वृक्षसंवर्धन महत्त्वाचे हे लक्षात ठेवा वटपौर्णिमेलाही

 अंजूची आई अंजूला म्हणाली, ‘अंजूबाळा, वटपौर्णिमा कधी आहे? ते सांग जरा.’ कॅलेंडरमध्ये बघून अंजू म्हणाली, '८ जूनला आहे गं, आई.' 'बरं बरं, ठीक आहे.' आज आहे चार तारीख, म्हणजे ७ तारखेला वडाची फांदी विकत आणून ठेवली पाहिजे. असे आईने म्हटल्यावर मंजू म्हणाली, ‘कशाला हवी गं, वडाची फांदी?’ मग आईने वटपौर्णिमेचे व्रत सांगितले आणि म्हणाली, ‘प्रत्येक स्त्रीने केलेच पाहिजे, नाहीतर देवाचा कोप होतो’. हे ऐकल्यावर, दिवसभर अंजूच्या डोक्यात कोप होतो? म्हणजे नक्की काय होते? हाच विचार घोळत होता. अगदी रात्री झोपताना पण! ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ असेच झाले. झोपेत असताना अंजूला रडण्याचा आवाज ऐकू आला, बघते तर वडाची फांदी रडताना दिसली आणि रडता-रडता म्हणाली, ‘पैसे मिळावेत म्हणून मला तोडले आणि ते विकत घेऊन कोप होऊ नये म्हणून माझी ‘पूजा’ करणार. ‘गरज सरो वैद्य मरो’ याप्रमाणे पूजा झाल्यानंतर कोणी लक्ष पण देत नाही. आमच्या  झाडांपासून तुम्हाला सावली मिळते, प्राणवायू मिळतो, पर्यावरण राखले जाते. काही वृक्ष वल्लींची फांद्या, पाने, फुले, फळे, खोड व मुळे औषधी आहेत. अगं अंजू, माझ्या एवढ्याशा फांदीमधे पण उपयोगी गुणधर्म आहेत. म्हणजे मी सुद्धा खारीचा वाटा उचलते आहे. पण तुम्ही मात्र इडा-पिडा टळो, कोप नको व्हायला म्हणून तोडलेल्या फांद्या विकत घेता. असे इतकी वर्षे करत आहात. अशा रीतीने एकेक फांदी तोडत सारी सृष्टी उजाड केलीत. अशामुळे अंधश्रद्धांना खत-पाणी घातले जाते. त्यामुळे काहीजण या गोष्टीचा फायदा उठवितात. म्हणूनच निसर्गाचे पर्यावरण बिघडले आहे. आमच्यासारख्या वृक्षांना काहीजण व्यवसायासाठी मुळापासून उखडतात, शिवाय रासायनिक खतांच्या वापरामुळे मातीचा धस व दर्जा खालवला आहे. माती म्हणजे धरती तिलाच असा त्रास दिलात तर तुम्ही करत असलेल्या पूजांचा काहीही उपयोग होणार नाही. अशा फांद्या, मुक्या कळ्या तोडल्या तर निसर्ग देवतेचा कोप होईल. हे नक्की! असे जर व्हायला नको असेल तर आता तुम्ही मुला- मुलींनीच रोप लाव अन् विद्या रुजवा. अर्थात उपयुक्तच होईल. प्राणवायूचे प्रमाण वाढेल, प्रदूषण कमी होईल. वडाच्या झाडाखाली बसून सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले अशी कथा आहे. याचा अर्थ फांद्या तोडू नका, तर वडासारखे प्राणवायू देणारे झाडे लावा. फांद्या तोडून अंधश्रद्धेला थारा द्यायचा नाही. कारण अशामुळे झाडे कमी होत गेली त्यामुळे पावसाचे प्रमाण बिघडले. म्हणजे बघ अंजू... निसर्गाचे चक्र सुरळीत न राहता ते अशाप्रकारे बिघडले. म्हणूनच तर पाणी वाया घालवू नका, सर्वांनी मिळून पाण्याची बचत केली तर ‘थेंबे थेबे तळे साचे’ हे खरे होऊन हेच ते उन्हाळयामध्ये उपयोगी पडेल. आपल्याबरोबर पशु-पक्षी वृक्षांना पण या पाण्याचा उपयोग होईल. अगं पृथ्वी – अग्नि – तेज- वायू व आकाश या पंचभूतांनी मिळून ही सृष्टी बनली आहे. यातल्या एकाजरी तत्त्वाला धक्का लागला तरी सारे बिघडते. कारण ही तत्त्वे एकमेकांना धरून आहेत. म्हणूनच वृक्षवल्लींना जपायचे बरं का! कारण वृक्षवल्ली तुमचे अन्न-वस्त्र-निवारा व औषधी आहेत. तर फुले सुंगध देतात आणि फळांपासून उर्जा, शक्ती मिळते. निसर्ग भरभरून देत आहे. म्हणून तुम्ही त्याबदल्यात अशी वृक्ष-तोड करू नका. वृक्षव्रीक्ष तोडू नका तर ते जोडा. ऋषीमुनींनी सांगितलेल्या व्रत वैकल्यांच्या शास्त्रीयदृष्ट्या विचार करा. त्यातले विज्ञान ओळखा. जाता-जाता एवढेच सांगते अंजू श्रद्धा असावी पण ती डोळस असावी. सांग तुझ्या आईला मी दिलेला संदेश... अगदी आठवणीनं!

अंजू बाळा ... उठ ना गं केव्हाची उठवतीयं.. अंजू ताडकन् उठली आणि आईला म्हणाली, ‘अगं, आई आज पाच जून ना! म्हणजे पर्यावरणदिन! आणि वटपौर्णिमा आठ जूनला ना!’ त्यावर आई म्हणाली, ‘अगं याचा काय संबंध?’.. मग तिने स्वप्न सांगितले आणि म्हणाली, बघ आई, वटपौर्णिमेच्या आधीच हे स्वप्न  पडलं, ते किती किती बरं झाल किनई गं? आपण फांद्या न तोडता.. वृक्ष लावूयात आणि सृष्टीमधली ‘मैत्री’ वाढवूयात! असा संदेश साऱ्या जणींना देऊयात. हे ऐकून आई म्हणाली, खरयं गं बाळा! पिढ्यान्ंपिढ्या कधी लक्षातच आलं नाही. आता तुझ्या वयाच्या मुलं-मुलींनीच हा निसर्ग सांभाळायचा आहे. ही सृष्टी सुजलाम् सुफलाम् व्हायला तुमचा खारीचा वाटा मोलाचा ठरणार आहे. आम्ही पण तुम्हाला साथ देणार आहोत. ह्याचं संदेशाची पूजा करायला मी सोसायटीतल्या साऱ्या जणींना सांगणार आहे. आणि whatsapp चा चांगला उपयोग हा संदेश सर्व ग्रुपवर पोहचवण्यासाठी करणार आहे. चला तर वाचवू या झाडंन् झाडं फांदी न् फांदी... आणि राखू पर्यावरण!

सुजाता आ. लेले

[email protected]