बाल गटाला शिकवण्यासाठी निवडावी त्यांच्या आवडत्या गोष्टींवरची गाणी

छोट्या दोस्तांनो, 

मला माहिती आहे, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आवडतात. कुणाला प्राणी-पक्षी तर,  कुणाला चंद्र-चांदण्या, कुणाला विमानं, तर कुणाला झुकझुक गाडी, कुणाला वेगात धावणाऱ्या कार तर, कुणाला मोटारसायकल. खेळण्यासाठी आपापल्या आवडीप्रमाणे तशी खेळणीही तुम्ही आणायला सांगता. कुणाला रामकृष्णांच्या गोष्टी ऐकायला आवडतात, तर कुणाला छोटा भीम आणि हॅरी पॉटरच्या. 
मग तुम्हाला गाणीसुद्धा अशाच प्रकारची ऐकायला आवडतील, नाही का? कशाला ती मोठ्या लोकांची सिनेमातली गाणी हवीत आपल्याला. छान छान आपल्या मराठीतली तुमच्यासाठी असलेली गाणी ऐकली आहेत का तुम्ही? चांदोबा चांदोबा भागलास का, झुकुझुकू अगीन गाडी, पाऊस आला वारा आला, एका माकडानं काढलं दुकान ... अशी गाणी ऐका तुम्ही. तुम्हाला नक्की आवडतील. मी जेव्हा तुमच्यासारख्या लहान मुलांना शास्त्रीय संगीत, त्यातले राग शिकवते ना, तेव्हा ती मोठ्या माणसांची हिंदी भाषेतली गाणी मुळीच शिकवत नाही. मी खूप छान छान नवीन गाणी तुमच्यासाठी तयार केली आहेत. राम-कृष्णाची, होळीचे रंग खेळण्याची, निसर्गातील रंगांची गंमत दाखवणारी, चंद्र-चांदण्यांची अशी अनेक मराठी गाणी मी तयार केली आहेत. ती जरी निरनिराळ्या रागात असली ना, तरी ती तुम्हाला नक्की आवडतील आणि तुम्ही कोणाला म्हणून दाखवली ना, तर त्यांनासुद्धा आवडतील. 
 
मग ऐकायचंय असं नवीन गाणं? 
 
ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार ...... तुम्हाला माहीत असेल ना? त्या चालीवर तुम्ही हे गाणं म्हणून पाहा. 
ताऱ्याच गाणं .... तुमच्या एका मैत्रिणीला वाटतंय, तिच्या बर्थ डे पार्टीला चांदोबानं यावं. त्यासाठी ती कोणाला फोन करणार आहे? ऐका तर मग हे गाणं.... खास तुमच्यासाठी मी हे मराठीत केलंय . 
चम चम करतो तारा एक, आभाळाच्या निळ्या घरांत ।
बघता वाटे मजला, तो दिवा लावला उंच घरात ।।
चम चम करती तारे दोन, मला करायचाय त्यांना फोन ।
चांदोबाला बोलवायला माझ्या बर्थ दे पार्टीला ।  माझ्या बर्थ दे पार्टीला ।।
 
--------------
कृष्ण कन्हैय्या आणि त्याच्या मित्र-मैत्रिणी, त्यांना गोप-गोपी म्हणतात बरं  का, तर त्यांनी कशी मस्त होळी खेळलीय  ते ऐका. 
आज होरी खेळुनिया रंगला श्याम हा । रंगल्या गोपिका, रंगली राधिका ।। 
धरुनी करी पिचकारी, रंग उडवी गिरिधारी । श्यामरंगी रंगुनिया नाचती गोपिका ।। 
 
अशी छोटी छोटी मराठी गाणी म्हटलीत ना की, निरनिराळे नवीन नवीन शब्दही तुम्हाला माहीत होतील. एखाद्या शब्दाचा अर्थ नाही कळला तर आई-बाबांना विचारा. 
----
 
आता थोडं .... मोठ्या मित्र-मैत्रिणींसाठी .. ( पालकांसाठी ) 
 
लहान मुलांनी त्यांच्या वयाला शोभतील अशीच गाणी म्हणावी, हा माझा आग्रह असतो. विषय त्यांना समजतील असे आणि आपल्या मातृभाषेत. लहान वयातच मराठीची गोडी लागली पाहिजे. कोणताही विषय मातृभाषेतून जितका चांगला समजेल, तितका पाया पक्का होतो. मग पुढे थोडे मोठे झाल्यावर कोणतीही भाषा सहज शिकता येते. गाण्यांचही तसंच आहे. मी लहान मुलांसाठी ही गाणी तयार केली, त्यांचे शब्द सोपे निवडले आणि चालीही सोप्या तयार केल्या. ती  सर्व रागांवर आधारित होती. त्यामुळे मला माझ्या नेहमीच्या पद्धतीने पहिल्या वर्षातले रागही त्यांना शिकवता आले. आणि त्यांना शोभतील अशा विषयाची गाणीही शिकवता आली. ही गाणी त्यांना तर आवडलीच पण पालकांनाही तितकीच आवडली. पाहा तुम्हालाही आवडतात का? 
मला सांगा बरं  का... म्हणजे पुढच्या वेळेस आणखी नवीन गाणी घेऊन येईन. 
संगीत शिकताना नेमकं काय केलं पाहिजे हे वाचा खालील लिंकवर.  

- मधुवंती पेठे

-[email protected]