कोबीच्या छोट्याशा रोपापासून तयार झालेला कोबी आणि तोही लेखिका मैत्रेयी केळकर यांच्या गच्चीतल्या शेतीतला

पाऊस पडून गेला की, कसं मस्त वाटतं. वातावरण थंडगार होतं. मोठमोठी झाडं अगदी गर्द हिरवी दिसू लागतात. एक दोन दिवसातच मातीतून इवलाले गवताचे कोंब उगवू लागतात. बघता बघता अवघी सृष्टी हिरवीगार होते. मन प्रसन्न होऊन जातं . 

निसर्ग आणि माणसाचं नातं अतूट असं आहे. फक्त पाऊस काळातच नव्हे तर सदैव हा हिरवा खजिना आपल्याला जपता आला  तर . .  . .                        
त्यासाठी हिरवाईचा म्हणजेच बाग कामाचा छंद लावून घेतला पाहिजे. यातून छंदाचा आनंद तर मिळेलच पण मनाला विरंगुळा होऊन, प्रसन्नता लाभेल. 
बागकाम म्हटलं म्हणजे आपल्याला पहिल्याने आठवतात त्या कुंड्या, माती आणि लागणारी जागा. बरेच वेळा या गोष्टी हाताशी नसतात. मग  
आपल्या उत्साहावर विरजण पडतं. आपली  बागकामाची हौस अपुरीच राहाते. 
पण यावरसुद्धा उपाय आहे. त्यासाठी पहिलं काम करायचं ते म्हणजे आपल्या घराच्या किंवा सोसायटीच्या आवारातला वाळलेला पालापाचोळा जमवायचा. 
रसवंतीगृहातून उसाची चिपाडं आणायची. मुठभर माती आणि नारळाच्या शेंड्या जमवल्या की झाली तयारी. जरा पाचसहा तास ऊन मिळेल असा घरातला किंवा गॅलेरीतला एखादा कोपरा निवडला की झालं. कुंड्यांच म्हणाल तर जुने डबे , थरमाकोलचे चौकोनी तुकडे, रंगांचे डबे, बिसलेरीचे मोठे कॅन असं काहीही घ्या. भाज्यांच्या बिया लावण्यासाठी तर सुरुवातीला चक्क आईसक्रीम किंवा श्रीखंडाचे डबे सुद्धा चालतील. 
कुठलीही कुंडी भरताना आधी लहान खापराचे किंवा फरशीचे तुकडे कुंडीतील छिद्रांवर ठेवा म्हणजे  छिद्र मोठं असलं तर सगळंच पाणी वाहून जाणार नाही. मग त्यावर वाळलेला पालापाचोळा भरा. उसाची चिपाडं एकदा पाण्याने स्वच्छ धुऊन त्यातला उरलासुरला साखरेचा अंश काढून तीही भरा. अगदी थोडी माती असेल तर घाला', वाळलेलं शेणखत घाला (हे गोठेवाल्यांकडे मिळतं). वरून नारळाच्या शेंड्यांचा भुगा पसरून त्यात बिया लावा किंवा मग रोप, फांदी जे हवं ते लावून घ्या. नारळाच्या शेंड्यांना पर्याय म्हणून तुम्ही बाजारात मिळणारं कोकोपीट वापरू शकता.
फुलझाडांची  रोपं  लावायची, तर त्यांची एखादी फांदी मिळतेय का पाहावी. गोकर्ण , गुलबाक्षी यांसारखी झाडं बिया लावूनही तयार करता येतात. निशिगंध, लिलीचे कांदे लावता येतात. अबोली, कोरांटी, जास्वंदीच्या फांद्या सहजी रूजतात. 
घरच्या गच्चीतली रताळ्याची रोपं
भाजी लावायची असेल तर मेथी सर्वात उत्तम. घरातलेच मेथी दाणे पेरले की काम भागतं. शिवाय मेथी अगदी एक दोन दिवसात अंकुरते. आठवड्यात कोवळी पानं आमटी-भाजीसाठी वापरता येतात.
मेथीची छोटी छोटी रोपे
बाजारातून आणलेल्या पुदिनाच्या काड्या रोवून पुदिना मिळवता येतो. लसणीच्या पाकळ्या लावून कोवळी लसूणपात हवी तेव्हा मिळवता येते. कांद्याचंही तेच भाजीपुरती, सॅलेडपुरती पात एक कुंडी सहज पुरवू शकते. जरा बऱ्यापैकी मोठी जागा असेल तर रताळी, अळू असे कंदही लावता येतात. 
नवे-ताजे धने हाताने चुरडून घातले तर कोथिंबीरही लागते. परंतु कोथिंबीर थोडी  नखरेल आणि नाजूक आहे. पहिल्या प्रयत्नात उगवून येईलच याची खात्री देता येत नाही. 
कुठे नर्सरीत खात्रीशीर बी मळालं तर पालक, कोबीसुद्धा कुंडीत लावता येतो.  आता एवढी तयारी झाली की, झाडं थोडी वाढीला लागेपर्यंत आपण त्यांना लागणारं खत आणि माती तयार करायला सुरुवात करावी. एखाद्या मातीच्या, प्लास्टिकच्या भांड्यात, प्रसंगी जाळीच्या पिशवीत आेला कचरा जमा करून त्यावर हलका मातीचा थर देऊन कंपोस्ट करायला ठेवावं. रोजचा आेला कचरा त्यात जिरवावा. हळूहळू उपयुक्त खत तयार होईल. 
झाडं जरा जोमदार झाली की, मऊ असा आेला कचरा (भाज्यांची देठं, सालं) असं मिक्सरवर वाटून तो लगदा मातीच्या थरात मिसळून घातला तरी काम होतं. 
कडुनिंबाच्या पानांच उकळवलेल पाणी, तंबाखूचं, लसणीचं पाणी नेैसर्गिक कीड प्रतिबंधक म्हणून वापरावं. गोमुत्रही वापरता येतं. 
खरं तर या सगळ्यासाठी थोडा वेळ, आवड, कल्पकता आणि चिकाटी एवढ्याच गोष्टी लागतात. 
अजिबात खर्च न करताही आपण आपली बाग मग उत्तम फुलवू शकतो. 
आपल्या धकाधकीच्या जीवनात बाग एक सुखाचा, आनंदाचा ठेवा होऊन जाते. पावसातला हिरवा निसर्ग सदैव घरी वस्तीला येतो. मग लागतायना कामाला? 
 
काय लावताय मेथी का अळू, 
कोथिंबीर, पुदिना की रताळू
जास्वंद, कोरांटी का अबोली
निशिगंध, गोकर्ण की चमेली
एक तरी रोप लावा दारी 
निसर्ग सखा राहील घरी
 
 
- मैत्रेयी केळकर