आपल्या देशात परदेशातल्या वस्तू वापरण्याचं एकप्रकारचं वेडच आहे. म्हणजे आपल्याकडची वस्तू कितीही उपयोगी असो, टिकाऊ असो पण त्याकडे डोळसपणाने दुर्लक्ष करून त्यापेक्षा महाग वस्तू वापरण्याकडेच आपला कल असतो. मग ते कपडे असोत, इलेक्ट्रॉनिक वस्तू असोत किंवा पर्यावरणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सध्या आपण झाडेसुद्धा परदेशीच वापरतो किंवा लावतो. बघा ना सध्याच्या लहान मुलांना किंवा आपल्यासारख्या किती लोकांना तामण, सावर, पांगारा, पळस, शिरीष, कुडा हि नावे माहीत आहेत? यातलं फार तर पळस माहीत असेल. तेसुद्धा ज्यांना भटकण्याची आवड आहे त्यांना. बाकीच्यांचं काय? त्यांना फक्त गुलमोहर, नीलमोहर आणि बोगनवेल एवढंच माहिती असतं. कारण बहुतेक ठिकाणी रस्त्यावर आणि मोठ्या बंगल्याबाहेर हीच झाडे दिसतात. जसं काही आपल्या देशी झाडांना फुलेच येत नाहीत.

आपल्याकडे वृक्षारोपण करायचं म्हटलं की, जी रोपे लावली जातात त्यात जास्ती करून सुबाभूळाचीच असतात. शोधून शोधून सगळी परदेशी झाडे लावली जातात. अनेक लोकांचं म्हणण असतं की झाडच आहेत ना ती.. त्यांनाही फुलं येतात, तेही सावली देतात. त्याने काय फरक पडतो. तर आपल्याला थेट यांनी फरक पडत नसला तरी एक निसर्गाचा भाग म्हणून त्याचा त्रास नंतर आपल्याला भोगावाच लागतो. आपल्या आसपास असणारे विविध जीव म्हणजेच पक्षी, फुलपाखरे, लहान मोठे कीटक यांना खूप फरक पडतो. परदेशी झाडे त्यांना माहीत नसल्याने पक्षी तिथे घरटी करत नाहीत. यांना निवाऱ्याला जागा मिळत नाही. फुलपाखरे त्यांची अंडी घालत नाहीत. परदेशी झाडांची पाने आपल्याकडच्या मातीत पटकन एकजीव होत नाहीत. याउलट देशी झाडं आपल्या पर्यावरणाचा समतोल ठेवतात. यांची पाने गळून पडली की मातीत मिसळून त्यांचे विघटन होऊन त्यांचे उत्तम खत तयार होते आणि झाडाची मुळे यातली पोषकद्रव्ये झाडापर्यंत पोहोचवतात आणि हीच मुळे जमिनीत खोलवर जाऊन जमिनीची होणारी धूप थांबवतात. या झाडांच्या मदतीने हे सर्व जीव एकमेकांच्या साथीने जगत असतात. परदेशी झाडे जरी पटापटा फोफावत असली आणि जरी त्यांना सुंदर फुले येत असली तरी ही फुले माणूस सोडून कुणालाही आकर्षित करीत नाहीत. गुलमोहरावर तुम्ही कधी कुठल्या पक्षाचे घरटे पाहिले आहे का? असले तरी फार क्वचित. याउलट वड, पिंपळ, चिंच, उंबर, कडूनिंब किंवा बकुळ या झाडांवर बघा. अनेक पक्षी यावर येतात, ढोल्या करतात, घरटी करतात. यांच्या पानांवर काही विशिष्ट प्रकारची फुलपाखरे अंडी घालतात. बकुळीच्या फुलांचा मंद वास आपल्याला सुद्धा मुग्ध करतो. तुम्हाला कल्पना येणार नाही, पण असे अनेक जीव या अशा एका वृक्षावर अवलंबून असतात. परदेशी झाडांमुळे परागीकरण आणि पक्ष्यांकडून होणाऱ्या बीजप्रसाराला अडथळा निर्माण होतो आणि यामुळे अन्नसाखळी विस्कळीत होते. अनेक जीव नामशेष होण्याची भीती असते; किंबहुना काही त्या मार्गाला गेलेले पण असतात.

