपणा सर्वांचा भार पेलला आहे ना! तिने केलेल्या कष्टाचे चीज नको करायला? ‘अरे, पण, उपक्रम तर सांग ना!', इति विलास...

‘सांगतो, हे बघ... शहरांसारखे रस्ते, वीज, पाणी, इतर सोयी-सुविधा आपल्या खेड्यांमध्ये (अपवाद आहे बरं का) नसल्यामुळे शहरांमधली गर्दी वाढते आहे, या सर्व सोयी-सुविधा.. आपण मोठे झाल्यावर खेड्यांमध्ये केल्या तर शहरांमधील गर्दी कमी होईल... त्यामुळे शहरातील शिक्षित वर्गसुद्धा खेड्या- पाड्यांमध्ये येईल मग आपल्याला इथे शिक्षणाच्या सोयी करता येतील आणि तू जे म्हणालास ना की, फक्त शेतीवर भागत नाही.. ते बरोबरचं आहे.. पण असे म्हणून.. आपण दुसरीकडे कशाला जायचे? आपल्या पिढीने आता म्हणजे प्रत्येक खेड्यातील युवा पिढीने जर स्वतःची खेडी सुधारण्याचा प्रयत्न केला तर सरकारी मदत आपल्याला मिळू शकेल. अरे, आशा आणि तिच्या मैत्रिणी संगणकाविषयीचे सर्व ज्ञान शिकणार आहेत... मग आपल्या इथे ज्यांना शहरात जाऊन शिक्षण घेणे परवडत नाही, त्यांना या अल्पदरात शिकवणार आहेत. माझे बाबा म्हणाले, की तुमची पिढी दुसरीकडे गेली तर पिके कोण पिकवणार? माझ्या बाबांनी छोटेसे भाषण शंकराच्या देवळात केले बघ, अरे श्रावणी सोमवार होता ना... त्यामुळे गर्दी होती, हीच संधी साधून बाबांनी शेतीला पूरक व्यवसायासंबंधीच्या चार गोष्टी सांगितल्या.. ते छोटेखानी भाषण मी टेप केले आहे, तुला ऐकवतो. उद्या शाळेमध्ये पण माईकवरून हे भाषण शिक्षकांना लावायला सांगणार आहे; असे अशोकने सांगितले तसा विलास म्हणाला, ‘ऐकवं रे.. बघू तरी, ऐकल्यावर एखाद्यावेळी माझे मन बदलू शकते का?'

आता अशोकच्या बाबांचे भाषण ऐका बरं का!...'नमस्कार! उपस्थित भाविक जन हो! आज श्रावणी सोमवार आहे.. तुम्ही सर्वजण भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी इथे जमला आहात... सर्वजण रांगेमध्ये उभे राहून दर्शन घेत होतात हे पाहून बरे वाटले.. आता अशीच शिस्त आपण आपले गाव सुधारण्यासाठी लावून घेऊ यात ... विशेषत: युवा पिढीसाठी मी चार गोष्टी सांगणार आहे.. तुम्ही प्रयाण केले तर आमची पिढी तुमच्यामागे खंबीरपणे उभी राहणार आहे.. पण युवकांनो... आपली खेडी ओस पडू देऊ नका.. आपल्या मातीत पाय घट्ट रोवा... आपले खेडे शहरांना लाजवेल असे बनवू यात..

