विविध प्रकारच्या बीजांची अंकुरण्याची प्रक्रिया

नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे आणि पहिल्या पावसापाठोपाठ जिथे जागा मिळेल तिथे हिरवे कोंब डोकं वर काढत आहेत. रख्ख तपकिरी रंगावर हिरवी मखमल पसरते आहे. बी रूजणं ही निसर्गाच्या अरभाट पेटाऱ्यातील एक छोटीशी जादू. पण या छोटया जादूने पृथ्वीचं भवितव्य घडवलं.

असं म्हणतात की, दहा हजार वर्षांपूर्वी केव्हातरी अश्मयुगातल्या कुण्या शहाण्या व्यक्तीने रानात जमवलेले दाणे जमिनीत टाकले. जमिनीच्या कुशीत तरारून ते वर आले आणि क्रांती झाली. भटका फाटका माणूस स्थिरावला आणि अंकुरत्या बीजापोटी बळीराजाच्या संपन्न संस्कृतीचा उदय झाला. बी आणि रोप ही प्रक्रिया माणसाच्या लक्षात आली.

 

आपल्या रोजच्या आयुष्यात रूजलेल्या बियांची आपल्याशी सतत भेट होत असते. त्यातल्या काही बिया म्हणजे कडधान्य आणि त्यांना येणारे मोड. पण अतिपरिचयात अवज्ञा झाल्यामुळे ही बी आहे हेच आपण विसरतो. ही मोड येणारी किंवा कोणत्याही बीजातून कोंब बाहेर येणारी प्रक्रिया अगदी फालतू वाटत असली, तरी प्रत्यक्षात किचकट आहे. कारण बी रूजणार की नाही हे पाणी, प्राणवायू़, प्रकाश, तपमान या आणि अशा अनेक घटकांच्या अनेकपदरी संबंधावर अवलंबून असतं.

 

पाणी हा यातला सर्वाधिक आवश्यक घटक. त्याची व प्राणवायू़ची जोडी जमलेली आहे. कोरडया बिया पाणी पिऊन टम्म झाल्या की, खडबडून जाग्या होतात. मग रेणूंच्या पातळीवर अनेक घटना घडतात. तान्हया बाळासाठी घरात असते तशीच लगबग सगळ्या पेशींमधे सुरू होते. सर्वप्रथम टरफलाचं बंद दार किलकिलं होऊन प्राणवायू आत येतो आणि अंकुर श्वास घेऊ लागतो. अंकुराच्या वाढीसाठी अनेक विकरं (enzymes) कार्यान्वित होऊ डी.एन.ए़.आर.एन.ए. आणि प्रथिनं तयार करू लागतात. ती साठवलेल्या अन्नाचं रूपांतर ऊर्जेत आणि इतर आवश्यक रेणूंत करतात. तसंच फायटिनचं विघटन करून साठवलेले क्षार उपलब्ध करून देतात. फायटिनचं विघटन माणसासाठीही उपयोगी असतं. कारण त्यामुळे कडधान्यं पचायला सोपी होतात. 

 

तपमान सर्वच बियांना उबदार लागतं. मात्र प्रकाशाचं तसं नाही. प्रकाशाच्या गरजेनुसार रूजवणीचे दोन प्रकार आहे एक म्हणजे जमिनीवर होणारी आणि दुसरी म्हणजे जमिनीखाली होणारी रूजवण. अगदी लहान बिया जमिनीच्या वर प्रकाशाच्या सान्निध्यात रूजतात, कारण त्यांच्याबरोबर झाडांनी भूकलाडू दिलेले नसतात. त्यामुळे नव्या रोपाला लगेच अन्न तयार करणं भाग असतं. याउलट घेवडयासारख्या मोठया अन्नाचा साठा बाळगसाऱ्या बिया प्रकाशापासून दूर जमिनीत खोल रूजतात. भुर्इतून वर आली की, त्यांची दलं हिरवी होऊन पानांचं काम करतात. 

 

या दोन प्रकारांशिवाय सापडणारा विचित्र प्रकार म्हणजे दलदलीत वाढणाऱ्या सुंदरीच्या (mangroves च्या) झाडांचा. ही झाडं चक्क लेकुरवाळी असतात. म्हणजे यांची फळं झाडावर असतानाच त्यातल्या बिया रूजून रोपं तयार होतात आणि सोटमूळ पुरेसं मोठं झाल्यावर आर्इच्या कडेवरून उतरावं तशी रोपं हलके गळून दलदलीत रूजतात. नारळाच्या काही जातीतही अशी रूजवण दिसते.

 

एकंदरीत बहुतेक झाडांमधे 'माती, पाणी, उजेड, वारा’ यावरच बी रूजणं अवलंबून आहे. हे सर्व घटक सहजगत्या नियंत्रित करता येतात त्यामुळे त्यांच्यावर आधारित अनेक सोपे आणि स्वस्त प्रयोग वेगवेगळया वयोगटांकडून करून घेणं आणि मुलांना शास्त्राची गोडी लावणं शक्य आहे. विशेष म्हणजे हे प्रयोग खाद्य (मोडाची कडधान्यं) आणि वाद्यं (आंब्याची कोय) तयार करत असल्यानं मुलांनाही आवडतात.

