सुंदरी

दिंनाक: 26 Jul 2017 12:04:05
सुंदरी 
चालून चालून आणि धावून धावून तिचं तोंड दुखू लागलं होतं. 
थोड्याच वेळात तिचं तोंड चांगलंच सुजलं.
तोंडातला दात ठणकू लागला.
दात ठणकतोय. तोंड सुजलंय. कळा असह्य होताहेत. तरीपण ती पळते आहे. धवते आहे. जोरजोरात दात घासते आहे.. 
तेव्हा जे व्हायचे तेच झाले..
तिचं सुंदर टोकेरी तोंड अगदी बथ्थड झालं!
आता जरा दोन मिनिटं विश्रांती मिळावी. पटकन तोंडाची दोन सालं काढावीत आणि पुन्हा नव्या दमाने पळायला सुरुवात करावी’ असं तिला वाटत होतं.
इतक्यात.. ..
पळता पळता ती घसरली. तिचं तोंड फुटलं.
तोंडातला काळा दात पडला.
तशी ती व्यवस्थित धडधाकट होती पण तरीही ती चांगली म्हणजे चांगलीच घाबरली. कारण..
दोनच दिवसांपूर्वी त्या समोरच्या बाकावरची तिची मैत्रीण तिचा नुसता दात पडताच, धाडकन कचर्‍याच्या डब्यात जाऊन पडली होती. डब्यात पडल्यावर तिने मारलेली किंकाळी अजून हिच्या कानात घुमत होती.
त्यानंतर.. ती पुन्हा कधीच दिसली नाही.
आता आपली रवानगी पण.. .. बहुधा कचर्‍याच्याच डब्यात होणार असं तिला वाटू लागलं आणि तिचं तोंड सुरकुतलं. तोंड भीतीने पिवळं पडलं.
तिने भीत भीत प्रियाकडे पाहिलं.
प्रियाचे डोळे मोठे झाले होते आणि भुवया उंचावल्या होत्या. 
आता कुठल्याही क्षणी छू.. असं तिला वाटत असतानाच, समोरच्या बाकावरची रिमा म्हणाली, ए प्रिये, असली मोडकी तोडकी काय कामाची? दे तिला फेकून.
हे ऐकल्यावर तर ती भलतीच भ्यायली.
उघड्या तोंडाने प्रियाकडे पाहू लागली.
तिला नीट कंपासमध्ये ठेवत प्रिया म्हणाली, ए रिमा काहीतरीच काय? ही पेन्सिल मला माझ्या आईने दिलीए. माझ्या वाढदिवसाला. मी खूप सांभाळते हिला.
आणि.. टोक तुटलं तर काय ती फेकायची? नाही गं बाई.
टोक काढायचं आणि पेन्सिलीच्या सालांपासून मस्त ग्रीटिंग तयार करायचं!
कंपासमधल्या पेन्सिलीने आपलं लाकूड घट्ट केलं.
आता कटर मध्ये गोलगोल फिरून सुजलेलं तोंड गुळगुळीत करून घ्यायचं आणि काळाकुळकुळीत दात चांगला घट्ट पकडून ठेवायचा तोंडात’ असं तिने ठरवलं.
कारण.. जर आपल्या तोंडात शिसे तर सारी दुनिया पाहून हसे’ असं त्यांच्यात म्हणतात हे तिला माहीत होतं.
कंपासपेटीत बाजूलाच एक जेलपेन आडवं पडलं होतं. त्याला जरा बाजूला ढकलून प्रियाने ती पेन्सिल तिथे ठेवली.
तिची ही अवस्था पाहून जेल पेन हळहळलं.
जेल पेन पुटपुटलं, अगं तुझं एक बरं आहे, तुझं टोक तुटलं तर नवीन तरी काढता येतं. पण आमची गोष्टच वेगळी.
म्हणजे?
जरी तुझं तोंड उघडं असलं तरी ते बंद असतं. म्हणजे जरी तुझा दात बाहेर असला तरी तो बंदच असतो ना?
अरे मला जरा समजेल असं सांग ना रे.. भाऊ.
अगं कागदावर पळता-पळता जर का आमच्या तोंडात कचरा गेला किंवा कागदाचा बारीक कण गेला तर आमची बोलतीच बंद होते! इतकंच काय, तोंड साफ केल्याशिवाय काही हालचाल ही करता येत नाही. त्यामुळे आम्हाला फार तोंड सांभाळून काम करावं लागतं.
तोंड ठेवा क्लीन तर रिफील मिळेल नवीन’ असं आमच्यात म्हणतात ते यासाठीच.
