सहउत्पादने 

हाय फ्रेंड्स! कसा वाटतोय हा कोकणाशी होणारा परिचय. आवडतोय नं? मलाही खूप मज्जा येतेय तुमच्याशी गप्पा मारताना. इथपर्यंत आपण कोकणातील घरं, तेथील संस्कृती, तिथलं राहणीमान, शेती, वापरातील वस्तू-पदार्थ याबद्दल वाचत आलो. मागच्या लेखात आपण कोकणातल्या शेतीविषयी, अन्य पिकांविषयी बोललो. अगदी निवडक उत्पादनांवरही कोकणातले अनेक उत्पादक-शेतकरी आपलं उदरनिर्वाह चालवतात. याला कारणीभूत आहेत अतिरिक्त नफा करून देणारी या उत्पादनांची सहउत्पादनं.

आता तुम्ही म्हणाल की सहउत्पादनं म्हणजे काय? आपण प्रत्यक्ष उदाहरणच पाहू. भात, मासे, आंबा, फणस, नारळ, सुपाऱ्या, कोकम ही कोकणातली मुख्य उत्पादनं. कोकणातून सर्वत्र आज ही उत्पादनं जगभरात निर्यात होतात. यातली काही जशीच्या तशी निर्यात होतात तर काही प्रक्रिया करून, पण या मूळ उत्पादनांसह मागणी आहे ती यांच्या सहउत्पादनांना. सहउत्पादनं म्हणजे मुख्य उत्पादनांना जोडून येणारी उत्पादनं.

कोकणातला तांदूळ तर विकला जातोच. पण याच तांदळापासून पोहे तयार केले जातात. पोहे कांडण्याचा व्यवसाय रायगड जिल्ह्यात पेण, पनवेल भागात जास्त दिसून येतो. पूर्वी हे काम हाती होत असे, आता या व्यवसायाचा बऱ्यापैकी विस्तार झाल्यामुळे विजेवर चालणाऱ्या कांडणाच्या साह्याने पोहे कांडले जातात. याला जोडून येणारं उत्पादन म्हणजे पोह्याचे पापड. पेणचे गणपती जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढेच इथले पोह्याचे पापडही प्रसिद्ध आहेत. जगभरातून या पापड आणि मिरगुंडांना मागणी असते. पोह्याच्या पिठाचा डांगरही इथे विकला जातो. कुळथाला आणि त्याच्या पिठालाही बाजारात विशेष मागणी आहे.

हापूस आंब्यांना सर्वत्र किती मागणी आहे हे सांगायला नकोच. पण काहीवेळा आंबे प्रमाणित आकारात मोठे होत नाही किंवा काहीवेळा योग्य वेळात पिकत नाहीत. कधीतरी आंबा झाडावरून काढताना पडतो आणि विक्रीयोग्य राहत नाही. अशा वेळी या आंब्याचं करायचं तरी काय? याचं उत्तर आंब्याचा आटवलेला रस, आंब्याचं साठ (आंबापोळी), साखरांबा, आंब्याचं सरबत, आंबा जाम-जेली या रुचकर पदार्थात दडलेलं आहे. कच्च्या कैऱ्यांपासून तयार केली जाणारी लोणची, पन्हे, आमचूर पावडर हा एक वेगळा विभाग आहेच. कोकणात घरोघरी तयार होणाऱ्या या पदार्थांना आज बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. अशाच प्रकारे फणसाच्या रसावर प्रक्रिया करून त्यापासून फणसपोळी तयार केली जाते. हल्ली तर चक्क कच्चा फणस कॅनिंग केलेल्या स्वरूपात मिळतो. कच्च्या फणसाची भाजी खाणाऱ्यांसाठी ही पर्वणीच. काजू आणि कोकम हे देखील कोकणाला आर्थिक नफा करून देणारी उत्पन्न आहेत. आमसुलासह कोकमापासून केले जाणारे सरबत, अगळ, कोकम पावडर यालाही मागणी असते.

