नमिता वाट पाहत असलेलं पत्र एकदाचं आलं. तिच्या जिवात नुसती कालवाकालव होत होती. पत्र उघडून वाचायला सुरुवात करू की नको असं झालं होतं तिला. तरी तिने आपल्या बाबांचं पत्र वाचायला सुरुवात केली. आणि तिचे डोळे पाझरू लागले. आपल्या शिक्षणासाठी ते घेत असलेल्या कष्टांची तिला जाणीव होती. त्यातच तिचं हे दहावीचं वर्ष असल्यामुळे तालुक्याच्या गावी असूनही तिला घरी जाता आलं नव्हतं. घरी गेलं तर आईला घरात आणि बाबांना शेतात थोडी तरी मदत करता येते. पण या वेळी तिला आई-बाबांनीच सांगितलं होतं की, "हे वर्ष महत्त्वाचं आहे. जास्त अभ्यास करावा लागेल." आई-वडील गावात राहणारे असले तरी शिकलेले होते. त्यांनी जाणीवपूर्वक गावात राहून शेती करण्याचा निर्णय घेतलेला होता. पण आपल्या मुलीवर त्यांनी कोणतीही जबरदस्ती करायची नाही असं ठरवलं होतं. तिने अभ्यास करायचा आणि आपल्या आवडीचं क्षेत्र करिअर म्हणून निवडायचं. तीही नववीची परीक्षा झाल्या झाल्या अभ्यासाला लागली. मन लावून अभ्यास करू लागली. 
थोडी सुटी लागताच ती गावी गेली. खूप छान वाटलं तिला आई-बाबांना भेटून आणि आपलं गाव पाहूनही. मनोमन सुखावली ती. आपलं शेत, त्यात तरारलेली पिकं पाहून तिला आनंद झाला. आपलं खरं जग हे आहे, याची तिला परत एकदा जाणीव झाली. आणि आपण शहरापेक्षा आपल्या गावातच जास्त रमतो हेही तिला नव्याने कळलं. गावातून फेरफटका मारल्यावर ती एकदम फ्रेश झाली. घरी आली, आई-बाबांशी थोडा वेळ बोलली आणि सकाळी परत जाण्याची तयारी करू लागली. तयारी करून झोपली, सकाळी आई-बाबांचा निरोप घेऊन निघाली, पण कायमच मनात असणारं गाव या वेळेस अधिकच तिच्या मनावर कोरलं गेलं. 
परत आल्यावर हॉस्टेलवर दोन-चार दिवस तिला कंटाळा आला, अभ्यासातही लक्ष लागलं नाही. शाळा सुरूच होती, पण तिथेही लक्ष लागत नव्हतं, पण एक मात्र तिला उमजायला लागलं होतं की, या वर्षी आपल्या आयुष्याला नेमकं वळण लागणार आहे. त्यादृष्टीने आपण अजून काहीच विचार केला नाहीय. आई-बाबा आपल्याला काही म्हणत नसले तरी त्यांनाही काही तरी वाटतच असेल ना?. या विचाराने ती अधिक अस्वस्थ झाली आणि मग तिचं अधिकच लक्ष लागेनासं झालं. पण खूप काळ यात रमणं तिला परवडणार नव्हतं. म्हणून तिने लागलीच सगळी निराशा झटकून अभ्यासाला सुरुवात केली. 
असेच दिवसांमागून दिवस जात होते, बोर्डाची परीक्षा जवळ आली, तिने अधिक मन लावून अभ्यास केला. छान परीक्षा दिली. पेपर्स चांगले गेले तिला. परीक्षा संपताच ती गावी परतली. आई-बाबा आणि तिचं गाव यात ती रमून गेली....  छान चालू होतं तिचं सगळं... ती मनापासून शेतात आणि घर कामातही रमली होती. शेतात वेगवेगळे प्रयोग करता येतील असंही तिच्या मनात चालू होतं. सतत त्याच विचारात होती ती. झपाटल्यासारखी काम करत होती. तिची शेतीविषयी ही आपुलकी पाहून तिच्या आई-बाबांनाही मनोमन समाधान मिळत होतं. 
असं सगळं आलबेल चालू असतानाच निकालाची तारीख जाहीर झाली. आणि तिच्या विचारांना एकदम जोरदार वळण लागलं. मार्क्स चांगले मिळणार याची तिला खात्री होतीच, पण पुढे काय करायचं हे मात्र तिचं ठरलं नव्हतं. याच विचारात असताना ती कायम आपल्या आनंदाला प्राधान्य देत होती. मला ज्यातून आनंद मिळेल तेच माझं करिअर असेल, हा विचार तिने मनोमन पक्का केला आणि मग आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींची तिने वर्गवारी लावली आणि तिचा करिअरचा मार्ग जणू ठरूनच गेला. 
निकालाच्या दिवशी ती आई-बाबांबरोबर शाळेत आली. निकाल बघून खूश झाली... तिच्या आई-बाबांना तर आकाश ठेंगणं झालं. तिला ९५% मार्क्स मिळाले..... 
पुढे काय? या आई-बाबांच्या प्रश्नाला तिने एकदम ठामपणे उत्तर दिलं .... "मी शेतकीच" शिक्षण घेणार. तिची गावाची.. शेताची, त्यातल्या पिकांची आवड तिच्या आई-बाबांना माहितीच होती. त्यांच्या कष्टांचा चीज झालं होतं. तिचं शिक्षण त्या दृष्टीने सुरू होत होतं... 
- अर्चना कुडतरकर