मूल्य शिक्षण 
मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत. मुलांमध्ये चारित्र्य, शील यांची जाणीव निर्माण व्हावी. तसेच संस्कार त्यांच्या मनावर व्हावेत. त्यांना शिस्त लागावी अशी अपेक्षा शाळांकडून समाजाने केली, तर ती योग्यच आहे.
अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकांचे अध्यापन, परीक्षा निकालपत्रे इत्यादी चाकोरीच्या पलीकडेही शिक्षण आहे. विद्यार्थ्यांवर संस्कार करणे हेही महत्त्वाचे आहे. हे संस्कार शाळेकडून, शिक्षकांकडून, पालकांकडून, समाजाकडून व्हायला हवे आहेत. आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून बाहेर पडलेले विद्यार्थी नम्र, शीलसंपन्न, शिस्तगीर, सभ्य, सुसंस्कृत, हुशार, चौकस, स्वावलंबी, शोधबुद्धी विकसीत झालेले असायला हवे आहेत; अशी अपेक्षा समाजाने केली तर त्यात चूक नाही.
त्यासाठी ‘मूल्यशिक्षण’ अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘नैतीक शिक्षण’ असेही, त्याला म्हणता येईल. ‘मूल्यांचे शिक्षण’ या संदर्भात भरपूर विचार होऊनही त्याबद्दल प्रभावी, योजनाबद्ध आणि दीर्घकालीन अंमलबजावणी कमीच झालेली दिसते.
खरे तर, ‘मूल्यशिक्षण’ किंवा ‘नैतिक शिक्षण’ याला दिर्घ अशी परंपरा आहे. पूर्वीच्या काळी गुरूगृहातून शिक्षण घेऊन बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्याला श्री गुरू सांगत,‘सत्यं वद्। धर्मं चर। स्वाध्यायात् मा प्रमदितव्यम्। मातृदेवो भव। पितृ देवो भव। आचार्य देवो भव।...’
अशाच अनेक प्रार्थना आपल्या संस्कृतीचा भाग आहेत. ‘ॐ सहनाववतु सह नौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै। तेजस्विानाविधीतमस्तु। मा विद्विषावहै।ॐ शांति: शांति: शांति:।’ अशा प्रार्थना दैनंदिन जीवनाचा भाग होती. तिचा अर्थ ‘आम्ही सर्वांनी एकत्र राहावे, एकत्र सेवन करावे, एकत्र सामर्थ्य संपादन करावे, आमचे अध्ययन आम्हाला तेजस्वी करणारे असावे. आमच्याकडून एकमेकांचा द्वेष न घडो या प्रार्थनाप्रेरीत आचरणातून मुलांवर, समाजावर संस्कार होत आला आहे.
 आपल्या परंपरेत अकरा व्रते सांगितली आहेत. 
‘अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह।
शरीरश्रम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जन॥
सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी, स्पर्शभावना।
ही एकादश सेवावी नम्रत्वे, व्रतनिश्चये॥
 ही अकराव्रते निष्ठेने, सातत्याने व एखाद्या व्रताच्या निश्चयी जाणिवेने आचरणात आणावीत, असे मानले जाते. ही अकरा व्रते म्हणजे १) अहिंसा, २) सत्य, ३) चोरी न करणे, ४) बह्मचर्य, ५) (संपत्तीचा अकारण वाजवीपेक्षा अधिक) संग्रह न करणे, ६) शरीरश्रम करणे, ७) कार्याची गोडी, ८) निर्भय वृत्ती, ९) सर्व धर्म समान मानणे, १०) स्वदेशी, आणि ११) अस्पृश्यता नष्ट करणे.
संत ज्ञानेश्‍वरांचे ‘पसायदान’ संतश्रेष्ठ तुकारांमांचे विविध अभंग यातूनही विविध विचारांचे संस्कार आपल्यावर झालेले आढळतात. अशा अनेक विचारांतून, आचरणाच्या आग्रहातून मूल्यसंस्कार आपल्यावर होत आलेले आहेत.
विविध आयोगांनी शिक्षणातील ‘नैतिकतेचा’ आग्रह धरलेला दिसून येतो. श्री प्रकाश समितीने(१९५९) म्हटले आहे. ‘इतरांशी योग्य रीतीने वर्तन करण्यास जे मदत करते ते नैतिक मूल्य होय.’ आणि इतरांकरिता किंवा श्रेष्ठ उदात्त कारणांकरिता कल्याण बुद्धीने व स्वार्थरहित वृत्तीने जे त्यागाची प्रेरणा देते ते आध्यात्मिक मूल्य होय.
