योग निद्रा  

नमस्कार बालमित्रांनो,

मागच्या  महिन्यात २१ जूनला योगदिन साजरा झाला. तुमच्या शाळेतही त्या दिवशी नक्कीच कार्यक्रम झाला असेल, पण असा कार्यक्रम फक्त तुमच्या शाळेतच नाही तर संपूर्ण जगातल्या अनेक देशांमध्ये झाला बरं का !!!

अशा या जगप्रसिद्ध झालेल्या “योग” या विषयाची माहिती मागच्या सहा महिन्यांपासून आपण ‘शिक्षणविवेक’मध्ये घेत आहोत. त्यातली योगनिद्रा ही संकल्पना तुम्ही वाचलीच आहे. पण ती वाचताना तुमच्या मनात हाही विचार नक्की आला असणार आहे की, “अरे, ही योगनिद्रा फक्त तान्ही बाळं आणि शिशुवर्गातल्या आपल्या धाकट्या भावंडांसाठीच आहे की काय?“ पण नाराज होऊ नका. या वेळी आपण साधारण इयत्ता पहिली ते पाचवीतल्या आपल्या सगळ्या मित्रांबरोबर योगनिद्रेचा आनंद कसा घ्यायचा ते शिकणार आहोत. तुम्हाला आवडेल, रम्य वाटेल, तुमच्या कल्पना शक्तीला वाव मिळेल अशीच ही योगनिद्रा आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचे आई-बाबा, ताई-दादा, शिक्षक नक्कीच मदत करतील.

ही योगनिद्रा तुमच्याकडून कशी करून घ्यायची ते मी पुढे सांगतोय...

ही प्रक्रिया १५ ते २० मिनिटांची असावी. पुढीलप्रमाणे शांत हळुवार आवाजात सावकाश वाचत जावे --------

मुलांनो, आज आपण एक छान खेळ खेळणार आहोत. त्याचं नाव आहे योगनिद्रा. पण खेळताना झोपी जायचं नाही बरं का!

पाठीवर झोपा. डोळे शांत मिटलेले. दोन्ही पायांचे स्नायू घट्ट आखडून घ्या आणि सैल सोडा. आता हात घट्ट करा आणि सैल सोडा. पाठीचे स्नायू आवळून घ्या आणि सैल सोडा. सगळं अंग आता ढीलं, सैल पडलंय. छान वाटतं आहे.

आता मी शरीराच्या एकेका भागाचं नाव घेणार आहे. त्या त्या भागात एक छोटासा दिवा लागलाय अशी कल्पना करा. शरीर हलवू नका, मनाशी बोलू नका. फक्त माझ्या आवाजाकडे लक्ष द्या....

एक छोटुसा चिंटूकला दिवा तुमच्या उजव्या अंगठ्यात लागलाय. उजवा अंगठा, त्याशेजारच बोट, मधलं बोट, चौथ बोट, करंगळी. तळहात, मनगट, कोपर, दंड, संपूर्ण उजवा हात, उजवा खांदा, छातीची कमरेची उजवी बाजू, उजवा पाय, तळपाय, उजव्या पायाची बोटं.

(याचप्रमाणे डाव्या बाजूच्या अवयवांची नावं घ्यावी)

आता कंबर, पाठ, पोट, छाती, डोकं, चेहरा कपाळ. आता संपूर्ण शरीराकडे लक्ष द्या.

आता श्वासाकडे लक्ष द्या. एका मोठ्ठ्या सुंदर निळसर रंगाच्या फुग्यात तुम्ही झोपला आहात.

तुम्ही श्वास घेतला की, तो फुगा आणखी मोठ्ठा होतोय. श्वास सोडला की फुगा लहान होतोय. (असं ५ वेळा म्हणावं )

जागे आहात ना.....?

शरीर स्वस्थ आणि शांत. लक्ष हृदयाकडे. हृदयाचे ठोके अनुभवा. ठक...ठक...ठक...

कल्पना करा... सगळीकडे सोनेरी धुकं पसरलंय... सगळीकडे सोनेरी हवा... ती सोनेरी हवा, तुम्हाला आजी-आजोबांचं प्रेम देतेय... फुलराणीचं प्रेम देतेय... जलपरीचं प्रेम देतेय...

श्वास बाहेर सोडताना न आवडणाऱ्या गोष्टी बाहेर टाका... राग बाहेर टाका... हट्ट बाहेर टाका... केलेल्या चुका बाहेर टाका.

आता लक्ष हृदयाकडे द्या. हृद्य सोनेरी रंगाने भरलंय.... त्यातून निळसर रंगाचा निळसर पंखांचा देवदूत बाहेर आलाय... तुमच्याकडे बघून तो हसतोय... तुम्हाला खूप खूप प्रेम देतोय... ते प्रेम तुम्ही सगळ्यांना वाटणार आहात... आईला...बाबांना...आजीला...आजोबाना...बहिणीला...भावांना...वर्गातल्या मित्रमैत्रिणीना...शिक्षकांना... ही संपूर्ण खोली तुमच्या प्रेमाने भरून गेलीय...

आता पुन्हा लक्ष शरीराकडे द्या. जमिनीवर तुम्ही झोपलायत तिकडे लक्ष द्या. मनातल्या मनात म्हणा ... मी सगळ्यांवर प्रेम करीन... मी मोठ्यांचं ऐकेन... मी नियमित अभ्यास करेन... मी नियमित खेळेन...

आता हातापायाच्या बोटांची किंचित हालचाल करा. हातपाय हळूवार हलवा. सावकाश डोळे उघडा. इकडे तिकडे पाहा. हातांचे तळवे अलगद डोळ्यांवरून फिरवा. चेहऱ्यावरून फिरवा. सावकाश डाव्या कुशीवर वळा. हळूच उठा.

योगनिद्रेचा अभ्यास संपलाय. सगळ्यांनी माझ्यामागून प्रार्थना म्हणायची आहे...

सदा सर्वदा योग तुझा घडावा |

तुझे कारणी देह माझा पडावा |

उपेक्षू नको गुणवंत अनंता |

रघूनायका मागणे हेचि आता |

|| जय जय रघुवीर समर्थ ||

योगनिद्रा तान्ह्या बाळांसाठीही खूप उपयुक्त असते, तिचं तंत्र जाणून घ्या खालील लेखातून.

तान्ह्या बाळांसाठी योगनिद्रा – भाग २

- मनोज पटवर्धन

[email protected]