निलगिरी हे झाड आपले नव्हे. निलगिरी आपल्या भोवती एकही झाड जगून देत नाही. सहजासहजी यांची पाने जमिनीत विघटित होत नाहीत, कारण त्यांच्या पानात आम्ल असते. त्यामुळे आसपासची जमीन निकृष्ट होते. कैलासपती हे झाड, याला कॅनॉनबॉल असे म्हणतात. हा स्थानिक वृक्ष नव्हे. शंकराचे आवडते फुलं म्हणून बहुतेक सर्व शंकराच्या देवळाच्या आसपास हा वृक्ष असतो आणि लोकही ते फुल आवडीने वाहतात. फुलं कुठलीही वाहा. त्याबद्दल काही नाही. पण अशी अनेक झाडाची उदाहरणे देता येतील की जी आता आपल्या इतकी अंगवळणी पडली आहेत हे आता सांगून सुद्धा पटणार नाही. गाजर गवत, कॉंग्रेस गवत, सुबाभूळ, गुलमोहर, निलगिरी ही सगळी भारतात आलेली झाडे म्हणजे खरंच आपलं दुर्भाग्य म्हणावे लागेल. गावांबरोबरच आता शहरांमध्ये सुद्धा आता “देशी झाडे लावा” यावर जोर दिला गेला पाहिजे. डोळसपणाने याकडे बघणे आता गरजेचे झाले आहे. आता तुम्ही म्हणालं की परदेशी झाडे नका लावू तर मग कुठली लावावी. त्यासाठी दोन्ही प्रकारच्या झाडांची नावे देत आहे. परदेशी झाडांची नावे फक्त माहीत असावीत म्हणून देत आहे. कृपया त्याचा प्रचार करू नये. 

स्थानिक वृक्षांची यादी :

१) फळ झाडे - आंबा, कोकम, बोर, फणस, कवठ, भोकर, करवंद, आवळा, बेल, जांभूळ, चिंच, उंबर, शेवगा. २) फुलं झाडे - पारिजातक, एक्झोरा, कामिनी, सोन चाफा, बकुल, तामण, पळस, पांगारा, कदंब, शिरीष, बहावा, मोह, सावर, कुंभा, नागचाफा. ३) औषधी झाडे - हिरडा, बेहडा, बिब्बा, आवळा, बिजा, सीता अशोक, रक्त चंदन, चंदन, नीम, रोहीतक, टेटू, अर्जुन. ४) इतर स्थानिक झाडे- आपटा, सातवीण, सालई, चारोळी, भेरली माड, तमालपत्र, शिसम, नांदरूक, शिवण, धामण, धावडा, अंजन, वारस, कुडा, मोई, कळम, बारतोंडी, करंज, रिठा, सीता अशोक, करू, मुचकुंद, अंजनी, मेढशिंगी, सावर, हिवर, पिसा,

परदेशी वृक्षांची यादी :

गुलमोहर, नीलमोहर, उन्दिरमारी (Gliricidia), विलायती चिंच, बिट्टी, बुच, अनंत, कांचन, कवठी चाफा, पांढरी सावर, महोगनी, निलगिरी, कैलासपती, सिल्वर ओक, कॉपर पॉड, काशीद, पिचकारी, वेडी बाभूळ, गोरख चिंच. )

ब्रिटीशांच्या काळात सामान्य भारतीय माणसाला जशी वागणुक मिळाली तशीच सध्या स्थानिक झाडांना मिळते आहे. त्यामुळे परिस्थिती अजून चिघळण्याच्या आत आपण पाऊल उचललेले बरे नाहीतर टणटणी किंवा घाणेरी (Lantana) जशी फुलपाखरे आणि पक्ष्यांनी आपलीशी केली त्याप्रमाणे इतर देशी झाडांच्या अभावी सगळी परदेशी झाडे त्यांना आपलीशी करण्यापलीकडे दुसरा पर्याय राहणार नाही. तसे झाले तर अन्नसाखळी मोडकळीस येईल आणि आपण सगळं गमावून बसू. स्थानिक झाडांच्या प्रबोधनाने हे आपण साधू शकू. पण त्याबरोबर प्रशासनाने आणि प्रत्येकाने आपली वैयक्तिक जबाबदारी समजून जर याकडे जागरूकतेने लक्ष घातले, स्थानिक झाडे लावली, तर आपण सर्वांसाठीच एक उज्ज्वल भविष्य घडवू शकू.

पर्यावरण सप्ताहातील स्वाती केळकर यांचा खाली दिलेला लेखही वाचण्यासारखा आहे. नक्की वाचा 

पर्यावरण सप्ताह : लेख ५ :विनाशाच्या पाऊलखुणा

- अमोल बापट 

[email protected]