अगं बाई! हे तर मला माहीतच नव्हतं. तरी जेलू तुझं बरं आहे. तुला वर्षानुवर्ष नवीन रिफील मिळू शकतं. वर्षानुवर्ष तुझ्या तोंडाखालून अनेक कागद जाऊ शकतात. बर्‍यापैकी वाचन होतं. सरसरीत लेखन होतं. खरंच मजा आहे तुझी. हमारी तो बात ही अलग है.
अरे चाकूचे घाव सोसल्याशिवाय आमचं तोंड टोकेरी होत नाही.’ आम्ही  जोपर्यंत टोकेरी तोपर्यंतच एक नंबरी. नाहीतर आमचा पत्ता कट.
जेलू म्हणाला, आता हे पाहा, ही माणसं हाताने लिहितात आणि आपण तोंडाने!
म्हणजे आपली व त्यांची हाता-तोंडाची लढाईच असते तर..!
क्लीप उडवत घेत जेलू म्हणाला, आणि.. परीक्षेच्या वेळी तर विचारूच नकोस. मला तीन साडेतीन तास चिमटीत पकडून ते असे काही ताबडवतात की जेलचा शेवटचा थेंब असेपर्यंत ते मला सोडत नाहीत.
अशा वेळी रिफील संपली अन् सुटका झाली’ असं नही बरं..
जेलूला मधेच थांबवत पेन्सिलीने विचारलं, म..म काय करतात?
अगं बंदुकीत गोळ्या भरतात तसं ते आमच्यात नवीन रिफील भरतात आणि लगेचच फायरींग चालू!
त्यात पुन्हा ही नवी रिफील प्रथम माझ्याशी जुळवून घेताना फार कुरकुर करते तो भाग वेगळाच.
अशा वेळी कधी एकदा यांचा पेपर संपतो आणि जरा अंग टाकतो असं होतं मला. यांची परीक्षा म्हणजे माझ्या तोंडाला शिक्षा.
पेन्सिल म्हणाली, चित्रकला आणि आकृत्या या वेळी मात्र यांचा हात मला लागतो. बाकी परीक्षा म्हणजे माझ्यासाठी सुरक्षा.
क्षणभर थांबून विचार करत पेन्सिलीने विचारलं, हल्ली क्लच पेन्सिल नावाचा एक नवीनच सुंदर प्रकार आलाय म्हणे?
हॅ! नवीन कुठला? ही क्लच पेन्सिल दिसते माझ्यासारखी पण असते तुझ्यासारखीच. माझ्यात जसं रिफील भरतात तसं तिच्यात शिसं भरतात.
जेल पेनचं बोलणं ऐकून पेन्सिल खिन्नपणे म्हणाली, हं.. म्हणजे ही पेन्सिल असूनही फार दीर्घायुषी आहे तर.
झिजून जाण्याअगोदर एकदा मला पाहायचं आहे तिला. कशी आहे रे ती?
खरं सांगू, सगळ्या पेन्सिली इकडून तिकडून सारख्याच.
अगं ती भले दिसायला अगदी झॅकपॅक असेल पण तिच्या आत आहे तुझ्यासारखं शिसंच ना? घरोघरी शिसाच्या पेन्सिली’ ही चिनी म्हण तू ऐकली तरी असशील नाहीतर लिहिली तरी असशील.
अगं नुसतं सुंदर दिसलं म्हणूण काही कुणी मोठं होत नाही.
तू तुझ्यातल्या शिसाची किती काळजी घेतेस.
शिसं पुढं यावं म्हणून तू तुझं तोंड सोलून घेतेस. चाकूचे घाव सहन करतेस.
आणि.. शिसासोबत स्वत:ही झिजून जातेस.
ही क्लच पेन्सिल असं काहीही करत नाही.
तिचं शिसं झिजलं काय किंवा मोडलं काय? याची तिला अजिबात पर्वा नाही. ती आपली ढिम्मंच!
आता मला सांग, कोण मोठं आणि कोण सुंदर?
जेल पेनच्या या बोलण्यावर काय बोलावं ते पेन्सिलीला कळेचना.
इतक्यात..
कंपासच्या कोपर्‍यातून आवाज आला,
शिसं तर काय माझं पण झिजतं. पण
जे शिसासाठी झिजतात त्यांच्यावर सगळेच प्रेम करतात.
आणि जे सगळ्यांना आवडतात तेच खरे सुंदर असतात!
मुलांनो, सांगा बरं कंपासच्या कोपर्‍यातून हे कोण बरं बोललं असेल?
मी तुमच्या सुंदर ‘पत्रांची’ वाट पाहात आहे.
- राजीव तांबे