 

मुलांसाठी अमेरिकेत नासानेही एक असाच पण अंमळ खर्चिक प्रयोग केला आहे. आपल्याला माहीत आहे की, रूजल्या कोंबाच्या वाढीवर (स्टार्च) साठवणारी "मायलोप्लास्टस् आणि संप्रेरकांच्या जोडीनं" गुरूत्वाकर्षण परिणाम करतं. त्यामुळे मुळं जमिनीकडे तर अंकुर जमिनीच्या विरूद्ध दिशेला वाढतात. अंतराळात गुरूत्वाकर्षण नसल्याचा रोपांवर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी नासाने मोहरीसारख्या एका झाडाच्या बिया यानातून  अंतराळात नेल्या. त्याच झाडाच्या बिया त्यांनी युरोप आणि अमेरिकेतल्या शाळांत वाटल्या. अंतराळात नेलेल्या बिया यानात प्रयोगशाळेत रूजवल्या. याच वेळी पृथ्वीवर मुलांनीही बिया रूजवल्या, तेव्हा असं दिसलं की अंतराळात अंधारात रोपे सर्व दिशांना वाढली तर उजेडात फक्त प्रकाशस्त्रोताच्या दिशेने वाढली. तसंच पृथ्वीवर अंतराळापेक्षा कमी काळात जास्त टक्के बिया रूजल्या. मला यात निष्कर्ष काय आले? यापेक्षा मुलांचा प्रयोग निरीक्षण नोंद आणि विश्लेषण या सगळ्यातला सहभाग व त्यांना आलेला हुरूप महत्त्वाचा वाटला.

 

बीज अंकुरणं आणि न अंकुरणं दोन्ही प्रक्रिया फार महत्त्वाच्या आहेत. माणसासाठी शेतात गहू अंकुरणं जितकं गरजेचं आहे, तितकंच कोठारात न अंकुरणंही. तसंच झाडांसाठी योग्य पर्यावरण नसताना बिया रूजण्यापेक्षा त्या सुप्तावस्थेत राहणंच उपयुक्त आहे. रूजवणक्षमता प्रजातीनुसार बदलते. काही बिया लगेच कुजतात तर काही शेकडो वर्षं रूजवणक्षमता टिकवून धरतात. याचे उदाहरण म्हणजे सायबेरियात सापडलेल्या सायलीन अल्बाच्या बिया. या बिया खारीसारख्या प्राण्याचा खबदाडातील खजिना असावा. हा सायबेरियातल्या कायमच्या गोठलेल्या जमिनीखाली (Permafrost) एका मॅमॉथशेजारी सापडला. रशियन शास्त्रज्ञांनी त्या प्रयोगशाळेत रूजवल्या. आणि अवघे ३२ हजार वर्षे वयमानाच्या त्या बिया चक्क रूजल्या आणि वाढल्याही.

काही बियांना मात्र रूजण्यासाठी बाहेरच्यांच्या मदतीची गरज असते. ऑर्किडच्या बिया निसर्गात काही खास बुरशींच्या उपस्थितीतच रूजू शकतात. प्रयोगशाळेत मात्र त्यांना या मित्रांची गरज भासत नाही.

 

काही बिया केव्हा रूजायचं हे 'ठरवतात'. अनुकूल परिस्थिती निर्माण होर्इतो त्या झोपून राहतात. आधुनिक संशोधनानुसार बियांत सुप्तावस्थेचा काळ असणं हे ते झाड अधिक उत्क्रांत आणि बुद्धिमान असण्याचे दयोतक आहे. याच महिन्यातल्या 'जून २०१७' ब्रिटिश शास्त्रज्ञांच्या शोधनिबंधानुसार ऑराबिडॉप्सिसच्या अंकुराच्या मुळात त्याचा 'मेंदू’ असतो. हा मेंदू फक्त २५ ते ४० पेशींचे २ पुंजके असतात. एक पुंजका अंगार्इ म्हणत सुप्तावस्थेचा संदेश देतो, तर दुसरा भूपाळी गात रूजण्याचा आदेश देतो. संदेशवहनाचं काम संप्रेरकं करतात आणि दोन्ही पुंजक्यांचं मतैक्य झालं की, बिया रूजतात.

 

पण ही सारी वैविध्यं टिकवायची कशी हा प्रश्न माणसापुढे आ वासून बसला आहे. यासाठी प्रलयाच्या दिवसाची तयारी म्हणून शास्त्रज्ञ मनू किंवा नोहासारखे तयारी करत आहेत. त्याकरता जमतील तेवढया बिया जमवून त्यांच्या बँका तयार केल्या जात आहेत. या बँकांचे खास व्हॉल्टस ठेवण्यासाठी जागा शोधल्या जात आहेत. थंड कोरडं अंतरिक्ष हा पर्याय महागडा म्हणून नाकारला आहे. सध्या ध्रुवीय प्रदेशातल्या गुहांचा विचार चालू आहे, पण जागतिक तपमानवाढ पाहता या पर्यायातही काही दम दिसत नाही. तेव्हा चला़ रामबाण उपाय सापडेपर्यंत आपण खारीचा वाटा उचलू या. जमेल तितकी झाडं लावू या.. जोपासू या. बाकी कार्य सिद्धीला नेण्यास शहाण्या झाडांच्या बुद्धिमान बिया समर्थ आहेतच. 

 

रूजे अस्तित्वमायेचे बीज

तरू चहू अंगी फुले

वेदनेच्या फांदीवर

सुख पोरपणी झुले.

 

झुला जार्इ वरवर

फांदी कापे थरथर

दुःख तेच मूलाधार

सुख फक्त अधांतर

 

- स्वाती केळकर 

 -[email protected]