कलिंगडाच्या शेतात मुले

सत्तू आज खूश होता. त्याच्या वर्गाची सहल त्याच्या शेतावर जाणार होती. सत्तूच्या वडिलांनी त्याला शहरात, मोठ्या शाळेत शिकायला ठेवलं होतं. सत्तूचं मूळ गाव सातारा जिल्ह्यात फलटणजवळ होतं. तिथे त्यांची शेती होती. सत्तू तिथल्याच शाळेत जात असे. शाळा संपल्यावर मित्रांसोबत मजा करत असे. शाळेतून घरी येणारी वाट ओढ्याच्या काठानं होती, तिथे अनेक गमती दडलेल्या असत. कधी एखादा सरडा बघायला मिळे, तर कधी शंभर पायांची गोम. पावसाळ्याच्या सुरुवातीला भरपूर जांभळं! त्याचं शेत मोठं नव्हतं. तरी तिथे खूपच गोष्टी चालत. सत्तू लहानपणापासून आपल्या वावरात जात असे आणि तिथे चाललेल्या गोष्टी बारकाईने बघत असे. त्या छोट्या शेतात ज्वारी पिकायची. दर वर्षी थोडी जागा उसाला सुद्धा मिळे. बांधावर आंब्याची, शेवग्याची, कडूनिंबाची झाडं होती.अ

 एक छोटं शेततळं तिथे होतं. तिथे मासे कुठून यायचे याचं सत्तूला नेहमी आश्चर्य वाटायचं. उन्हाळा वाढू लागला की, तळं कोरडं व्हायचं. तिथं अनेकदा काकड्या घेतल्या जात. ताज्या रसरशीत काकड्या तोडून खाणं हा सत्तूचा आवडता उद्योग होता.

यावर्षी त्याच्या वडिलांच्या मनात काय आलं कुणास ठावूक, त्यांनी ठरवलं की सत्तूनं आता शहरातल्या शाळेत शिकलं पाहिजे, इंग्रजी शिकलं पाहिजे आणि भरपूर प्रगती केली पाहिजे. सत्तूला हे सगळं न कळण्यातलं होतं. आपलं गाव आणि आपली शाळा सोडून कशाला दुसरीकडे जायचं आहे? असं त्याला वाटायचं. पण वडिलांच्या मनात आपल्या भविष्याबद्दल वेगळे विचार आहेत असं त्याला कळून चुकलं. आईसुद्धा त्याच मताची होती. आता सत्तू आणि आई सत्तूच्या शिक्षणासाठी शहरात राहणार आणि वडील गावाकडे असं ठरलं. वडील अधूनमधून भेटायला येणार होतेच. आणि सत्तूही अधूनमधून शेतावर जाऊ शकणार होता. पण घरी जायचा हट्ट सारखा धरायचा नाही असं त्याला बजावलं गेलं होतं! सत्तू बिचारा काय करणार?

नवी शाळा बघून सत्तूला मनातून छान वाटलं. तिथे केवढं काय काय होतं! भली मोठी शाळा, मोठं ग्राउंड, वेगवेगळ्या खेळांच्या व्यवस्था, स्विमिंग पूल, कँटीन (तिथले नवनवीन पदार्थ), प्रशस्त वर्ग, प्रयोगशाळा हे सगळं बघून सत्तूला भारी’ वाटलं. अडचण एकच होती. तिथे फार इंग्रजी बोलावं लागत होतं. सत्तूला थोडफार इंग्रजी येत होतं. पण इथे म्हणजे सतत फक्त इंग्रजीत बोलायचं. सत्तू जरा दबून गेला. कोणात फारसा मिसळेना. वर्गात सुद्धा गप्प गप्प. त्याला तोंड उघडायची भीती वाटत होती.  इंग्रजी तर इंग्रजी, आपलं मराठी सुद्धा गावाकडचं मराठी आहे हे त्याला कळून चुकलं. लई मज्जा!’ एकदा तो उत्साहाच्या भरात म्हणाला, तर सगळे एवढे हसले.

असेच काही महिने निघून गेले. आताशा तो एकटा एकटा राहू लागला होता, ही गोष्ट शिक्षकांच्या लक्षात आली. तशी ती आईच्या आणि मग वडिलांच्याही लक्षात आली. प्रश्न फक्त इंग्रजीचा होता का? पहिलं सत्र पार पडल्यावर सत्तूचे वडील एक दिवस शाळेत मुख्याध्यापकांना भेटायला आले आणि त्यांनी एक योजना बनवली. सत्तूच्या वर्गाची सहल सत्तूच्या शेतावर न्यायची अशी योजना. शिक्षकांना ही कल्पना फारच आवडली आणि एक दिवस वर्गात या सहलीची घोषणा झाली. आपल्या वर्गातली मुलं आपल्या शेतावर येणार आहेत हे ऐकून सत्तूला काय आनंद झाला! त्या दिवशी शिक्षकांनी वर्गात पहिल्यांदाच त्याला खूश पाहिलं. मुलं त्याला प्रश्न विचारत होती. आणि तो मोकळेपणानी सांगत होता. आपलं शेत किती दूर आहे, गाव कसं आहे, तिथे काय काय बघण्यासारखं आहे, सगळं तो बोलत होता.

