'A good teacher teaches, a better teacher demonstrates but the best teacher inspires',, असं म्हटलं जातं. शिक्षकाची भूमिका बजावणं हे सोपं नाही; पण आनंदाने, उत्साहाने, नव्याच्या शोधात राहून जर अध्यापन केलं, तर तोच पेशा शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाचाही विकास घडवतो.

शिक्षक मुलाला शिकवत नाही, तर सातत्याने शिक्षकच मुलांकडून शिकत राहतो. दर वर्षी नव्या मनांना फुलवणं, गेल्या वर्षी शिकवलेला तोच भाग नव्या वर्षी वेगवेगळ्या पद्धतींनी पेश करणं, संदर्भ शोधणं; यातून शिक्षकच घडत जातो.
अध्ययन-अध्यापन प्रक्रिया रंजक, आनंददायी होण्यासाठी सतत नवनव्या प्रायोगिकतेची गरज असते. 'Experimental method is necessary in teaching.'
गेली 28 वर्षे शिक्षक म्हणून कार्य करताना दोन ते तीन वेळा पाठ्यपुस्तके बदल, तसेच approch, पद्धती, मूल्यमापन पद्धती यांतील बदल, ज्ञानरचनावादी अध्यापन, अध्यापनातील E-learning चा वापर या सर्व बदलांना सामोरे जाताना मी नेहमीच positive approchने हे बदल सहजपणे स्वीकारले. रूळ बदलले, तरी खडखडाट होऊ दिला नाही. म्हणूनच अध्यापनाचा आनंद पुरेपूर घेता आला. माझे शिकवण्याचे विषय इंग्लिश व मराठी. या भाषा असल्याने प्रयोगशीलतेला खूपच वाव मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही आनंद देता आला.
अध्यापन कौशल्ये : 
विविध अध्ययन अनुभव 
विद्यार्थंच्या विचारक्षमतेत वाढ 
नावीन्यपूर्ण व रंजक पद्धती 
उद्दिष्टानुवर्ती अध्यपान 
अभिरुची विकसन 
वरील मुद्यांनुसार ‘प्रयोगशीलता : शिक्षणाचा प्राण’ या विषयावर लिहिण्यासाठी मी माझेच 28 वर्षांचे अध्यापन धुंडाळले. हा धांडोळा घेताना माझी मीच आश्चर्यचकित होत गेले. मी केलेल्या प्रयोगांमुळे विद्यार्थी कसे विकसित झाले, माझे अध्यापन त्यांच्या लक्षात कसे राहिले, त्यांना नेमका कसला आनंद मिळाला, हेही तपासत गेले.
श्रवण, वाचन, भाषण, लेखन, संपादन क्षमता अशा कौशल्यांनी भाषा शिकावी लागते. इंग्लिशसारख्या परदेशी भाषांची भीती मुलांच्या मनातून काढणे महत्त्वाचे असते. त्यासाठी वर्गात पाऊल टाकल्यानंतर छोट्या छोट्या सूचना इंग्लिशमधूनच देणे; वॉर्मिंग अप प्रकार घेणे; इंग्लिश कोडी, जोक्स सांगून त्यांना मोकळे करणे; दोन जणांच्या जोडीत किंवा ग्रुपमध्ये विषय देऊन चर्चा करून घेणे; त्याला पॉईंटस् ठेवणे; शब्दांच्या भेंड्या, वाक्ये क्रमवार लावणे; पीपीटीज् तयार करण्याची स्पर्धा घेणे; छोट्या कविता लिहायला उद्युक्त करणे; शब्दकोडी सोडवून घेणे असे नाना प्रकार, नाना क्लृप्त्या करायला सांगून, त्यांची त्या भाषेची भीती मी नेहमीच कमी करते किंवा हळूहळू ती नाहीशी होते.
