नवनिर्मिती 

सध्या आपण जे म्हणू ते आपल्याला मिळतंय. नवीन वही, नवं पुस्तक, नवी सायकल, नवा खेळ, नवा टिव्ही, नवं घड्याळ, नवे कपडे; अगदी काय वाट्टेल ते आपल्याला मिळू शकतं. जर सगळंच उपलब्ध असेल, तर काय नि कशाचा शोध लावणार आणि कुठलं इनोव्हेशन करणार? आपल्याकडे अशी कुठली गरजच उरत नाही. मग अशा वेळी आपली कल्पनाशक्ती काम न करेल तर काय विशेष. पण, आपल्याला अगदी बालवाडीपासून ते उच्चशिक्षण घेत असताना आजूबाजूचे सगळे जण सांगत राहणार ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करा, चाकोरीपलीकडचा वेगळा विचार करा आणि आपण मात्र या गोंधळात ठरलेला अभ्यास आणि मिळालेले मार्क्स पदरात पाडून मोठे होत राहणार. पण एखाद्या दिवशी खरंच असं वेगळं काही करायचं ठरवलं, थोडं हटके जगायचं ठरवलं, तर कुठून सुरुवात करायची? अर्थात आपल्या घरापासून...

आपलं घरच असू शकते आपल्या कल्पनाशक्तीला चालना देणारी कार्यशाळा. आपण जरा डोळे उघडे ठेवून बघितलं, तर जाणवेल की कित्येक गोष्टी आपण अनवधानाने इनोव्हेट करून टाकल्यासुद्धा आहेत. अगदी रोजचा दात घासायचा ब्रश जुना झाला की, आपण त्याचा वापर स्पेे्र पेंट करायला करतोय. एखाद्या ग्लासमधून पेन, पेन्सिल, पट्टी डोकावतेय, तर कपाटाच्या दारावर आपलं शाळेचं वेळापत्रक चिकटलेलं आहे. जरा स्वयंपाक घरात गेलो, तर कुठल्याशा जुन्या डब्या, बाटल्या, बरण्या वेगळ्याच पदार्थांनी भरलेल्या असतात. कुठल्याशा कोपर्‍यात ठेवलेल्या तांदळाच्या पिंपावर मखमली कापड पसरून ही जागा मिक्सरने घेतलेली असते. जुन्या कापडाच्या तुकड्यांचंच पायपुसणं बनून गेलेलं असतं. घरभरातला इंच न इंच वापरत आपण ते जगण्यासाठी सोईस्कर करत असतो.
केवळ माणूसच नाही; तर कित्येक मोठमोठाल्या कंपन्या त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य घटक म्हणून इनोव्हेशन या मुद्याला महत्त्व देतात. 3 एम सारखी कंपनी गेली जवळपास ११४ वर्षं याच इनोव्हेशनच्या बळावर जगात अधिराज्य गाजवत आहे. post it notes हे या कंपनीचं खूप प्रसिद्ध असं उत्पादन. सर्वप्रथम या कंपनीतील स्पेन्सर सिल्व्हरने एक प्रकारच्या डिंकाचा शोध लावला, ज्यामुळे दोन गोष्टी एकमेकांना चिकटतील. परंतु, त्यातील एक वस्तू बाजूला केली, तर त्याचं निशाण दुसर्‍या वस्तूवर राहणार नाही. पुढे काही वर्षांनी आर्थर फ्रायने त्याच्या हातातील पुस्तक उघडताना त्यातील बुकमार्क गळून पडले, तेव्हा हा डिंक वापरून त्याने त्यावर कागद चिकटवून बघितला. त्या प्रकारच्या पद्धतीने पुढे post it notes अस्तित्वात आल्या आणि त्यांनी जगाच्या बाजारपेठेत इतिहास घडवला.
- नंदिता केळकर - गाडगीळ