वर्धापनदिन कार्यक्रम 
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, छत्रपती शिक्षण मंडळ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, शिक्षण प्रसारक मंडळी या पाच संस्थांच्या शाळांमध्ये जाणाऱ्या ‘शिक्षणविवेक’ मासिकाच्या ५ व्या वर्धापनदिनाचा जाहीर कार्यक्रम शिक्षण सचिव मा. नंदकुमार आणि ज्येष्ठ बाल साहित्यिक मा. राजीव तांबे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी सा. विवेकचे प्रबंध संपादक मा. दिलीप करंबेळकर, टी.बी. लुल्ला चारिटेबल फौंडेशनचे चेअरमन किशोर लुल्ला, शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर आदि उपस्थित होते. शनिवार, दि. १२ ऑगस्ट रोजी सायं ५.०० ते ७.०० या वेळात म.ए.सो. ऑडीटोरियममध्ये संस्थांचे अध्यक्ष, संस्था संचालक, शिक्षणविवेकचे संपादक मंडळ, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी, पालक, विद्यार्थी अशा ६३० जणांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. अर्चना कुडतरकर यांनी शिक्षणविवेकची भूमिका मांडली. ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीवर भाष्य करणाऱ्या ‘शिकू आनंदे’ या लघुपटाच्या निर्मितीमागचा उद्देश किशोर लुल्ला यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. मान्यवरांच्या हस्ते या लघुपटाचे लोकार्पण करून त्याचा छोटा व्हिडियो सर्वांना पाहायला मिळाला. वर्धापनदिनानिमित्त
शिक्षणविवेकने केलेल्या ऑगस्टच्या ‘शिक्षण विशेषांका’चे प्रकाशन करण्यात आले. मागील पाच वर्षात शिक्षणविवेकला सहयोग देणाऱ्या पाच संस्थांच्या अध्यक्षांचा सन्मान मा. राजीव तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेचा ‘विवेक संवाद’ सुरू झाला.
दर वेळी विद्यार्थी तासाला बसतात; पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षण सचिव आणि बालसाहित्यिक स्वतः तासाला बसल्याचे वाटत होते. मा. नंदकुमार आणि मा. राजीव तांबे यांना एक-एक करून विद्यार्थी प्रश्न विचारात होते. ‘शाळांना शनिवारी सुट्टी असेल का?’, ‘दप्तराचे
ओझे कमी का होत नाही?’, ‘साहित्य लेखनाला प्रेरणा कशी मिळते?’; असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले.
राजीव तांबे म्हणाले की, ‘पालकांनी मुलांना सतत शिकवत राहणे टाळावे, मुले स्वतःच्या परीने शिकत असतात.’ कार्यक्रमाच्या समारोपात ‘घोकंपट्टीमुळे परीक्षेपुरता अभ्यास लक्षात राहतो, त्यानंतर विसरला जातो. त्यामुळे शिकताना समजून घेण्याची सवय मुलांनी लावून घेतली पाहिजे’, असे शिक्षण सचिव मा. नंदकुमार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पोहनेरकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
- रुपाली सुरनिस