मुलांना वर्तमानपत्रातील बातम्या वर्गात मोठ्याने वाचायला सांगणे, त्या वाक्यरचनेतील वैशिष्ट्ये लक्षात आणून देणे, जाहिरातींची कात्रणे संग्रहित करणे, मराठीसारख्या विषयात उपयोजित लेखनासाठी शाळेतीलच झालेल्या प्रत्येक समारंभाचा वृतांत लेखन करून घेणे, असे प्रयोग मी केले आहेत.
नुकताच मागच्या वर्षी अधिक मास आला होता. दहावीच्या वर्गात मी 33 दिवस 33 लेखनप्रकार सातत्याने लिहून घेतले. काही सांगून, काही चर्चा करून, घरून लिहून आणायला सांगितले. यामुळे पाठ्यपुस्तकांशी संबंधित नानाविध लेखनप्रकार संग्रहित झाले.
मध्यंतरी इ.7वीच्या विद्यार्थ्यांकडून मी ’'Times of Ramanbaug'’ हा उपक्रम घेतला. पाठ्यपुस्तकात हा उपक्रम दिलेला आहे. मुलांचे गट करून एक कॉमन संपादक मंडळ नेमून, फक्त शाळेतील बातम्यांचे हे वृत्तपत्र मुलांनी समरसून केले. त्यासाठी ते आनंदवार्ता, वाढदिवस, पुरस्कार, बातम्या, स्पर्धांमधील यश, शाळेच्या व्यवस्थापनविषयक माहिती इत्यादी माहिती विद्यार्थी अहमहमिकेने शोधत होते. या बातम्या arrange करत होते, फोटो काढत होते. या उपक्रमाची दखल वर्तमानपत्रांनीसुद्धा घेतली. यातून शोधक वृत्ती, वृत्तपत्रीय लेखन कसे करावे, थोडक्यात कसे लिहावे अशी कौशल्ये विद्यार्थी शिकले.
व्याकरणातील English adverbs शिकवताना मी एक युक्ती केली. फक्त ’ly’ लागलेले शब्द म्हणजे adverbs अशी खोटी समजूत टाळण्यासाठी त्यांना  cross out the odd word या exercise खाली इंग्लिशमधील ’ly’ ने शेवट होणारी नामे व इतर शब्द adverbs मध्ये मिसळून वेगळा शब्द ओळखायला सांगितला.
1) chilly,  perfectly,  softy,  slowly
2) bravely,  lily,  tenderly,  greatly
3) softly,  loudly,  silly,  carefully
असे शब्द घातल्याने सर्वच 'ly’ चे शब्द म्हणजे adverbs नाही हे त्यांच्या मनावर ठसले.
मराठीत निबंधाचे विषय रूक्षपणे न लिहिता, त्या अनुषंगाने चित्रे काढायला दिली, तर विद्यार्थी आनंदाने निबंध लिहितात हा अनुभव मी घेतला. त्यासाठी वर्तमानपत्रातील संबंधित कात्रणेही ते आनंदाने चिकटवतात.
मराठी विषयात एक तासिका पुस्तक परीक्षणावर आधारित ठेवून, ठरावीक कालावधी देऊन 5 विद्यार्थी 5 पुस्तकांचे परीक्षण करतील, असा एक प्रयोग मी केला. इतरांनाही परीक्षण केलेली पुस्तके वाचता येतात.
भित्तिपत्रिका उपक्रम विद्यार्थी आवडीने करतात. शाळेतील प्रासंगिक सण, दिनविशेष यांवर आधारित भित्तिपत्रिका विद्यार्थी खूप उत्साहाने तयार करतात.
इतर उपक्रमांत, विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी खूप मजा येते. उदा., ज्ञानप्रबोधिनीसारख्या संस्था आगळ्यावेगळ्या स्पर्धा घेतात. त्यांतील ‘तुम्हीच व्हा संपादक’, ‘सृजनाला पंख नवे’, ‘ठरावीक विषयावर आधारित विविध लेखनप्रकारांचे सादरीकरण’ अशा अनेक स्पर्धांत मी स्वतः मुलांना उद्युक्त केले आहे.
