आकाशातले तारे तुम्ही, ( / तुम्ही )  बघा.... आणि शिका ...नमस्कार मित्रांनो, रात्रीच्या वेळी भटकंती करताना किंवा सहज रात्री आकाशात लक्ष गेल्यास आपल्या नजरेस पडते ते म्हणजे अथांग असे आकाश! या आकाशाचं कुतूहल जसं तुम्हाला आहे, तसंच ते आदिमानव काळापासून आहे. कदाचित विज्ञान शाखेतील सर्वात पुरातन असं हे शास्त्र असावं. मनुष्याने आजूबाजूच्या निसर्गाचा जेव्हापासून अभ्यास करायला सुरुवात केली, साधारण तेव्हापासूनच या आकाशाचा अभ्याससुद्धा केला असावा, त्यानंतर मग माणसाने या आकाशाचा आणि मानवी जीवनाचा रोजचा काय संबंध आहे तेसुद्धा शोधलं असावं. नंतर मात्र मनुष्याच्या असं लक्षात आलं की, दिसायला अथांग असणाऱ्या या आकाशाच्या पोकळीत नुसते तेजस्वी दिवेच नाहीयेत तर अशा वेगवेगळ्या अनंत वस्तूंनी हे आकाश भरलेलं आहे. या आकाशाविषयी आणि त्याच्या अभ्यासाविषयी तुम्हालासुद्धा नक्कीच उत्सुकता असेल ना? चला तर मग तयार व्हा,  आपापली याने घेऊन या अथांग आकाशाचा वेध घ्यायला!!
आकाशाच्या अभ्यासाची सुरुवात करायची म्हटलं तर ती अगदी सोप्प्या गोष्टीपासून होते आणि ते म्हणजे आकाशाचे निरीक्षण. आता आपणसुद्धा सकाळच्या वेळात आकाश पाहिलं तर आपल्याला सुद्धा दिसतं की, सकाळच्या वेळात कधीतरी पहाटे एक तेजस्वी गोळा कुठूनतरी वर येतो आणि काही वेळाने तो डोक्यावर येतो आणि नंतर उगवलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूला पुन्हा नाहीसा होतो, यालाच आपण “सूर्य” असं म्हणतो. सूर्यासारखाच अजून एक गोल आकाशात दिसतो, पण त्याचा प्रकाश शीतल असा असतो,  तो सुद्धा सूर्य ज्या बाजूने दिसायला लागतो त्याच बाजूने दिसतो आणि तसाच दिसेनासा होतो, पण या दुसऱ्या गोळ्याचा स्वभाव मात्र जरा विचित्र आहे.  तो कधी अर्धाच दिसतो तर कधी तो संपूर्ण दिसतो आणि कधी कधी तर चक्क दिसतच नाही. अशा या गोळ्याला आपण “चंद्र” असं नाव दिलं. 
मनुष्याच्या आकाश अभ्यासात जसजशी वाढ झाली तसतशी मनुष्याला या सूर्य आणि चंद्र यांच्या नात्याची माहिती व्हायला लागली आणि त्यांनी चक्क त्याची गणितंसुद्धा मांडली. नंतर मात्र मनुष्याच्या असं लक्षात आलं की, आकाशात फक्त नुसते सूर्य आणि चंद्रच नसून इतर अनेक वस्तू आहेत. मग आदिकाळापासून ते आजपर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यास करून आज मनुष्याने चंद्रावर पाऊल ठेवलंय तसच मंगळ ग्रहावर आज अनेक रोबोट्स फिरतायत.
       अशा या रंजक शास्त्राविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. या शास्त्राला “खगोलशास्त्र” असं म्हटलं जातं. आता या शब्दाची फोड केली तर लक्षात येतं की, – “ख” – म्हणजे आकाशाकडे पाहिल्यावर डोक्यावर दिसणारा बिंदू . “गोल” – म्हणजे आकाशात स्थित जे काही तेजोगोल दिसतात ते आणि “शास्त्र” म्हणजे अभ्यास. असा या आकाशात दिसणाऱ्या तेजोगोलांचा अभ्यास म्हणजेच खगोलशास्त्र! आता या व्याख्येवरूनच आपल्याला लक्षात येईल की आपल्या भारतीय संस्कृतीमधील अनेक पुरातन ग्रंथामधून या शास्त्राचा उल्लेख येतो. त्यामुळे आपल्या प्राचीन शास्त्रज्ञांना हे नक्की ठाऊक असलं पाहिजे की आकाशात दिसणारे हे सगळे ग्रह तारे हे नक्कीच “गोल” असले पाहिजेत. या खगोलशास्त्राच्या शाखेमध्ये आकाशीय वस्तूंचा अभ्यास केला जातो, त्यात नुसते ग्रह, तारे, आकाशगंगा, तारकागुच्छ, द्वैती तारे, इत्यादी नसून इतरही अनेक गोष्टींचा विचार केला जातो.
       आता आपण जसं जसं पुढं जाऊ तसं तसं आपल्याला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या भेटीपर्यंत जितकं वाचता येईल तितकं वाचा आणि प्रश्न तयार ठेवा !!!  

 
 - अक्षय भिडे