नारळाच्या झाडाचा शेंड्यापासून मुलांपर्यंत प्रत्येक भाग हा उत्पादकाला लाभ करून देतो. शहाळ, ओला नारळ यासोबतच सुकं खोबरं, खोबरेल ही उत्पादने पैसा देतातच. हल्ली नारळाच्या दुधापासून पावडर बनवण्याचा व्यवसायही कोकणात काहींनी सुरू केला आहे. नारळाच्या झाडाच्या झावळ्या घर शाकारायला उपयोगी पडतात, नारळाच्या फुलांचा आणि मुळांचा आयुर्वेदिक औषधं बनवण्यासाठी उपयोग होतो. खवलेलं ओलं खोबरंही विकायला ठेवलेलं मी पाहिलंय. नारळाला जोडून येते ती म्हणजे सुपारी. भारतीय धार्मिक विधींमध्ये नारळाइतकंच सुपारीलाही महत्त्व आहे. धार्मिक विधी आणि पानदानातील महत्त्वाचा घटक याखेरीज सुपारीचा नव्याने झालेला परिचय म्हणजे सुपारीच्या झाडांपासून बनवली जाणारी पर्यावरणस्नेही उत्पादने. यात शोभिवंत वस्तू, वापरून फेकता येण्याजोग्या ताटल्या, चमचे यांचा समावेश आहे. अर्थात या व्यवसायाच्या वाढीला अजून बराच वाव आहे.

कोकण आणि मासे यांचं नातं अद्वितीय आहे. इथल्या लोकांच्या आहाराचा हा मुख्य घटक. ताजे मासे हे तिथल्या तिथे घेऊन खाण्यात जरी मजा असली तरी आपल्या गावची खासियत असलेले मासे आज कॅनिंग केलेले, गोठवलेल्या स्वरूपात विकत मिळत आहेत. काही फिशरीज हा व्यवसाय करतात. त्यांच्यामार्फत कोकणातील स्थानिक मासे फ्रोझन स्वरूपात हे देश-परदेशात निर्यात केले जात आहेत. येत्या काळात कोकणाला जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे हे क्षेत्र ठरेल असं उद्योग जगतात म्हटलं जातं. सुकी मच्छी हा पारंपरिक व्यवसायही आता मोठ स्वरूप धारण करत आहे. माशांपासून निघणारं तेल आणि खतं ही आणखी दोन उत्पादनं मत्स्यव्यवसायाचा भाग आहेत. या माशांच्या जेवणासाठी लागणारे पारंपरिक घरगुती मसाले हाही याला जोडून येणारा व्यवसायच आहे.

कोकणात समुद्रकिनारी अनेक ठिकाणी शंखशिम्पल्यांपासून तयार केलेल्या शोभिवंत वस्तू, आभूषणं विकायला ठेवलेली दिसतात. अनेक हात या वस्तूंसाठी रोज शंखशिंपले शोधत फिरत असतात आणि या उत्पादनांमधली कलाकुसर तर आश्चर्यचकित करणारी असते.

कोकणातली उत्पादनं-सह उत्पादनं यांचा आपण या लेखात परिचय करून घेतला. आज अशा अनेक उत्पादनांनी कोकणाला उत्पन्न मिळवून द्यायला सुरुवात केली असली तरी अद्यापही कोकणातल्या माणसांमध्ये व्यवसाय करण्याची उर्मी निर्माण व्हायला खूप वाव आहे. त्यासाठी अनेक उद्योजक हात पुढे यायला हवेत. तसं झालं तर कोकणातल्या समृद्धीला खरा न्याय मिळेल. पुन्हा भेटू नव्या लेखात कोकणाविषयी अधिक गप्पा मारायला...

ही लेखमला नक्की वाचा. 

कोकणातल्या पाऊलखुणा ४

- मृदुला राजवाडे