प्रकाल्पाधारित शिक्षण 
“आई, आज घराच्या अभ्यासात दोन दोन उपक्रम लिहायला दिलेत बाईंनी.”
“काय? दोन उपक्रम. अरे देवा! अरे, उद्या मलाही ऑफिसमध्ये एक फाईल पूर्ण करून द्यायचीय म्हणून मी ती करायला घरी आणली आणि काय हे तुझं? वैताग आलाय मला तुझ्या त्या उपक्रमांचा कसली मेली ही अभ्यासाची पद्धत! जरा उसंत नाही. सारखं आपलं मुलांना आणि पालकांना कामाला लावलेलं. आमच्या वेळी नव्हतं बाबा अस्सं काही!!”
“काय? ओळखीचा वाटतोय ना हा संवाद काहीसा.” मुख्य म्हणजे, ‘मुलांना आणि पालकांना नुसतं जुंपलेलं असतं कशालातरी.’ आणि ‘कसली मेली अभ्यासपद्धती आमच्यावेळी नव्हतं अस्सं काही.’ हे संवाद हल्ली पालकांचे अगदी जिव्हाळ्याचे झाले आहेत, नाही का? आपल्या नेहमीच्या धावपळीतून मुलांचा अभ्यास हा दिवसेंदिवस वेगळ्या प्रकारच्या चर्चेचा विषय बनू लागलाय. आपल्या वेळेला फक्त पाठांतर करून आपण चांगल्याप्रकारे उत्तीर्ण होत होतो. पण आता.. एवढं सगळं करून मिळतात त्या काय तर श्रेणी. गुण नाही. काय उपयोग त्या श्रेणीचा?? पण खरं तर मार्क मिळाल्याने असं काय वेगळं व्हायचं जे श्रेणीमुळे होत नाही असा विचार केला तर...
पाठांतरांऐवजी नुसते उतारे वाचून प्रश्नांची उत्तरं लिहा. चित्र बघून वाक्य तयार करा. दिलेल्या धड्याच्या आधारे आणखी चित्र, माहिती गोळा करून प्रकल्प तयार करा. किती ते करायचं
या सगळ्याकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर..
नुसतंच आंधळेपणाने पाठांतर करण्याऐवजी छान उतार्‍याचं वाचन होतं. त्याच्याकडे उत्तर लिहायची म्हणून चिकित्सक दृष्टीनं पाहायची सवय लागते. शिवाय पुस्तकातल्या ठरीव वाक्यांपेक्षा आपण आपली वाक्य तयार करून उत्तरं लिहितो त्यामुळे कळत नकळत आपल्यातील सर्जनशीलता मुळं धरू लागते. स्वतंत्रपणे लिखाण करण्याची क्षमता हळूहळू वाढायला लागते. वर्णनक्षमता, स्व-लेखनक्षमता यांचा विकास होतो.
प्रकल्प म्हणजे विविध प्रकारच्या उपक्रमांमुळे माहितीचा शोध घेणं. नेहमीच्या जगण्यात त्याचा वापर करणे याची मुलांना सवय लागते. समोर दिसणार्‍या माहितीपेक्षा आणखी काहीतरी आहे ते शोधण्याची सवय मुलांना परिपूर्णतेच्या मार्गावर नेणारी असते. सामान्य ज्ञान लहानवयापासूनच पक्क होतं, पुढे जाऊन जेव्हा याच्या वेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात तेव्हा ती मुलं गोंधळून जात नाहीत.
‘एवढी लहान मुलं, ती कसले प्रकल्प करणार, सगळं आपल्यालाच करावं लागतं’, अशी तक्रार पालकांमध्ये नेहमी असलेली दिसते. असं असलं तरी, मुलं म्हणजे, ‘नाविन्याची ओढ जे जे काही आजूबाजूला नवीन दिसतं ते ते आत्मसात करायचं. निरीक्षण करायचं आणि शिकून घ्यायचं ही बालप्रवृत्ती असते. म्हणून तर या वयात प्रत्येक गोष्ट पटापट शिकतात ही मुलं जे द्याल ते आणि जेवढं द्याल तेवढं. या दृष्टीने विचार केला तर आपल्याबरोबर बसून जे काही मुलं बघत असतात, थोडाफार हातभार लावत असतात त्यामुळे त्यांची निरीक्षण आणि निर्मितीक्षमता वाढीस लागते आणि हेच तर अभ्यासक्रमपद्धतीचे मूळ हेतू असतात. सतत काहीतरी कलाकौशल्य जपल्यामुळे कल्पनाशक्ती विकसित होते. ती प्रत्यक्षात उतरवली जाते. आपण आपल्या शिक्षणपद्धतीतले दोष शोधून मुलांच्या मनातही त्याबद्दल तशी नकारात्मकता निर्माण करण्याऐवजी त्यातली बलस्थानं शोधून मुलांना त्यात शिक्षकांच्या, शाळेच्या मदतीनं पारंगत करण्यासाठी मदत केली पाहिजे.
आपल्याकडे मुलांना व्यावासिक शिक्षण दिलं जात नाही, याबाबतची मोठी बोंब असते. परदेशात म्हणे, मुलांना आठवड्यातून एक दिवस ठरलेल्या भागात काम करून उरलेले पैसे कमवायचा उपक्रम असतो जेणेकरून तिथली मुलं कमी वयातच स्वावलंबन शिकतात. पण आपण हा विचार कधी केलाय का? आपल्या मुलांनी दुसर्‍यांच्या घरी जाऊन काम करण्याची मानसिकता आधी तयार करावी लागेल. अभ्यासक्रमात हा उपक्रम अंतर्भूत केला तर तशी मानसिकता आणि यंत्रणा राबवावी लागेल आणि काही प्रमाणात, ‘गंमतजत्रा’ वैगरे उपक्रम राबवून ही काल्पनासुद्धा हळूहळू साकारली जातेय.
या गंमतजत्रेत सगळ्या प्रकारचं सामान विकतात. काही त्यांनी बनवलेलं तर काही भाजी, फळंसुद्धा ही व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात नाही का? अशा शिक्षण पद्धतीतल्या अनेक मुद्द्यांकडे आपण डोळसपणे पाहायला शिकलो, त्यामागचा हेतू समजून घ्यायला लागलो तर आपल्याला त्यातली सकारात्मकता नक्की जाणवेल आणि त्यामधून प्रगतीचा नियोजित हेतू आपण नक्कीच साध्य करू शकू.
कसा करावा शब्द संग्रह नक्की वाचा खालील लिंक वर.
 
- माधवी संतोष राणे