कथापूर्तीमध्ये विद्यार्थ्यांना ‘जुनी गोष्ट नवा शेवट’ अशा गोष्टी लिहायला सांगून, त्याचे हस्तलिखित केले आहे.
ज्या वर्षी विं.दा. करंदीकरांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाला, तेव्हा त्यांना अभिनंदनपर 500 पत्रे विद्यार्थ्यांकरवी एक गठ्ठा पाठवली. मुलांनी त्या पत्रांत विविध प्रकारे अभिव्यक्ती केली होती. ती पाहून विंदांची त्यातल्या अनेकांना आशीर्वाद पत्रे आली. या प्रयोगाची दखल वर्तमानपत्रांनी घेतली होती.
इंग्लिशमध्ये विविध पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, कडधान्ये, भाज्या, फळे शिकवताना घरात विकत आणलेल्या तयार पदार्थांच्या पाकिटांची वेस्टने वाचून त्यातल्या ingredients ची यादी करणे हा मुलांचा छंदच होऊन जातो.
वाङ्मय मंडळाद्वारे स्वरचित्र कविता स्पर्धा, तसेच काव्यपूर्ती स्पर्धा असे उपक्रम राबवले; तेव्हा मुलांनी छान कविता रचल्या.
इंग्लिश वाक्यरचना शिकवण्यासाठी एक sentence maker मी बनवला. त्यातून मुलांनी वाक्ये बनवण्याचे कौशल्य शिकून घेतले.
बालभारती, बालचित्रवाणी, आकाशवाणी या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्वक कार्यक्रम सादर केले, तेव्हा मला अभिमान वाटला.
आठवड्यातून एक दिवस English Day साजरा करून 5-5 मिनिटांचे वर्गवार कार्यक्रम English मधून सादर केले, तर मुलांची Conversation Skills विकसित होतात, हे अनुभवले.
पाठ्यपुस्तकांशी संबंधित शैक्षणिक साहित्य विद्यार्थी आवडीने तयार करतात. त्यांचे स्नेहसंमेलनात प्रदर्शन भरवले, तर त्यांचा आनंद द्विगुणित होतो. सतत 10-12 वर्षे अशी प्रदर्शने भरवली.
मराठी शिकवताना आणखी एक प्रयोग मी केला. संस्कृती कोश, विश्वकोश, शब्दकोश यांमधून धडे-कवितांमधील विविध संदर्भ, अर्थ मी मुलांनाच शोधायला सांगते. ते कोश हाताळणे, अकारविल्हे रचना पाहणे, अर्थ मिळाल्याचा आनंद हे सारे अनुभवताना तेच घडत जातात.
उमलत्या व जिवंत मनांशी रोज संवाद करत असताना प्रयोगशीलता खूप गरजेची असते. देवाला जसा रोज ताजा नैवेद्य दाखवतात, तसे नवेनवे प्रयोग अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सचेतन ठेवतात.
एकूणच प्रयोगशीलता शिक्षणाचा प्राणच आहे. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत विविध शैक्षणिक अनुभूती देता-घेताना नवनवीन काही करू पाहणार्‍या शिक्षकांना खूप काही करता येते. विद्यार्थीही अशा शैक्षणिक प्रयोगांना उत्स्फूर्त प्रतिसाद देतात.
संत रामदासांनी म्हटल्याप्रमाणे,
‘आधीच सिकोनी जो सिकवी।
तोचि पावे श्रेष्ठ पदवी॥
गुंतल्या लोकांस उगवी।
विवेकबळे॥’
हे सतत सिद्ध करण्याचा प्रयोगशील शिक्षकाचा प्रयत्न असतो!
- चारुता प्रभुदेसाई
सहशिक्षिका, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग