मुलांना डब्यात काय काय देता येईल बरं ?

उत्सुकतेने लुकलुकणारे डोळे आणि त्यात सामावलेल्या अनेक भावना.... कधी अश्रू तर कधी भीती, कधी आनंद तर कधी शंका, आई-बाबा असे का वागतात? मला शाळेत का जावं लागतं? याचा थांगपत्ता नसणारं बालमन. असे बरेच दिवस जातात मूल शाळेत रुळेपर्यंत. यात आई आणि मुलांना बांधणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणजेच ‘डबा’!!

खरोखर किती महत्त्वाचा असतो नाही डबा? मग त्यातून डब्यात जर आवडीचा पदार्थ असेल तर बहारच!! शाळा सुरू झाली की रोज रोज काय डबा द्यायचा हा आई समोरचा यक्ष प्रश्नच जणू. तेव्हा मुलांच्या आवडीनिवडी निर्माण होत असतानाच विविध भाज्या, फळं व तसेच विविध पदार्थ खायची सवय लावणंही तितकंच गरजेच असतं.

३ ते ७ वयोगटातील मुलांना रंगीत, आकर्षक तसेच सोपा व सहज खाता येईल असा डबा द्यावा. छोट्या शाळेत १ डबा पुरतो तर मुलं पहिलीत गेल्यावर २ डबे लागतात. पोषणमूल्य आणि आकर्षकता सांभाळून दिलेला डबा हा थेट मनाशी जोडला जातो. डबा नाही आवडला तर परतही येतो आणि मुलंही कोमेजून जातात. काही शाळांमधून न्याहारीची सोय असते, आजकाल बऱ्याच शाळांमध्ये जंक फूडवर बंदी आहे व पोळी-भाजीचा डबा अपरिहार्य केला आहे, हे उत्तमच.

३ ते ७ वयोगटातील मुलांसाठी डब्याचे काही पर्याय खाली दिले आहेत:

 

  •  उपमा, पोहे शेवया जास्त भाज्या व मटार, खोबरं, कोथिंबीर, लिंबू पिळून.
  • शिरा विविध फळ घालून.
  • विविध प्रकारचे पराठे भाज्या घालून.
  • ग्रील सँडविचचे प्रकार द्यावे, त्यात भाज्या, चीज, पनीरचा वापर करावा; तसेच ब्रेडही ब्राउन अथवा मिश्र धान्याचा वापरावा.
  • डाळींचे पदार्थ, ढोकळा, डाळींचे डोसे.
  • इडली, चटणी, डोसा, उत्तप्पा, आप्पे ई   

याबरोबर एक छोटा डबा द्यावा जो मुलं शाळा सुटली की घरी पोहोचायच्या वेळात खाऊ शकतील. हा डबाही महत्त्वाचा आहे. शाळेतून घरी आल्यावर मुलं जर उगीचच चिडचिड करत असेल तर यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे लागलेली भूक असते. या छोट्या डब्यात खालील पदार्थ देऊ शकतो :

लाडू, ड्रायफ्रूटस, चिक्की, राजगिरा वडी, फळं कापून.

नवीन शाळा म्हणजे बाहेरच्या जगातील पहिलं पाऊल. नवीन माणसं जोडणं, नवीन मित्र-मैत्रिणीशी जुळवून घेणं या सर्वात मुलं थकतात., शरीरानेही आणि मनानेही. अशा वेळी मुलांना जर विचारलं की, वरील गोष्टीतील कुठला खाऊ  डब्यात हवा आणि त्या प्रमाणे आधीच तयारी ठेवली तर मुलांच्या मनाप्रमाणेही डबा देता येईल आणि पोषणमूल्यही सांभाळता येतील. जेव्हा २ डबे द्यायचे असतील तेव्हा एक डबा प्रथिनांनी (प्रोटीन्सनी) परिपूर्ण असावा.

डब्यात बिस्किट, टोस्ट, खारी, केकसारखे मैद्याचे प्रकार, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे वेफर्स, तळलेले पदार्थ, फरसाण  देणं पूर्णतः टाळलेच पाहिजे. या गोष्टी द्यायला सोप्या व लागायला कितीही रुचकर असल्या तरी पौष्टिक अजिबात नाहीत. त्यामुळे मुलांच्या वाढीला अपायच होणार आहे. जंक फूड आज आपण आहारातला एक अविभाज्य भाग बनवला आहे. मॅक डी, पिझा, बर्गर केंद्रांवरची गर्दी हेच दर्शवते. जंक फूड किती हानिकारक आहे याविषयी आपण पुढच्या लेखात माहिती घेऊ या. आणि आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, उत्तम वाढीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी जंक फूड न खाण्याची प्रतिज्ञा करू या.

(क्रमशः)

 

~ऋचा झोपे~

[email protected]