बिबट्या आणि तरस 

फार फार वर्षांपूर्वी एका खूप मोठ्या जंगलात घडलेली ही गोष्ट. हे जंगल पाना–फुलांनी, वृक्ष-लतांनी, प्राण्या–पक्ष्यांनी बहरलेले होते. येथे कोणालाही कशाचीच कमतरता नव्हती आणि महत्त्वाचे म्हणजे या भागाला मानवाचा पायही लागला नव्हता. पर्यायाने सारं काही गुण्यागोविंदाने सुरू होते.

जंगलात एक अतिशय चपळ, शक्तिशाली असा बिबट्या एकटाच राहत असे. आपले स्वच्छंदी आयुष्य जगताना त्याला कोणाच्या सोबतीची, मैत्रीची गरज भासत नसे. रोज उठायचं आणि मोका मिळताच एखाद्या प्राण्याची शिकार करायची व त्या शिकारीला उंच झाडावर नेऊन शांतपणे तिच्यावर ताव मारायचा हा त्याचा नित्यनेम. आपल्यातला खाऊ आपल्या मित्रांना, नातेवाईकांना देणे त्याला पटत नसे. तो एकटाच सारं संपवून निवांत झोप काढत असे. याउलट त्याच जंगलात तरस नावाच्या प्राण्यांची एक टोळीच होती. ते सारे प्राणी आपले नातेवाईक, मित्र–मैत्रिणी यांच्यासोबत राहत व एकमेकांबरोबर खूप खेळत. त्यांचा आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या मित्र-मैत्रिणींविषयीचा भाव हा अत्यंत दृढ होता.

     अशा या तरसांच्या टोळीला मोठ्या मुश्किलीने शिकार मिळे. मात्र कोणीही शिकार केली, तरीही त्याचे वाटप मात्र सर्वांमध्ये सारखे होई. त्या तरसांच्या टोळीचा प्रमुख म्हणजेच त्या तरसांचा आजोबा पुढे येई व सर्वांना समजावे की, “आपण सारे एक आहोत. आज आपला चांगला काळ सुरू आहे. पण तरीही आपण समजूतीने एकत्र राहून आपल्याला जे काही मिळतंय त्याचा सर्वांनी आस्वाद घेतला तर पुढे कधी कठीण प्रसंग आलाच तर त्याला सामोरे जाणे आपल्याला सहज शक्य होईल. आपल्यातली एकी, जे आहे ते मिळून-मिसळून खाण्याची सवय पुढे आपल्याला या जंगलात कायम टिकवून ठेवेल.” हे ऐकल्यानंतर सर्व तरस त्या आणलेल्या शिकारीचा आस्वाद घेत. सर्वांचे पोट भरे, त्यामुळे त्यांच्यात नेहमीच आनंदी – आनंद असे.

तरसांच्या टोळीची ही गंमत पाहून बिबट्या मात्र हसत बसे. त्यांना चिडवण्यासाठी तो म्हणे, “अरे वेड्यांनो!, असे काय सगळं वाटून खाता. याने तुमचं पोट कसं भरणार? मला बघा. मी कसा आणलेल्या शिकारीवर एकटाच ताव मारतो. मला तर ते जेवण इतकं होतं की, जागचं हलताही येत नाही. अरे, माझ्यासारखं सुखी आयुष्य जगा जरा. काय असे रडत – खडत जगता?”

त्याचे हे बोलणे ऐकून सारे तरसांना त्यांच्या आजोबांनी दिलेली शिकवण आठवे. त्यामुळे आपली सवय ते मोडत नसत. अशा या जंगलात सारं काही सुरळीत चालू होतं. पण अचानक एका वर्षी मात्र जंगलात प्रचंड दुष्काळ पडला. नद्या, झरे, तलाव आटले. झाडे, वेली, पानं, फुलं कशाचेच अस्तित्व राहिले नाही. पाण्याअभावी जंगलात हाहाकार उडाला. प्राणी, पक्षी मरून पडले. जे टिकून होते, त्यांना खाण्यासाठी वणवण फिरावे लागे. असे वाटू लागले की, आता हे सारे जंगलच नष्ट होणार अशा परिस्थितीत बिबट्या सापडला होता. बरेच दिवस शिकार न मिळाल्याने त्याच्या अंगात त्राण राहिले नव्हते. पोट अगदी खपाटीला गेले होते. त्याला जागचे उठताही येईना. अशा परिस्थितीत कोणी आपल्याला मदत करेल का? अशी याचना तो करू लागला. मात्र त्याचा स्वभाव सर्वांनाच माहीत असल्याने कोणीही त्याला मदत करत नव्हते. त्याच वेळी आजही तितकीच आनंदी व समाधानी असणारी तरासांची टोळी त्याच्या नजरेस पडली. त्यांच्यावर दुष्काळाचा फारसा परिणाम झाला नसल्याचे त्याला दिसले. त्याला आश्चर्य वाटले, बिबट्याने न राहवून त्यांना त्यांच्या सुखाचे रहस्य विचारले.

 तरसांचे आजोबा पुढे आले व त्यांनी आपल्या टोळीला दिलेला संदेश बिबट्याला सुनावला. आज एवढी वाईट स्थिती असूनही आमच्यापैकी ज्याला काही अन्न मिळते तो आणून सर्वांमध्ये त्याचे वाटप करतो. परिणामी आमच्यापैकी कोणीही उपाशी राहत नाही. त्यामुळेच आज या दुष्काळाशी आम्ही सामना करू शकलो. तुही अशी सवय लावून आपल्या बांधवामध्ये गुण्यागोविंदाने राहिला असतास तर तुझ्यावर ही वेळ आली नसती. अरे बाबा, आता तरी डोळे उघड आणि स्वतःला बदल, असे म्हणत त्यांनी आपल्या शिकारीतला काही भाग त्यालाही खायला दिला व आपल्या मित्रांना व नातेवाईकांना जवळ करून, मिळून-मिसळून राहण्याचा सल्ला देऊन सारे मार्गस्थ झाले.

सावली ज. म्हात्रे.

[email protected]