मित्र-मैत्रिणींनो, आपल्या शब्दांच्या सहलीचा आनंद अनेक जणांनी घेतला आहे. तुम्ही सर्वांनी सुद्धा नक्कीच घेतला असेल, हो ना? आपल्या काही मित्र-मैत्रिणींनी तर या सहलीत सक्रीय सहभाग घेतला बरं का.  बदलापूरच्या विद्याताईने सांगितलं की 'सतराशेसाठ वेळा', हा अतिशयोक्तीचा शब्दप्रयोग तिच्या बोलण्यात बरेचदा येतो. ठाण्याच्या सुनीलदादाने सांगितलं की, वाचकांना आंजारतगोंजारत ही सहल सुरू झाली आहे. 'आंजारणेगोंजारणे ' या जोडशब्दाकडे त्याने लक्ष वेधलं.  पुण्याच्या पल्लवीताईने 'FC कॉलेज ' हा द्विरुक्त शब्द सांगितला. मात्र असे द्विरुक्त शब्द बोलण्यात, लेखनात येऊ नयेत, यासाठी काळजी घ्यायला हवी, अशी सूचना पुण्याच्याच राधिकाताईने केली.  मुंबईच्या प्रज्ञाताईने सांगितलं की, जीभ लडबडणारे शब्द असतात, ज्यांना इंग्रजीत आपण , 'toung twister' म्हणतो, ते शब्द पण या प्रवासात यायला हवेत. आठवत आहेत का असे जीभ लडबडणारे शब्द? विचार करा बरं. आकाशवाणीच्या आणि दूरदर्शनच्या  आवाजचाचणीत 'सांस्कृतिक कलासंचालनालय' हा शब्द बरेचदा म्हणायला सांगतात. तसंच, 'काळं रिळ निळं रिळ', 'कच्चा पापड पक्का पापड ' वगैरे शब्द तुम्हाला माहीत असतीलच. असे आणखीन काही शब्द असतील तर नक्की सांगा आणि मित्र-मैत्रिणींबरोबर  या शब्दांची गंमत सुद्धा अनुभवा.
             मित्रांनो, काळाच्या ओघात काही शब्द विस्मृतीत गेले आहेत. शिक्षणविवेक अंतर्गत, मृदुलाताई राजवाडे यांचा कोकणातील घरावरील लेख तुम्ही वाचला असेलच. त्या लेखात असे विस्मृतीत गेलेले शब्द आहेत. उदा., पुढचं अंगण, मागचं अंगण, माजघर, पडवी, ओटी, साठवणीचे पदार्थ, बाळंतिणीची खोली इत्यादी. तसेच गडू, उखळ, ताकाचा कावळा, बंब, असे अनेक शब्द आहेतच. आजी-आजोबा, आई-बाबा यांना विचारलंत ना, तर अशा विस्मृतीत गेलेल्या शब्दांची मोठी यादी तयार होईल. मग करणार ना या शब्दांची यादी?
          ज्याप्रमाणे काही शब्द विस्मृतीत जातात, त्याप्रमाणे काही नवीन शब्द आपल्या भाषेत तयारही होत असतात. उदा., कॉम्प्युटरसाठी संगणक हा शब्द, मोबाईलसाठी भ्रमणध्वनी हा शब्द. असे नव्याने निर्माण झालेले शब्द लक्षात आले तर नक्की सांगा बरं का! स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अनेक  नवीन शब्द आपल्या मराठी भाषेला दिले आहेत. उदा., दैनंदिनी, महापौर, दिग्दर्शक इत्यादी.
            शब्दांच्या सहलीच्या पहिल्या टप्प्यात, जोडशब्द, इतिहास घडवणारे शब्द, अतिशयोक्तीचे शब्द, राजकीय शब्द, द्विरुक्त शब्द, असभ्य शब्द, असे शब्दांचे विविध प्रकार आणि शब्दांच्या स्वभावाबद्दल आपण बोललो. तुम्ही विचार केलात का, शब्दांचे प्रकार आणि शब्दांचे स्वभाव याबद्दल? म्हणजे बघा हं, 'नक्की', 'हो', 'अवश्य ', ' जरूर', हे सकारात्मक शब्द, 'नाही', 'छे' , 'कंटाळा', हे नकारात्मक शब्द. 'अभिनंदन' , 'शुभेच्छा' , 'कौतुक', इत्यादी प्रेरणादायी शब्द तर 'पाणी', 'मन', 'जीव', 'श्वास', हे छोटे पण मोठ्या आशयाचे शब्द. असे शब्दांचे स्वभाव, प्रकार , तुम्हाला जाणवले तर, नक्की टिपून ठेवा, मलाही सांगा आणि या शब्दांच्या सहलीत प्रत्यक्ष सहभागी व्हा.
          या विविध प्रकारच्या, स्वभावाच्या शब्दांच्या जन्मकथा पण असतात बरं. कृ.पा. कुलकर्णी यांच्या व्युत्पत्तीकोशात शब्दांच्या जन्मकथा वाचायला मिळतील आणि एक आगळाच आनंद तुम्हाला मिळेल. फार्सी, अरबी, कानडी, संस्कृत, या भाषांतून अनेक शब्द आपल्या भाषेत आले आहेत. उदा. ' रुमाल ' हा शब्द फार्सी भाषेतून आला आहे. रु म्हणजे चेहरा आणि माल म्हणजे फडके, चेहरा पुसण्याचे फडके म्हणजे रुमाल.
         ' दहशत ' हा शब्द अरबी भाषेतून आला आहे. अरबी भाषेत या शब्दाचा अर्थ, 'धाक '. मराठीतही तो त्याच अर्थानं आला आहे.  'दहशत'पासून ' दहशतवाद ' हा शब्द निर्माण झाला. 'दहशतवाद ' या शब्दाचा अर्थ, धास्ती पेक्षा अधिक भयानक झाला आहे.
          'बोकणा' हा शब्द कानडी भाषेतून आला आहे. 'बोकणा' म्हणजे 'तोंडात न मावणारा घेतलेला घास.' आपल्याला सवय असते ना, खाऊचा बोकणा भरायची,  मग आईचा ओरडाही खावा लागतो. कानडीतील 'बॉक्कण' या शब्दापासून हा शब्द तयार झाला आहे.
             शब्दांची नवनिर्मिती आणि एका भाषेतून दुसऱ्या भाषेत, शब्दांची देवाणघेवाण सुरूच असते आणि त्यामुळेच आपली भाषा समृद्ध होत असते.
              शब्दांच्या सहलीतील, हा टप्पा कसा वाटला? नक्की कळवा. पुढच्या स्थानकावर भेटू पुढील लेखात.

-दीपाली केळकर