निसर्गानंद 

दिंनाक: 24 Jul 2017 11:17:29
निसर्गानंद

शाळेच्या निकालाची कामं जोरात सुरू होती. विद्यार्थी केंव्हाच परीक्षा देऊन आपल्या सुट्टीचा आनंद उपभोगत होते. वर्गात शिकवायचं नव्हतं, म्हणजे म्हटलं तर निवांतपणा होता. आपल्या सोयीने आपल्याला वर्गाचं काम केलं की झालं. हेच निवांतपण थोडंस का होईना आळसावल्याची भावना जागवत होतं. एरवी वर्षभर नुसती कामाची धांदल. जरा म्हणून उसंत मिळत नाही. आणि आता पंधरा दिवसांनी येणाऱ्या सुटीचं सुख अंगभर आधीच पसरायला लागल्यासारखं झालेलं.  

का कोण जाणे पण त्या दिवशी सकाळी लवकर आवरलेलं असूनही ट्रेनने प्रवास  करत शाळेत जावं असं मुळी वाटलंच नाही. सकाळी सकाळी 'आेला' किंवा 'उबर' बोलावणंही नकोसं वाटत होतं. मग चक्क रिक्षा केली. एरवी दिवसा रिक्षेत बसणं नको वाटतं, उन्हाच्या कोण झळा लागतात, पण सकाळ मोठी प्रसन्न होती. रिक्षेतून जाताना लागणाऱ्या गार वाऱ्याबरोबर मनातल्या विचारांचा वारू चौखूर उधळला होता. सरळ सोट जाणारा मुंबई आग्रा हायवे, त्या प्रवासात कसली आलेय मजा असं कुणालंही वाटेल, पण मला तो इवला प्रवास म्हणजे एक रंजक सफर वाटत होती. काळ्या कुळकुळीत रस्त्यावर डाव्या बाजूने अगदी एका लयीत रिक्षा जात होती. सर्व्हीस रोड आणि मुख्य हायवेच्या दुभाजकांवर लावलेले बुटके सातवणीचे वृक्ष आेळीने डौलात उभे होते. हिरव्या गार पालवीत त्यांची किंचित हस्तिदंती पिवळट छटा असलेली  फुलं विलक्षण सुंदर दिसत होती. सातवणीच्या आेळीत टेबुबियाचे वृक्ष होते. त्यांची गुलबट पांढरी फुलं वृक्षभर फुलून आली होती. इतकी की पानं बापडी लक्षातच येत नव्हती. डांबरी रस्त्यावर त्या मखमली नाजूक स्पर्शाच्या फुलांचा विपुल सडा पडला होता. चटकन जपानच्या साकुराची आठवण झाली. जपानमध्ये चेरीचे वृक्ष असेच एप्रिलच्या सुमारास फुलतात अख्खा जपान त्या फुलांच्या उत्सावात अगदी न्हाऊन निघतो. टेबुबियाची फुलं मला त्या चेरीइतकीच मोहक वाटत होती. रूक्ष रस्त्याला कसं एक मोहक देखणेपण प्राप्त झालं होतं. मी वेडावल्यासारखी त्यांना निरखत राहिले. 
एेरोली सोडलं आणि आता त्याच अंगाला लांबवर पसरलेली मिठागरं लागली. सकाळचं चंदनी उन्ह पडून मिठागरांचे डोंगर चमकत होते. भोवती खाचरात वेगवेगळ्या ग्रेडची क्षारता असलेलं पाणी साठवून ठेवलं होतं. एकदोन दिवसात त्याची वाफ होणार होती. मग चांदण्यारात्री ते चमचमणारे  खारे स्पटीक असेच डोंगर स्वरूपात कडेला उभे राहून एखाद्या सकाळी असेच चमकणार होते. 
मोकळ्या दलदलीच्या खाचरात बगळे, तुतारी, शराटी पाणकावळे, ढोकरी असे कितीतरी पाणथळ जागी आढळणारे पक्षी . . . .  निवांत चरत होते. आपल्या लांब पायांनी पुढे सरकत नेमकं खाद्य वेचून खाणाऱ्या पक्षांच्या हालचाली विलक्षण मोहक होत्या. 
रिक्षा अजून थोडं अंतर कापून गेली आणि भांडूप पंपिंग स्टेशनच्या पुढचा तिवरांचा भाग सुरू झाला. हिरव्या पोपटी रंगाची पालवी ल्यालेली ती भक्कम झाडं लांबवरूनही साद घालत होती  इथेच हिवाळ्यातल्या कित्येक दुपारी मी बोटीतून मनसोक्त भटकून फ्लेमिंगो पाहिले होते. 
तिवरांना मागे टाकत पुढे सरकलेल्या गाडीला आता उजव्या हाताला  होती फुललेली बोगनवेलं. तिला एक आेळखीचं हसू पुरवून निघाले. आता सोबतीला होते पिंपळवृक्ष. लालसर गोंडस तुकतुकीत पानांचा साज अंगभर मिरवणारे. पिवळट पोपटी, न उमललेल्या पानांचे पिंपळ कळे तर फुलांहूनही मोहक दिसत होते. 
माझ्या या वानस मित्रांना निरखता निरखता आता विक्रोळीचा फ्लायओव्हर लागला. इमारतीच्या रांगांची जंतरी सुरू झाली. पण आज तीही निरस वाटत नव्हती कारण कुठे कुठे हिरव्या कैऱ्या धरलेली एक दोन आंब्याची झाडं दिसत होती तर सोनमोहराचा धुंद पिवळा फुलोरा झाडावर आणि रस्त्यावर गच्च पसरला होता. 
तामणाच्या फुलण्याने अजून जोम धरला नव्हता. कावळ्यांची घरटी पूर्ण व्हायची होती. पण कोकिळांचे आवाज घुमायला लागले होते. 
एवढ्याशा टिचभर प्रवासात निसर्ग मला असा अगदी उराउरी भेटत होता. 
क्यॅशुरीनापासून गाडी आत वळून पंतनगरला लागली आणि माझ्या पुरतं मी ठरवूनच टाकलं, अधे-मधे नाही तर आता जमेल तसं आणि जमेल तेव्हा असं मुद्दाम रिक्षेतूनच यायचं. वसंता नंतरचा ग्रीष्म आणि त्यापुढची पावसाची चाहूल आता मुळीच हुकवायची नाही. मिळणाऱ्या आनंदापुढे रिक्षेचा खर्च तसा फार नाहीच. 
मॉलमध्ये गेलो तर एरवी होतातच की भरमसाट खर्च. थोडा असा स्वतःवर केला तर  बिघडलं कुठं? आणि खरं सांगू आनंदाची का कोणी किंमत करत, तो अनमोल असतो. असा माझ्या हाताशी असलेला हा निसर्गानंद मला भरपूर लुटायचा आहे . 
एक सुचवू असा वेडेपणा तुम्ही ही एकदा करून बघाचं. काय सांगाव, मला लाभला निसर्गानंद  भरभरून तुमच्याही आेंजळीत पडेल . . .
मैत्रयी केळकर यांच्या शब्दात वाचा खालील लेख 
 
- मैत्रयी केळकर