लेण्याच्या देशा 
तुम्हाला माहीत आहेच, आपल्या महाराष्ट्राला किती समृद्ध इतिहास लाभला आहे. गड-किल्ल्यांबरोबरच कालातीत कलेचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. यातील एक म्हणजे ऐतिहासिक लेणी. ही लेणी म्हणजे स्थापत्य कलेचा एक उत्तम आविष्कारच. देशातील एकूण लेण्यांपैकी जवळजवळ ऐंशी टक्के लेणी महाराष्ट्रात आहेत. त्यातील काही लेण्यांना तुम्ही भेट दिली असेल. पण, या लेण्यांकडे आपण एक प्राचीन वास्तू म्हणूनच पाहतो. महाराष्ट्रातील या लेण्यांचे प्रत्येकाचे असे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. लेण्यांची अशी अनेक वैशिष्ट्ये सांगितली आहेत, रवींद्र गोळे यांनी, ‘लेण्यांच्या देशा’ या आपल्या पुस्तकातून.
‘लेणी’ म्हणजे केवळ स्थापत्य कलेचा नमुना नाही; तर साकारलेल्या प्रत्येक लेण्यातून त्या-त्या काळातील राजवटी, तत्कालीन राज्यसत्ता, समाजव्यवस्था, कलाविष्कार, तसेच व्यापार या सार्‍यांचे दर्शन घडते. महाराष्ट्रात आगाशिव, अजिंठा, अंकाई-टंकाई, आंबिवले, टेंभरे, आंबेजोगाई, औरंगाबाद, कर्‍हाड, कान्हेरी, कार्ले, कुडा-मांदारड, कोंढाणे, खरोसा, खेड, गारोडी, गोमाशी, घटोत्कच, घारापुरी, चांदवड, चांभारलोणी, चौल, रेवंदडा, जीवदानी, जोगेश्वरी, टाकळी-टोकेश्वर, टाणाळे, नाडसूर, त्रिंगलवाडी, धाराशिव, पन्हाळे, काझी, पाटण-तामकणे, पाटणावादी, पाताळेश्वर, भांबुर्डे, पोटेश्वर, पांडवलेणी, पातूर, पुसुसोनाळे, पाले, पितळखोर, महाड, महाकाली, पोहाळे, बेडसे, भाजे, भामेर, मंडपेश्वर, मांगी-तुंगी, मोहिडा, तर्फ हवेली, येरफळ, वेरुळ, लेणवली, खडकवासला, लोनाड, शिऊर, शिरवळ, हरिश्चंद्रगड अशा विविध ठिकाणी लेणी आहेत. ही सर्व लेणी एकसारखी नसून; ती बौद्ध, जैन आणि हिंदू (ब्राह्मणी) लेणी अशा तीन वेगवेगळ्या प्रकारांत आहेत. त्यामध्येही बौद्ध लेण्यांचे विहार आणि चैत्य असे दोन प्रकार आहेत. या चैत्यगृहाचेही हीनयान आणि महानयान या दोन पद्धती आहेत. महाराष्ट्रातील सर्व लेण्यांची अशी विस्तृत माहिती ‘लेण्यांच्या देशा’ या पुस्तकाद्वारे दिली आहे.
‘लेण्यांच्या देशा’तून महाराष्ट्राला लेण्यांचा किती समृद्ध वारसा लाभला आहे हे कळतेच; पण त्यातील प्रत्येक लेण्यातील बारकावेही सांगितले आहेत. लेण्यांच्या  वैशिष्ट्यांबरोबरच लेणी कशा प्रकारे खोदली गेली आहेत, प्रत्येक लेणे कोणत्या प्रकारच्या पाषणात कोरलेली आहेत, कळसापासून पायापर्यंत ती कशी साकारलेली आहेत; याचे वर्णन वाचत असताना लेणी साकारणार्‍या कारागीरांच्या अपरिमित कष्टांची जाणीव होते. समाजव्यवस्थेतील प्रत्येक घटकाने लेणी साकारण्यासाठी आपापल्या परीने योगदान दिल्याचे दिसून येते. जेव्हा एखादा समाज एकत्र येऊन एखादी कृती साकारतो, तेव्हा ती अप्रतिमच होते. पाथरवट, कुंभार, लोहार, सुतार, चित्रकार, शिल्पकारांपासून ते राजांपर्यंत; सर्व वर्गांनी हे शिल्पवैभव उभारण्यास कसा हातभार लावला, हे लेखकाने बालमित्रांना समजावून सांगितले आहे.
महाराष्ट्रातील लेणी ज्या काळात साकारली गेली, त्या वेळची  एकंदर समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था कशी होती? याविषयही लेखक सांगतात. लेण्यातील शिल्पकला व भित्तिचित्र यांतील बारकावे सांगत कौटुंबिक वातावरणात, हळूवार संवादातून ‘लेण्यांच्या देशा’मधून लेण्यांचा इतिहास उलगडला आहे. यातून लेण्यांकडे बघण्याची दृष्टी विकसित होते.
मित्रांनो, महाराष्ट्रातील एखाद्या ठिकाणच्या लेण्याला तुम्ही जरूर भेट द्या, पण अशा ठिकाणी जाण्याआधी ‘लेण्यांच्या देशा’ हे पुस्तक जरूर वाचा, तरच तुम्हाला लेण्यांतील बारकावेही पाहता येतील आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला वारसा किती समृद्ध आहे, हे कळेेल.
- रेश्मा बाठे