वाचन एक संस्कार

दिंनाक: 19 Jul 2017 13:40:08

 

‘वाचन’ हे एक महत्त्वाचे भाषिक कौशल्य आहे. मुलांना सर्वसाधारणपणे अवतीभवतीचे आवाज सतत ऐकून; अनुकरणातून नैसर्गिकरीत्याच ‘श्रवण’ व ‘भाषण’ ही भाषिक कौशल्य सहज आत्मसात करता येतात. उदा., मराठी भाषक समाजात वावरणारे मूल सतत कानावर पडणाऱ्या मराठी भाषेचे व्याकरणिक नियमांसह नकळत आत्मसातीकरण करत असते. इतरांच्या बोलण्याचे अनुकरण करत मूल ऐकत असलेली भाषा हळूहळू बोलायलाही शिकते. ‘वाचन’ व ‘लेखन’ ही कौशल्य मात्र विशेष प्रयत्न करून सरावाने आत्मसात करावी लागतात.

आजचा लेख लहान मुलांमध्ये वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी काय करता येईल यावर आधारित आहे.

लहान मुलाला त्याच्या सभोवती असणारी माणसं - आई-बाबा, आजी-आजोबा, दादा-ताई, शेजारी इ. वर्तमानपत्र, पुस्तक, मासिकं वाचताना सतत दिसत असतील तर बालसुलभ कुतूहलातून अशा वातावरणातील मूल वाचन संस्कार अंगीकारण्याची शक्यता अनेकपटीने वाढते.

ग्लेन डोमेन या मेंदू विकास क्षेत्रातील संशोधकाचे - अभ्यासकाचे ‘हाऊ टू मल्टीप्लाय इंटलिजन्स ऑफ युवर बेबी’ या नावाचे पुस्तक जिज्ञासूनी जरूर मिळवावे. वय वर्ष सहा महिन्यापासून आपण मुलांमध्ये ‘समग्राकडून घटकांकडे’ (Whole to Unit) या तत्त्वानुसार वाचनाचे संस्कार कसे करू शकतो याचे प्रयोग या पुस्तकात सविस्तर वर्णन करून दिले आहेत.

फ्लॅशकार्डच्या आकाराच्या शब्दपट्ट्या आपण काही सेकंद मुलासमोर धरून त्या शब्दपट्टीवरील शब्द मोठ्याने उच्चारायचा, एका वेळी पाच शब्दपट्ट्यांचे एक सेशन अशा प्रकारे दोन- दोन मिनिटांची दिवसभरात तीन चार आवर्तने बस्स! ठराविक दिवसानंतर जुना एक शब्द काढून त्याऐवजी एक नवा शब्द या पाच शब्दपट्ट्यांच्या संचात नव्याने मिसळायचा अक्षरशः जादुई परिणाम या प्रयोगाचे दिसू लागतात. 

आमच्या महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक ठिगळे सरांनी एकदा सहज हा प्रयोग सांगितला व अगदी एका दिवसापुरते डोमेनचे पुस्तक उपलब्ध करून दिले. तेव्हा सिद्धार्थ चार वर्षाचा होता. म्हटलं अजून जवळपास अकरा महिने आपल्या हातात आहेत. चला, प्रयोग तर करून बघू. वय वर्ष पाचपर्यंतच हा प्रयोग करू शकतो व अपेक्षित परिणाम मिळू शकतो. पुढे नोकरी - घर सांभाळून जेमतेम नऊ महिने जमेल तसे हे शब्दपट्ट्यांचे आवर्तन सातत्याने त्याला दाखवत व उच्चारत राहिले. त्या काळात शेकडो शब्दपट्ट्यांचा पाऊस झोपताना आमच्या अंथरुणावर पडत असे! सिद्धार्थ आम्ही उच्चारलेला शब्द या शब्दथेंबरूपी शब्दपट्टीला वाचून अचूक हुडकून काढत असे! हाच प्रयोग इंग्रजीसोबत मराठी शब्दपट्ट्यांच्या साहाय्याने काही प्रमाणात केला. यशस्वीही झाला!

वाचन संस्कार जाणीवपूर्वक करण्यासाठी ‘ज्योत्सना प्रकाशनाची तक्त्याच्या आकारातील माधुरी पुरंदरे यांची चित्रमालिकाही खूप उपयुक्त आहे. अडीच- तीन वर्षांच्या मुलांशी या चित्रांबद्दल गप्पा मारत आपण चित्रवाचनाचे संस्कार सहज करू शकतो.

उदा., बागेत कोण आहे? तुला या चित्रातील काय आवडले? का? फुलपाखरू कुठे आहे इ.प्रश्नोत्तरात मुलं छान रंगून जातात.

जगातील उर्दू, अरेबिक अशा काही भाषा सोडल्यास इतर बऱ्याच भाषांच्या लिपी या डावीकडून उजवीकडे या दिशेने वाचायच्या आहेत. अगदी सुरुवातीला मोठ्या ठशांची पुस्तक वाचताना आपण जाणीवपूर्वक त्या त्या शब्दाखालून बोट डावीकडून उजवीकडे सरकवत जाणे या साध्या गोष्टीतूनही वाचन संस्काराची पूर्वतयारी साधता येईल.

