माझ्या छोट्या दोस्तांनो,

मला सांगा, पाऊस कोणाकोणाला आवडतो बरं. मला वाटतं तुम्हा सर्वांना नक्कीच आवडत असणार. फक्त पाऊस आवडण्याची कारणं वेगवेगळी असतील. तुम्हाला माहिती आहे कां, आपल्यासारखाच तो प्राणी - पक्षांनाही खूप आवडतो. मोर तर नुसते आकाशात जमू लागलेले काळे ढग बघूनच थुईथुई नाचू लागतो. बेडूक डराव डराव करून आपला आनंद व्यक्त करतो. चातक पक्षी तर म्हणे फक्त आकाशातून पडणारं पावसाचं पाणी पितो. म्हणून तो आपली चोच उघडून आकाशाकडे पाहात पावसाची वाट पाहतो.

आयुषला पावसात चिंब भिजायला आवडतं, मग त्यामुळे सर्दी-ताप आला तरी चालेल. ईशानला मात्र पावसात जायला अजिबात आवडत नाही. पण त्याला वाटतं, पाऊस असा काही जोरदार पडू दे, की सगळीकडे पाणी साचून शाळेला सुट्टी मिळू दे.

सानाला कागदाच्या होड्या खूप छान करता येतात. त्यामुळे ती वाटच बघत असते, कधी एकदा पाण्याचे पाट वाहू लागतायत आणि मी त्यांत होड्या सोडतेय. आर्यनला मात्र रोज पाऊस आला तरी चालतो. कारण नवीन रेनकोट घालून, पाण्यात पच्याक पच्याक पाय आपटत शाळेला जायला त्याला खूप आवडतं. 

नेहाला तर या पावसाळयात तिच्या आईने मस्त ढगांचं चित्र रंगवलेली छत्रीच आणली आहे. त्यामुळे ती आगळीवेगळी छत्री मिरवत रोज शाळेत जायला तिला खूप आवडतं.

मग तुम्हालाही कोणत्या ना कोणत्या कारणाने पाऊस आवडतोच ना ?

मग म्हणा तर गाणं ...

ये रे ये रे पावसा ..... तुला देतो..... 

अहं... नकाच देऊ पावसाला खोटा पैसा....

 

हे पहा मी तुमच्यासाठी नवीन गाणं केलंय पावसाचं ....

 

आॅडिओ १ ) स्वर आणि शब्द - मधुवंती पेठे

       

       ये रे ये रे पावसा । मला चिंब भिजवायला  

       ताप जरी आला तरी । घरी मिळेल झोपायला । ये रे ये रे पावसा ।।

 

       ये रे ये रे पावसा । सोमवारी ये ना ।

       सगळीकडे पाणी साचून । सुट्टी मिळेल शाळेला । ये रे ये रे पावसा ।।

 

       ये रे ये रे पावसा । पाणी येईल ओढ्याला ।

       कागदाची नाव माझी । सोडीन त्याच्या काठाला । ये रे ये रे पावसा ।।

 

       ये रे ये रे पावसा । पुन्हा पुन्हा ये ना ।

       रेनकोट घालून मग । जाईन मी शाळेला । ये रे ये रे पावसा ।।

पण सोहम् मात्र पावसावर खूप रागावतो बरं का! त्याला किनई मैदानावर क्रिकेट खेळायला आवडतं ना! खेळायची सगळी तयारी झाली की नेमका त्याच वेळी पाऊस येतो. मग काय सोहम्चा मूडच जातो. तो चक्क पावसाला जायलाच सांगतो....

          आॅडिओ २ ) स्वर आणि शब्द - मधुवंती पेठे

       पावसा रे पावसा । पुन्हा कधी ये ना ।

       आत्ता मला खेळायचंय । जा ना रे पावसा । जा ना रे पावसा ।।

 

असं जरी असलं ना, तरी या पावसाळ्याच्या दिवसात सगळीकडे निसर्ग रंगीबेरंगी झालेला असतो. सगळी झाडं - पानं कशी हिरवीगार झालेली असतात. काही पांढरी-शुभ्र तर अनेक रंगीबेरंगी फुलं डोलत असतात. निळा जांभळा पिसारा फुलवून मोर नाचत असतात आणि इंद्रधनुष्याची मज्जा तर मस्तच. ता ना पि ही नी पा जा.... म्हणजे सात रंगांची कमानच पाहायला मिळते... फक्त पावसाळ्यातच बरं का ! 

मग ऐकणार कां हे माझं नवीन गाणं .... श्रावणातील रंगांची गंमत सांगणारं..... अगदी सोप्या शब्दात लिहिलंय 

तुमच्यासाठी.... आणि गाणं शिकणाऱ्याना सांगायचं म्हणजे, सा ग प नी हे फक्त चार स्वर वापरून पूर्ण गाण्याची चाल मी तयार केली आहे. आणि ठेका सुद्धा अगदी सोप्पा.. ६ मात्रांचा....गरबा खेळताना वाजवतात ना तोच. म्हणून सर्वांनाच ...गाणं शिकणाऱ्या आणि न शिकणाऱ्याना ... अगदी सहज म्हणतां येईल हे गाणं.

          आॅडिओ ३ ) स्वर आणि शब्द - मधुवंती पेठे

          रंगात रंगूनी श्रावण आला । रंगांची गंमत पाहू चला ।।

          आकाशीचा निळा निळा । रंग जसा घननिळा ।।

          गोरा मोगरा, पारिजातक । जाई नि जुई नाजुक नाजुक ।।

          निळा जांभळा, सुंदर रंगांचा । पिसारा फुलवी मोर नाचरा ।।

          ता...    ना...     पि....     हि....   नि...  पा...    जा....

          तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा पहा ।।

          सात रंगांचे इंद्रधनू हे । आकाशी खुलते, पाहू चला ।।

 

ही गाणी आवडली तर नक्की गाऊन बघा..  भेटूच मग पुन्हा... नवीन नवीन गाण्यांसह.

बालवयाला काहीही शोभून दिसत असली तरी गाणी मात्र शोभाणारीच सांगितली पाहिजेत, कशी ते वाचा आणि ऐका या लिंकवरील लेखात. 

बालवयाला शोभणारी गाणी

- मधुवंती पेठे

 

[email protected]