जगाचा नकाशा

 

नकाशा  भूगोल या विषयाचा प्राण आहे, तो समजून घेतला तर आपल्याला भूगोल हा विषय समजून घ्यायला सोपे जाईल, त्यामुळे या लेखात नकाशा म्हणजे काय? भूगोल या विषयातलं त्याच महत्त्व काय ते समजून घेऊ. 

नकाशा म्हणजे पृथ्वीची सपाट कागदावर किंवा सपाट पृष्ठभागावर काढलेली प्रमाणबद्ध आकृती होय. तुम्ही जगाचा नकाशा, भारताचा नकाशा, महाराष्ट्राचा नकाशा हे पाहिले असतील. या नकाशांना प्रमाणबद्ध का म्हणायचे? तर उपग्रहांच्या साहाय्याने आणि त्यापूर्वी ही काही अचूक आकडेमोड करून पृथ्वीचे मोजमाप केले आहे. यामुळे पृथ्वीचा परीघ, तिचा व्यास, तिचे दोन्ही ध्रुवांदरम्यानचे अंतर इत्यादींचे मापन करून कागदावर तिच्या सारखीच आकृती काढताना काही प्रमाण घ्यावे लागते. म्हणजेच पृथ्वीवरील सुमारे १ किमी. अंतरासाठी नकाशावर १ सेमी इतके प्रमाण घेऊन काही वेळा नकाशे तयार केले जातात. याचा अर्थ असा लावला जातो की, नकाशा वरील दोन ठिकाणांमधील अंतर १०,०००० सेमी किंवा १ किमी इतके आहे.

या व्यतिरिक्त काही घटक असे आहेत की जे नकाशांचे अविभाज्य भाग आहेत. ते एका आकृतीवरून समजावून घेता येतील.

 


आकृती वरून लक्षात येते की नकाशामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या असतात. त्यामुळे नकाशाच्या साहाय्याने एखाद्या ठिकाणाचा किंवा प्रदेशाची माहिती करून घेता येते. यालाच नकाशाचे वाचन करणे असेही म्हणता येईल. नकाशा कोणत्या प्रदेशाचा, देशाचा आहे ते नकाशावर उजव्या बाजूला दिलेल्या प्रदेशाच्या नावावरून माहीत होते, यालाच नकाशाचे शीर्षक असे म्हणतात. त्याचबरोबर या प्रदेशाच्या किंवा देशाच्या नावाखाली म्हणजेच शीर्षकाखाली तो नकाशा कोणत्या प्रकारचा आहे, ते समजते. उदा., भारत या शीर्षकाखाली राजकीय असे लिहिलेले असल्यास तो भारताचा राजकीय नकाशा आहे असे समजावे. या नकाशाचा उददेश या उपशीर्षकावरून लक्षात येतो. म्हणजे भारताच्या राजकीय नकाशामध्ये प्रामुख्याने भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमांबरोबर राज्यांच्या सीमा, त्यांच्या राजधान्य, मुख्य शहरे या गोष्टी दाखविलेल्या असतात. तर भारताचा स्वाभाविक नकाशा शीर्षक व उपशीर्षकवरून हा नकाशा भारताची प्राकृतिक वैशिष्ट्ये उदा. पर्वत, पठारे, मैदाने, सरोवर, नद्या, उपनद्या यांची माहिती देणारा आहे. म्हणजेच नकाशाचा प्रकार कोणता आहे, हे लक्षात घ्यावे. याशिवाय काही नकाशांमध्ये विशिष्ट पिकांचे, खनिजांचे वितरण दाखविलेले असते. यावरून हा नकाशा वितरण दाखवणारे नकाशा आहे हे समजावे.

या व्यतिरिक्त नकाशामध्ये दिशा फार महत्त्वाच्या आहे. मुख्य दिशा व उपदिशा लक्षात घेतल्यास कोणत्या दिशेला काय आहे हे सांगता येणे सहज शक्य होते. यासाठी नकाशामध्ये या बाणाने उत्तर दिशा दाखवलेली असते, ती लक्षात घेऊन इतर दिशा माहीत करून घेता येतात. दिशांशिवाय पुढे जाणे शक्य नाही.

याशिवाय नकाशामध्ये आडव्या व उभ्या काही रेषा आखलेल्या असतात. त्यांच्या दोन्ही टोकांना काही अंक व अंशाचे चिन्ह दिलेले असतात. पृथ्वीचा आकार लक्षात घेता, पृथ्वीवरील ठिकाणांचे निश्चित स्थान लक्षात येण्यासाठी ज्या उभ्या अर्धवर्तुळाकार व आडव्या वर्तुळाकार काल्पनिक रेषा नकाशावर काढलेल्या असतात, त्यांचे वाचन करण्यासाठी हे अंक निश्चित केलेले आहेत. उभ्या अर्धवर्तुळाकार रेषांना रेखावृत्ते तर आडव्या वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. अशी ३६० रेखावृत्ते ते १८१ अक्षवृत्ते कल्पिलेली आहेत. या अंकावरून नकाशातील तो प्रदेश किंवा देश पृथ्वीवर नेमका कुठे आहे याची माहिती मिळते. उदा., भारताचे स्थान ८४ उत्तर अक्षवृत्ते ते ३७६’ उत्तर अक्षवृत्तांदरम्यान आणि ६८७’ पूर्व ते ९७२५’ पूर्व रेखावृत्तां दरम्यान आहे. म्हणजे भारत हा उत्तर गोलार्धातील देश आहे हे लक्षात येते.

याप्रमाणे नकाशातील सूचीमध्ये काही सांकेतिक चिन्हे दिलेली असतात, तर काही वेळा उंचीनुसार रंगाच्या छटा असतात. यावरून नकाशामध्ये कशाची माहिती दिलेली आहे ते विस्तृतपणे स्पष्ट होते. उदा., नकाशामध्ये पिकांची उत्पादने दाखवायची असल्यास प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी चिन्हे दिलेली असतात. ता रंगावरूनही निळा रंग पाण्याकरिता, पिवळा रंग पठाराचा भाग दाखवण्यासाठी, हिरवा रंग मैदानी भाग दाखवण्यासाठी वापरला जातो. आणि त्यांच्या उंची नुसार व पाण्याबाबत खोलीनुसार गडद छटा दिली जाते.

अशा रीतीने नकाशा घटकांनाच नकाशाची अंगे असे म्हणतात. हे नकाशाचे जणू अवयवच आहेत. एखाद्या प्रदेशाची माहिती अभ्यासण्यासाठी या प्रत्येक अंगाची माहिती समजावून घेणे गरजेचे आहे. तर चला मग नकाशातून भूगोल अभ्यासू या!