रात्री झोपताना व सकाळी उठतानाही शक्य असल्यास मुलांना ज्यात रस वाटेल अशा आकर्षक, छोट्या छोट्या गोष्टींच्या पुस्तक वाचनानेच दिवसाची सुरुवात व शेवट झाल्यास वाचनवेड रुजवण्यास पोषक वातावरण तयार होईल.

पुस्तक प्रदर्शनास भेट देणे, पुस्तकांच्या दुकानात मुलांना सोडणे, तेथे विविध विषयांवरची पुस्तकं त्यांना हाताळायला मिळणे ग्रंथालयाचे सभासत्व मुलांच्या नावाने घेणे, स्वतःची पुस्तकं शाळेत व ग्रंथालयात दान करणे मुलांच्या नावाने मासिक- वर्तमानपत्र घरी पोस्टाने येणे, ट्टिंकल, चांदोबा, अमरचित्रकथा इ. आधी पुस्तक वाचून मग त्यावर आधारित सिनेमा पाहणे. उदा., ‘ब्युटी अॅण्ड बिस्ट’ भारतीय वा पाश्चात्त्य वाचन - पुराणकथांवर आधारित सिनेमे पाहणे पुस्तक किंवा मिल्खा सिंगवरील सिनेमा पाहिल्यानंतर त्यांच्यावर आधारित चरित्रात्मक पुस्तक वाचणे असं प्रवासही करता येईल.

वाचनाचा व तंत्रज्ञानप्रेमी पिढीचा सांधाही जुळवता येईल. इयत्ता आठवीत सिद्धार्थने ‘सायट्रीगाय’ या नावाने बनवलेला पानिपतच्या लढाईवरील व्हिडीओ उदय कुलकर्णी यांच्या ‘सॅालेस्टाईस अॅट पानिपत’ या पुस्तकावर आधारित आहे. इयत्ता पाचवी पुढील मुलं याप्रकारे स्वतः वाचलेल्या पुस्तकावर माहितीपूर्ण व्हिडीओ युटूबवर अपलोड करू शकतात. व्यक्तिमत्व विकासपर पुस्तकांचे प्रसिद्ध कथनात्मक संहिता असणाऱ्या पुस्तकांचे परीक्षण देणारे अमृत देशमुख यांचे ‘बुकलेट’ अॅप मुलं वाचू किंवा लिहू शकतात- अमेझॉनच्या माध्यमातून अगदी वाजवी दरात बालकांसाठी तयार केलेले वैश्विक बालवाङ्मय आज सहज उपलब्ध आहे. ‘स्टोरी जंपर’सारखी ऑनलाईन पुस्तकं मोफत उपलब्ध आहेत! ‘लेडीबर्ड’ प्रकाशनाच्या वाचनपूर्व ते चढत्या श्रेणीने मुलांच्या अनुभवविश्वाशी- भावविश्वाशी मिळत्या जुळत्या आशयाची सुबक मांडणी असणारी पुस्तक उपलब्ध करून दिल्यास त्यातील ‘पीटर’सारखं पात्र मुलांचा खास दोस्तच बनून जातं! सत्यजीत रे यांची ‘फेलूदा’ मालिकेतील गुप्तहेर कथांची पुस्तकं इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांत उपलब्ध आहेत. थोर व्यक्तींच्या वैज्ञानिकांच्या चरित्रापासून ते पौराणिक- ऐतिहासिक प्राक्कथांपर्यंत इसापनिती ते तेनालीरामन, बिरबलाच्या चातुर्यकथांपर्यंत जे जे मुलांच्या कल्पना शक्तीला अनुभव विश्वाला समृद्ध करू शकेल ते ते वाचायला उपलब्ध करून देणे व वाचनासाठी पोषक वातावरणनिर्मिती करणे हे सुसंस्कृत, सुशिक्षित पालकत्वातील एक महत्त्वाचे कर्तव्य आहे. किंडलवरील पुस्तकं स्क्रीनवर वाचण्याबरोबरच पुस्तकाची पानं पालटत वाचनाची मजाही मुलांना अनुभवू दिली पाहिजे. अन्यथा डोरेमॅान, पोकेमॅानसारख्या कार्टून तयार पात्र प्रतिमांमध्ये गुंतलेली, ‘टॅाम अॅण्ड जेरी’मधील गंमतीपलीकडे हिंसक, कळकुन्द्री झालेली आपली मुलं निसर्गाने मानवी मेंदूस दिलेल्या कल्पनाशक्ती नामक एका अफाट देणगीला मुकून साचेबंद्ध मनोरंजनात गुरफटण्याचा धोका संभवतो. वेळीच सावध व्हायला हवे. चला तर मग आजच्या धावपळीच्या जगण्यातही ‘भिलार’सारख्या गावाप्रमाणेच आपल्या नातेवाईक – स्नेहामंडळीमध्ये ही महिन्या दोन महिन्यात का होईना एखादी ‘पुस्तक-भेट’ एकमेकांकडे आयोजित करू या! वाचन संस्कारच मोल जाणून घेऊ या!

पालकांच्या घडणीत समाजाचाही तितकाच वाटा असतो, कसा ते वाचा खालील लिंकवर 

पालकत्व आणि समाज

- सुजाता राणे 

[email protected]