आजकाल सर्वच गोष्टींमध्ये फसवणूक केली जात आहे. अपवाद असतील ही फसवणूक थांबलीच पाहिजे. आपल्या शेतात उगवणाऱ्या पिकांचा दर्जा उत्तम व जोमदार पिके येण्यासाठी आपण सेंद्रिय खतांवरच भर दिला पाहिजे. त्यामुळे निकृष्ट दर्जाची पिके उगवणारचं नाहीत. शेत जमिनीचा मातीचा कस तितकाच दर्जेदार राहिला पाहिजे ना? म्हणून रासायनिक खते वापरायची नाहीत, ती आरोग्याला धोकादायक असतात आधुनिक शेतीची तंत्रज्ञान संगणकाद्वारे अवगत करून कृषी पर्यटनाद्वारे बँकांकडून कर्जाच्या सुलभ सोयीचा उपयोग करून शेतीमध्ये आमुलाग्र बदल घडवायचे आहेत. आता आपले शेतीवरच भागत नाही, त्यासाठी शेतीबरोबर ग्रामीणसेवा सुविधांमधून फार्म हाऊससारख्या योजना राबवता येतील त्यामुळे बेरोजगारांना काम मिळेल. तिथे सेंद्रिय भाजीपाला, चुलीवरचं जेवण, त्याचबरोबर (भरपूर वृक्षराजींनी सजलेलं, त्यामुळे शुद्ध वातावरण असेल, पर्यटकांची राहण्याची सोय उत्तम करायची, ते राहतील तिथे बाहेरून कौलारू घरे व आतून सर्व आधुनिक सोयींनी युक्त करायचे... असे वातावरण शहरवासीयांनाच नव्हे तर परदेशी पर्यटकांना पण आवडेल. मुलांसाठी सूरपारंब्या, आट्या-पाट्या, विट्टी- दांडू, भोवरा या खेळांमधली मजा अनुभवायला द्यायची, त्याचप्रमाणे बैलगाडी आणि ट्रक्टरमधून फिरवून आणायचे, नदीत डुंबायला द्यायचे... तिथे आपले रक्षक नेमणे महत्त्वाचे! गाई-म्हशींचे धारोष्ण दुधाला पण मागणी आहे. त्याचप्रमाणे आलेल्या सर्वांना विविध पिकांची माहिती द्यायची, गाय-म्हैस-शेळीचे महत्त्व सांगायचे, शेतीची नासधूस करणारे घुशी-उंदीर यांना मारणाऱ्या नाग-सापाचे शेतीसाठी असलेले महत्त्व सांगायचे त्याचप्रमाणे वड, पिंपळ, चिंच, आंबा.. या झाडांची माहिती सांगून.. विविध फळे, त्यांचे जॅम, मोरावळा, लोणची, फळांचे रस विक्रीला ठेवायचे, वृक्षांपासून बनलेली औषधे, मध त्याचप्रमाणे पापड, कुरड्या, चटण्या, असे सर्व पदार्थ, त्याचप्रमाणे बांबूपासून वस्तू विक्रीला ठेवायच्या. त्यामुळे आपल्या खेड्यातल्या महिलावर्गाला काम मिळेल.. मिळालेल्या कमाईतून त्यांना बचत खाते सुरू करायला सांगायचे, आपल्या फार्म हाऊसला असेलेली ऐतिहासिक ठिकाणे, स्थळ, मंदिरे, मस्जिद, चर्च इ. त्याचप्रमाणे रात्रीचे आकाशदर्शन दाखवायची सोय करायची, याबरोबरच पाणी- सिंचन, पावसाचे पाणी कसे वाचवले, ही माहिती देताना कृषीदर्शन, गोवर गॅस, पूरक उद्योग, दुग्ध व्यवसाय... शेततळे दाखवायचे दूध व्यवसायावरून लक्षात आले बघा. दुधापासून बनणारे, दही, तक, श्रीखंड, बासुंदी, रबडी, पनीर, खवा, वड्या हे पण खाद्यपदार्थ विक्रीला ठेवता येतील... पण हे पदार्थ लवकर खराब होत असल्यामुळे.. ते ताजेच देण्याची व्यवस्था करायची. लाकडी खेळणी, इतर शोभेच्या कलावस्तू ठेवता येतील... बरं बरं आणखीन एक लक्षात आलं बघा. खाण्याकरता स्टीलची ताटे- भांडी ताटल्या वापरायच्या नाहीत पत्रावळी नाहीतर केळीची पानेच वापरायची कारण यांचा खतासाठी उपयोग करता येतो. कुठेही प्लास्टिकचा कचरा नको.. सुरुवातच करणार आहोत तर.. तर नैसर्गिक गोष्टीचा म्हणजे त्याचा पुनर्वापर होईल अशाच गोष्टींचा उपयोग करू यात... नाहीतर शहरासारख्या ठिकठिकाणी प्लॅस्टिक व इतर कचरा व्हायला वेळ होणार नाही. गावात उत्तम विकास साधू यात. बरं हे झालं पूरक व्यवसायाबद्दल.. अरे पोरांनो, अजून एक सांगायचे राहिले बघा.. तुम्ही इतके मन लावून ऐकत आहात ना... की किती अन काय सांगू असे झाले आहे बघा.. सुंगधी वनस्पती व फुलपाखरू, सुगंधी तेले, उद्बत्त्या, उटणे, साबण, टूथपेस्ट अशा गोष्टीं पण करत येतील...

आपल्याला शेतीसाठी कमी दराने अवजारे, पीक संरक्षण उपकरणे मिळतात. त्याचप्रमाणे विहिरीवर मोटार चालू - बंद करण्यासाठी अॅटोमायझेशन केल्यामुळे पाण्याची बचत होईल. ठिबक सिंचन व हंगामी पिकांना तुषार सिंचनाद्वारे पाणी दिल्यामुळेसुद्धा पाण्याची बचत होईल. त्यामुळे दुष्काळावर मात करता येईल. शेती निगडित प्रथा, परंपरा, पूजा यामध्ये बदल झाला आहे.. बघा पोरांनो मी तुम्हाला एवढे सांगितले. तसेच शिक्षण घ्या. शेतीविषयीची पुस्तके वाचा... मुलांनो शहरात जाऊन उत्तम शिक्षण घ्या.. ते शिक्षण आपल्या इथे उपलब्ध करू यात ...म्हणजे शहरांवर भार नको... असे करण्यामुळे आपल्या गावाकडचे जीवनमान उंचावेल... बघा आवडली ना माझी आधुनिक शेतीची कहाणी! घ्याल ना हा वसा! सर्व तरुण पिढी, मध्यम - वृद्ध वयाचे पुरुष - स्त्रिया... सर्वांनी होकार दिला रे विलास.... माझ्या बाबांना!..विलास काहीच बोलत नव्हता.. हे अशोक म्हणाला काय रे, गप्प का? हे ऐकून विलासने टाळ्या वाजविल्या .. अन म्हणाला, "अशोका... मी माझा निर्णय बदलला रे! मी पण इथेच येणार! आणि दादाला हे भाषण व्हॅाटसअॅप वरून पाठवतो. तो पण परदेशातील शेतीचे शिक्षण घेऊन इथेच येईल बघ.. अरे, चल लवकर.. तुझ्या बाबांच्या पाया पडायला... एक खेडे होते.. त्यांचे पाटपाट नगर...करू यात रे आपण सर्वांनी..!"

- सुजाता लेले 

[email protected]