‘मूल्य’ या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘किंमत’ असा आहे. एखाद्या वस्तूचे मूल्य १० रु. आहे असे आपण वर्णन करतो. परंतु, ‘मूल्यशिक्षण’, ‘नैतिक मूल्य’, ‘जीवनमूल्य’ या शब्दामधील ‘मूल्य’ या शब्दांना विशेष अर्थ आहे. आपल्या जीवनाची अशी आधारभूत तत्त्वे किंवा विचार की ज्यांच्यासाठी आपण जगतो, प्रसंगी स्वत:ला पणाला लावतो, ज्यांचे सातत्याने, दीर्घकाल आचरण करतो.
आचरण हीच मूल्यविचारांची कसोटी आहे. ज्यांच्याकडून उच्च विचार किंवा मूल्ये शब्दांनी सांगितली जातात. पण त्यांच्या आचरणात मात्र ती नसतात, अशा व्यक्तींच्या ‘उपदेशाला’ अर्थ उरत नाही. म्हणून संस्कार करणार्‍या, मूल्य शिक्षण देणार्‍या व्यक्तीचे आचरण फारच महत्त्वाचे असते. आई, वडील, शिक्षक, मुख्याध्यापक हे मुलांवर विविध मूल्यांचे संस्कार करतात. त्यांचे आचरण जर त्या मूल्यांप्रमाणे असेल तो संस्कार मुलांच्या मनावर खोल उमटतो.
अनेकदा आपल्या सामाजिक परिस्थितीचा संदर्भ देऊन सांगितले जाते की, मूल्यशिक्षण फारच आवश्यक आहे. समाजातील भष्ट्राचार, ढोंगीपणा, अंधश्रद्धा, अनाचार, असभ्यता, राष्ट्रीय भावनेची उणीव, शिक्षणाबद्दल उदासिनता, वडीलधार्‍या माणसांबद्दल अनादर, ज्ञानसंपादन-यशोधनाबद्दल अनास्था इत्यादी अनेक उणिवांबद्दल बोलले जाते.
 आपला समाज उदासीन, अर्थासीन, सुखसीन आणि स्पर्धासीन होत चालला आहे. म्हणूनही ‘मूल्यशिक्षणा’ची गरज सांगितली जाते. हे सर्व खरेच आहे. पण सर्व काळात व सर्व समाजघटकांसाठी नैतिकतेची गरज असते; हेही आद्य लक्षात ठेवले पाहिजे.
 सर्वच शिक्षक शाळेच्या माध्यमातून ‘संस्कार’ करू शकतात. त्या संदर्भात आपण लक्षात घेऊ या की, सर्वच शिक्षक हे मूल्यशिक्षण  देणारे शिक्षक असावेत. पहिलीपासून महाविद्यालयांपर्यंत अध्यापन करणार्‍या अध्यापकांनी ‘नैतिक शिक्षण’ किंवा ‘मूल्यशिक्षण’ हा आपला विषय मानला पाहिजे. सर्व विषयांचे शिक्षक हे ‘मूल्यशिक्षण’ या विषयाचे शिक्षक असले पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार, विषयांनुसार स्वत: शिक्षकांच्या वयोगटांनुसार, विषयांनुसार स्वत: शिक्षकांच्या व्यक्तीतत्त्वानुसार मूल्यशिक्षणाचा आशय, शैली बदलेल. परंतू आपला विद्यार्थी ‘सुसंस्कृत नागरिक’ म्हणून घडला पाहिजे या तळमळीतून हे अध्यापन होईल.
