नमस्कार मित्रहो! मागील लेखात आपण खगोलशास्त्र याविषयाची थोडक्यात माहिती करून घेतली, मला खात्री आहे की, तुम्हीसुद्धा नक्कीच वेळात वेळ काढून याबद्दल वर्तमानपत्र, दूरदर्शन अथवा पुस्तकांमधून वाचलं असेलंच. चला तर मग आज आपलं रॉकेट घेऊन खगोलशास्त्रातील एका नव्या गोष्टीची माहिती घेऊयात.

मित्रांनो, मागील लेखात जसं आपण पाहिलं तसं, आकाश समजून घेण्याची सुरुवात ही आकाशाचं निरीक्षण करण्यापासून होते. आता यामध्ये आज आपण अजून एक मुद्दा जोडणार आहोत तो म्हणजे आपण आकाश नक्की कुठून बघतोय ते ठिकाण. आता तुम्ही म्हणाल की हे आकाश कुठून बघतोय ते का बरं महत्त्वाचं आहे?  तर याचं सरळ साधं उत्तर असं आहे की पृथ्वीवरील तुमचं स्थान बदललं की तुम्हाला दिसणारं आकाश बदलत. आता याबद्दल थोडी अधिक कल्पना येण्यासाठी आधी पृथ्वीची रचना समजावून घेऊ.

आकाश पाहण्यासाठी आपल्याला दिशांचं थोडं ज्ञान असणं गरजेचं आहे म्हणजे बघा अगदी सोप्प आहे - सूर्य उगवण्याच्या दिशेला तोंड करून उभे राहिल्यास बरोबर डोक्या मागची दिशा म्हणजे पश्चिम, डाव्या बाजूची उत्तर आणि उजव्या बाजूची दक्षिण! बघा मग करून !

आपल्या प्रत्येकालाच ठाऊक आहे की , पृथ्वीचा अक्ष (Axis) हा २३.५ अंशांनी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवरून दिसणारे आकाशसुद्धा बदलते. त्याप्रमाणे आपण भूगोलात शिकल्याप्रमाणे पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुव जोडणाऱ्या रेषांना समांतर रेषांना आपण रेखांश (Longitude) म्हणतो आणि विषुववृत्ताला समांतर असणार्‍या रेषांना आपण अक्षांश (Latitude) असं म्हणतो. त्यामुळे आकाशाच्या दृश्य भागात बराच फरक पडतो. आता हेच बघा ना, आपल्याला लहानपणी शिकवले जाते की, सूर्य रोज १२ ला डोक्यावर येतो पण मित्रांनो, ते खरे नाहीये बरं का. कारण पृथ्वीच्या २३.५ अंश कललेल्या अक्षामुळे सूर्य वर्षाचे ६ महिने निश्चित पूर्वेस न उगवता थोडासा उत्तरेकडे उगवतो, तर उरलेले ६ महिने तो थोडा दक्षिणेकडे उगवायला लागतो. यालाच आपण उत्तरायण आणि दक्षिणायन असे म्हणतो आणि यामुळेच (पृथ्वीच्या कलण्यामुळे आणि परिणामी उत्तरायण आणि दक्षिनायानामुळे) पृथ्वीवर ऋतुचक्र सुरू आहे. या वेगवेगळ्या ऋतुंमध्ये दिवसाची लांबी ही रात्रीपेक्षा कमी जास्त होत असते. तर मग पटापट दिनदर्शिका काढा आणि सांगा की उत्तरायण आणि दक्षिणायन प्रारंभ दिवस कोणते आणि वर्षाच्या कोणत्या दोन दिवशी दिवस आणि रात्र सारखे असतात ? 

आता आपण जाणून घेऊयात की या अक्षांश आणि रेखांश यामुळे दृश्य आकाशात नक्की काय फरक पडतात. विषुववृत्तास समांतर अश्या उत्तर दिशेला पसरलेल्या ज्या रेषा असतात त्या आपण अक्षांश म्हणून ओळखतो तसेच विषुववृत्त हे शून्य अंश मानून उत्तर ध्रुवावर नव्वद अंश असा अक्षांशांचा विस्तार आहे (आकृती क्र.२). आता या सगळ्यावरून एक लक्षात येईल की आपण पृथ्वीवर कोणत्या अक्षांशावर आहोत यावरून आपल्याला आकाश नक्की कसं दिसेल याबद्दल माहिती मिळेल. आता अक्षांश लक्षात आल्यानंतर आपल्याला अजून एक गंमत शिकायची आहे ती म्हणजे ध्रुव ताऱ्याचा शोध.

आपण सगळ्यांना लहानपणी धृव बाळाची गोष्ट नक्की ऐकली असेलंच. नसेल ऐकली तर आजी-आजोबांच्या मागे लागून नक्की ऐका! तर जसं या ध्रुव बाळाच्या गोष्टीत ध्रुवाला अढळ स्थान मिळालं, त्याचप्रमाणे आपल्या ध्रुव ताऱ्याच स्थानसुद्धा अढळ आहे. सकाळ असो वा संध्याकाळ आपल्या अक्षांशाप्रमाणे आपल्याला ध्रुव तारा तिथेच दिसतो. आता ध्रुवतारा शोधायचा कसा तर त्यासाठी आकाशात दोन तारका समूह आहेत त्यावरून तो शोधण एकदम सोप्पा आहे. 

यामधील एक तारका समूह म्हणजे सप्तर्षी (Ursa Major) आणि दुसरा म्हणजे शर्मिष्ठा (Cassiopia). आता आकाशात एका वेळी उत्तरेस दोन्हीपैकी एक तारका समूह निश्चित असतोच आणि त्यावरून ध्रुव तारा शोधणे एकदम सोप्पे! आता अजून एक गम्मत सांगतो कुठल्या ठिकाणी आकाशात ध्रुवतारा जमिनीपासून किती अंश उंचीवर दिसेल हे त्या ठिकाणच्या अक्षांशावरून ठरते म्हणजे तुम्हाला जर एखाद्या ठिकाणाचे अक्षांश ठाऊक असतील तर तुम्ही ध्रुव ताऱ्याचे स्थान निश्चित करू शकता किंवा उलट सुद्धा म्हणजे ध्रुव ताऱ्याच्या स्थानावरून एखाद्या जागेचे अक्षांश !

 मला खात्री आहे या भागात माहिती थोडी जड आणि जास्त वाटेल पण एक-एक मुद्दा नीट अभ्यासलात तर आकाश पाहणे तुम्हाला नक्की सोप्पे जाईल. चला तर मग भेटू पुढील भागात ! 

- अक्षय भिडे

[email protected]