कार्बन डाय ऑक्साइड शोषण्याच्या़ साठवण्याच्या नवीन मार्गांचा सतत शोध 

उशीररात्री गगनचुंबी इमारतीच्या गच्चीतून पाहिली तर शहरं किती सुंदर दिसतात नाही? चांदण्यांसारखे लुकलुकणारे अगणित दिवे़ सतत धावणारे रूंद रस्ते़ त्यांच्यावर चालणारी खेळण्यांसारखी चिमुकली वाहनं आणि आकाशात झेपावणारी विमानं सगळं कसं चकचकीत, सुखासीन...

पण या चित्राची दुसरी बाजू अगदी कळकट आहे. कार्बनच्या पाऊलखुणांनी डागाळलेली. कार्बनच्या पाऊलखुणा म्हणजे कुठल्याही व्यक्ती़, संस्था किंवा प्रदेशाने वातावरणात सोडलेल्या कार्बन डाय ऑक्साइड वायूचं प्रमाण. माणसाच्या सुखसोयींच्या अतिरेकी हव्यासामुळे हे प्रमाण आणि परिणामतः पृथ्वीचं तापमानही भयावह गतीने वाढत आहे. या तापमान वाढीलाच हरितगृह परिणाम म्हणतात. कार्बन डाय ऑक्साइड आणि हरितगृह वायू सूर्यकिरणातली उष्णता शोषतात. त्यामुळे या वायूंचं प्रमाण वाढल्यावर ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळण्यापासून ओझोनच्या थराला भगदाड पडण्यापर्यंत अनेक गंभीर समस्या उदभवल्या आहेत.

तापमानवाढीचे बरेच दुष्परिणाम लहान असले तरी हे हिमनगाचं फक्त टोक आहे. त्याच्या आगेमागे अनेक दुष्परिणामांची साखळी प्रक्रिया असते. उदाहरणार्थ, शिक्षणविवेकच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेला लवकर फुललेल्या मे फ्लॉवरबद्दलचा लेख. असा बदल अनेक झाडांत दिसतो आहे, पण परागवाहक किडयांमधे नाही. त्यामुळे परागीभवन फळधारणा आणि बिया तयार होण्याच्या नैसर्गिक वेळापत्रकाचा बोजवारा उडाला आहे. याचा अंतिम परिणाम परागवाहक किडयांच्या़ झाडांच्या किंवा जीवसाखळीतल्या त्यांच्यावर अवलंबून असलेल्या इतर प्रजातींच्या अस्तित्वावर होऊ शकतो.

 

यामुळेच सन २०१६ च्या वसुंधरादिनी म्हणजे २२ एप्रिलला कार्बनच्या पाऊलखुणा कमी करण्यासाठीच्या पॅरिस करारावर १९६ देशांनी सह्या केल्या. दुर्दैवाने गेल्याच आठवडयात अमेरिकेने या करारातून अंग काढून घेतलं. आणि या समस्येबद्दल विचारमंथन सुरू झालं. हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणाचे मुख्य कारण पेट्रोलियमसदृश इंधनांचा वापर आहे. त्यात भर पडली आहे, बेसुमार जंगलतोड आणि महासागरांच्या प्रदूषणाची. कारण झाडे आणि समुद्रतळातील जीवसृष्टी हे वातावरणात कार्बन डाय ऑक्साइडचा समतोल राखणारे बिनीचे शिलेदार आहेत. यामुळेच भारतासह अनेक देशांनी वनीकरण़, कडक प्रदूषण कायद़े़, पर्यायी ऊर्जास्त्रोतांच्या वापराला प्राधान्य; तसेच औष्णिक विजेच्या आणि पेट्रोलच्या वापरावर नियंत्रण अशा अनेक उपायांनी कार्बनच्या पाऊलखुणा कमी करण्याचा चंग बांधला आहे.

या तावून-सुलाखून सिद्ध झालेल्या उपायांखेरीजही कार्बन डाय ऑक्साइड शोषण्याच्या़ साठवण्याच्या नवीन मार्गांचा सतत शोध घेतला जात आहे. कारण ही समस्या जगड्व्याळ आहे. तिच्यावर एकचएक रामबाण उपाय मिळणं अशक्य आहे. यापैकी काही वेधक उपाय पुढे दिले आहेत.

 

नैसर्गिकरीत्या उघडं पडलेलं पृथ्वीचं मध्यावरण ही ओमानमधल्या  अल हजार पर्वताची खासियत. इथल्या गुहांमध्ये फिरतााना आपण  पृथ्वीच्या गाभ्याच्या सर्वांत जवळ जातो. मध्यावरणात असणारा ’पिरिडोडाइट’ दगड़ हवेतला कार्बन आणि पाणी यांच्या रासायनिक प्रक्रियेतून चुनखडी आणि संगमरवराची निर्मिती होते. लाखो वर्षं अव्याहत चाललेल्या या प्रक्रियेतून अल हजारमध्ये लाखो टन कार्बन साठवला गेला आहे. सध्या या प्रक्रियेचा अभ्यास ४० शास्त्रज्ञांचा चमू करत आहे. यातून कार्बन शोषण्याचा स्वस्त आणि परिणामकारक मार्ग सापडेल, अशी त्यांना खात्री वाटते.

कार्बन शोषण्याचा आणखी एक प्रयास म्हणजे कृत्रिम प्रकाश संश्‍लेषण. अनेक संस्था यावर संशोधन करत आहेत. अमेरिका आणि सिंगापूरच्या संयुक्त प्रयत्नांनी कृत्रिम पान बनवलं आहे. प्रकाश शोषर्णाऱ्या सेमीकंडक्टर नॅनो मटेरिअलच्या जाळ्यापासून हे पान पाण्यात बुडवून सूर्यप्रकाशात ठेवलं की, ते खऱ्या पानाच्या धर्तीवर पाण्याचं विघटन करून हायड्रोजन तयार करतं. हा वायू प्रदूषणमुक्त इंधन म्हणून वापरता येतो. याचप्रमाणे शिकागोच्या शास्त्रज्ञांनी सूर्यप्रकाशात कार्बन डाय ऑक्साइडच्या पुनर्वापरातून हायड्रोकार्बनसारखं इंधन तयार करण्याची पद्धत शोधली आहे. तर एका ब्रिटिश अभियंत्याने ऑक्सिजन तयार करणारे कृत्रिम पान रेशमापासून बनवले आहे. 

याशिवाय जैविक कोळसा (बायो-चारा), हवेतल्या कार्बनची जमिनीखाली साठवण़ कार्बन शोषण्याची अधिक क्षमता असणारी अंबाडीसारखी पिके घेणे, असे अनेक उपाय आहेत.

अर्थात हे सर्व संशोधन बाल्यावस्थेत आहे. ते प्रत्यक्षात उतरेपर्यंत माणसालाच आपल्या हावरटपणावर आणि बेपर्वाईवर नियंत्रण ठेवायला हवं. कोणी सांगावं ते जमलं तर या संशोधनाची गरजच पडणार नाही. 

 - स्वाती केळकर 

-[email protected]