पण आपलं गाव आणि शेत सगळ्यांना आवडेल ना? नाही आवडलं तर?

त्या दिवशी शाळेची बस गावात शिरली आणि शेतासमोर थांबली. सत्तू सगळ्यांच्या पुढेच होता. त्याचे बाबा पुढे झाले आणि त्यांनी गुळाचा खडा प्रत्येकाच्या हातात ठेवून सगळ्यांचं स्वागत केलं. गूळ काय खायचा? काहीजण म्हणालेच. पण सगळ्यांनी गूळ मिटक्या मारत खाल्ला. तो काळसर गूळ इतका खमंग लागेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. तो गूळ शेतातच गुर्‍हाळ लावून तयार केलाय याचं त्यांना अप्रूप वाटलं. पाणीबिणी झाल्यावर मुलं वावरात फिरायला निघाली. अनेकांची बांधावरून चालताना त्रेधातिरपिट होत होती. कुणी घसरलं की सगळ्यांनाच हसू येत होतं. बांध मोडायचा नाही बरं का! शिक्षक मधूनमधून सूचना देत होते. सत्तू सगळ्यांच्या पुढे होता. तो चालत नव्हताच. फुलपाखरासारखा उडत होता. मधूनमधून मुलांना आपल्या शेताची, परिसराची माहिती सांगत होता. नीरा नदीवरून पाणी येतं बरं का आमच्या शेताला, कालव्यानी!’ तो सांगत होता. शेततळ्यापाशी सगळे थांबले. तिथे पाणी चमकत होतं. ते बघा मासे.. सत्तू म्हणाला. सगळेजण मासे बघू लागले. मला वाटतं, पक्ष्यांच्या पायांना लागून माशांची अंडी येत असतील.. मी पाहिलंय त्यांना इथे उतरताना. सत्तू म्हणाला. अरे, हा विचार आपल्याला सुचलाच नव्हता! मुलांना वाटलं.

तेवढ्यात कुणीतरी ओरडलं, कलिंगड! ते बघा, कलिंगड लागलंय.. सगळ्यांच्या माना त्या दिशेने वळल्या. मला दिसलं.., अबीर म्हणाला, मला अजून एक दिसलं..किती सुंदर दिसतंय गोल गरगरीत. केया म्हणाली, मी कधी शेतातलं कलिंगड पाहिलंच नव्हतं श्रेया म्हणाली, केवढी नाजूक वेल आणि केवढं कलिंगड!.  आपल्याला खायला मिळालं तर? अर्जुन उद्गारला. तशी सत्तूचे बाबा हसत हसत पुढे झाले. कलिंगड खायचंच आहे. पण एक नाही, भरपूर ..चला हे ऐकून सगळेच त्यांच्या मागे धावले. एका मोठ्या चिंचेच्या झाडाखाली कलिंगडांची रास ठेवण्यात आली होती. पण कलिंगड खायचं कसं? सुरी? प्लेट? मुलांच्या चेहेर्‍यांवरचे प्रश्न बघून सत्तूच्या बाबांनी मुलांना कलिंगडाचे हातानीच आघात करून दोन भाग कसे करतात ते दाखवलं. हाताचीच सुरी! मुलांनाही पद्धत खूप आवडली. मुलं सरसावणार तेवढ्यात सत्तूचे बाबा म्हणाले, एक अट आहे, आपण कलिंगड खायचं आणि बिया शेजारी ठेवायच्या, ढीग झाला पाहिजे बियांचा. आणि मग या बिया आपण पुढच्या वर्षी रुजवणार आहोत आणि अजून कलिंगडं खाणार आहोत. ही अट मुलांना फारच आवडली. आम्ही येऊ शकतो का बिया रुजवायला? चारूनं विचारलं. आम्हाला बघायचंय आमच्या बीमधून आलेलं कलिंगड. अगदी जरूर. आपण लावलेल्या बीपासून वेल कशी तयार होते, फळ कसं धरतं, मोठं कसं होतं, हे सगळं बघायला तुम्हाला खूप आवडेल. बाबा म्हणाले.

पण किती दिवस लागतात फळं तयार व्हायला?, निनादनं विचारलं.

तीन ते चार महिने.

बाप रे. एवढा वेळ!, निनादचे डोळे मोठे झाले. तसे सगळेच हसले.

सत्तू कलिंगडं फोडायला एकदम तयार होता. ज्यांना जमत नाही त्यांना त्यानं मदत केली. सत्तूचं कौशल्य बघून सगळ्यांना त्याच्याविषयी ग्रेट वाटत होतं. भरपूर कलिंगड खाऊन, जेवून आणि मजा करून ट्रीप संपली. बसमधे बसताना सगळ्यांमधे एक वेगळच चैतन्य होतं. सगळे हसत होते, आरोळ्या देत होते, गाणी म्हणत होते, एकमेकांत मिसळून गेले होते. सत्तूसुद्धा त्यांच्यासोबत गात होता, ओरडत होता. तो आज खूप खूश होता... खूप खूश.

- मृणालिनी वनारसे