मूल्यशिक्षणासाठी अध्यापकांना स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण केली पाहिजे. आणि ती एक साधना आहे, असे त्यांनी मानले पाहिजे. मूल्यशिक्षणासाठी स्वतंत्रपणे वाचन करणे, मूल्य, विवेक, न्यायबुद्धी अंगी बाणली पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधण्याची तळमळ व शैली त्यांनी विकसीत केली पाहिजे. मूल्यशिक्षण हे केवळ ‘असे वागा, तसे वागू नका’ अशा सूचनांवर आधारलेले नसावे. तर आपले शुद्ध आचरण, कर्तव्यबुद्धी, वक्तशीरपणा, व्यासंग, राष्ट्रनिष्ठा, विषयाचा व्यासंग, आपले संस्कृतिप्रेम, इतिहासप्रेम, थोर व्यक्तींच्या चरित्रांचा अभ्यास यांतून एक आदर्श विद्यार्थ्यांसमोर व समाजासमोर त्यांनी ठेवला पाहिजे. ‘शिक्षक हे एक व्रत आहे.’- ‘एक साधना’ म्हणूनच आपल्या जीवनाची जडणघडण त्यांनी केली पाहिजे. मुलांचे चारित्र्यसंवर्धन आणि माणूस घडवण्याचे कार्य हा अध्यापकांचा ध्यासच बनला पाहिजे. 
केवळ शाळा, महाविद्यालये आणि तेथील अध्यापकांवर मूल्यशिक्षणाची जबाबदारी टाकून मोकळे होऊन चालणार नाही, घर आणि घरातील आईवडील-पालक यांचही त्यासाठी साथ मिळणे आवश्यक आहेच. आईवडिलांनाही आपल्या आचरणातून मूल्यशिक्षणाचे धडे आपल्या मुलांना दिले पाहिजेत. ज्याप्रमाणे ‘बालकांच्या आरोग्यासाठी पालकांसाठी डॉक्टरांची व्याख्याने आयोजिली जातात. त्याचप्रमाणे ‘मुलांना वळण कसे लावावे.’ त्यांच्यावर संस्कार कसे करावेत, मूल कसे समजून घ्यावे. या विषयांवरही पालकांची शिबिरे आयोजिली पाहिजेत. शिक्षण व मूल्यशिक्षण याविषयी पालक व समाज सजग होईल तेव्हा शिक्षणाची गुणवत्ता, दर्जा सुधारलेच शिवाय सामाजिक जाणिवाही प्रगल्भ होतील. आपला समाज घडवायचा असेल तर, घर, शाळा पालक व अध्यापक यांच्यात सुसंवाद निर्माण झाला पाहिजे. त्यांनी बालकल्याणासाठी एकत्र आले पाहिजे.
आधुनिक समाज, आधुनिक राष्ट्र घडविण्याचे ध्येय हा शिक्षणाचा ध्यास असला पाहिजे. त्यासाठी ‘संस्कारंबद्दलचे’ गैरसमज दूर झाले पाहिजे. व्यक्तीने स्वत:च्या पलीकडे पाहण्याची वृत्ती सामुदायिक हिताकडे पहाण्याचा विचार, समुदायाने प्रत्येकाच्या कल्याणाचा विचार करण्याची मानसिकता विकसीत झाली पाहिजे. ‘ह्या विश्‍वाचे नियंत्रण करणर्‍या शक्तीबद्दल आदराची भावना बाळगून, स्वत:ची अस्मिता टिकवून पण नम्रता बाळगून केलेला आचारविचार म्हणजेच अध्यात्म नाही का? विज्ञानाशी त्याचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. एकाच सत्याकडे जाणारे ते दोन मार्ग आहेत. अध्यात्मावाचून विज्ञान आंधळे आहे आणि विज्ञानावाचून अध्यात्म पांगळे आहे.’ असे आदरणीय श्री. वि.वि. चिपळूणकर यांनी म्हटले आहे, त्याचे स्मरण करू या.
भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन पाच सप्टेंबर रोजी शिक्षकदिन म्हणून साजरा होतो. विश्‍वाच्या व्यासपिठावर हिंदू तत्त्वज्ञान मांडणार्‍या एका तत्त्ववेत्याचे स्मरण एक आदरणीय शिक्षक म्हणून आपण करतो. त्या निमित्ताने शिक्षणचिंतन व्हावे. शिक्षणाच्या परिघातील सर्वच घटकांनी एकत्र येऊन अध्यापकांचा गौरव करावा. शिक्षण प्रेम, शिक्षणनिष्ठा, ज्ञाननिष्ठा, समाजनिष्ठा आणि विद्यार्थीनिष्ठा समाजातील सर्वच घटकांनी अभ्यासाव्यात, अंगिकाराव्यात म्हणजे शिक्षकदिन हा ‘शिक्षणदिन’ होईल. 
- श्री.वा. कुलकर्णी