खारफुटी : एक जैव व्यवस्था
आपल्याला जंगल म्हटलं की, आठवतं ते झाड झाडोऱ्याने गच्च भरलेलं, लतावेलींनी बहरलेलं, पक्षांच्या किलबिलाटाने गजबजलेलं, वाळक्या पाल्यापाचोळ्याने अंथरलेलं, वन्यप्राण्यांच्या आवाजाने दणाणलेलं निबीड अरण्य, पण जंगल म्हटलं म्हणजे एवढच नसतं. जंगलांचे विविध प्रकार असतात. पानगळीचं जंगल, सदाहरीतवन, वर्षावन, त्यातलाच एक प्रकार म्हणजे खारफुटीचं वन किंवा खारफुटीचं जंगल. 
 
खारफुटीची जंगलं ही खरं तर प्राणवायू पुरवणारी कोठारेच म्हटली पाहिजेत. वादळवाऱ्यापासून किनाऱ्याचे संरक्षण करणाऱ्या नैसर्गिक भिंतीच जणू. 
खारफुटीची वनं  ही  नदी आणि खाडी यांच्या किनाऱ्याजवळ आढळतात. 
भारतात पश्चिम बंगाल, गुजरात, अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, ओडिसा, महाराष्ट्र, तामिळनाडू , गोवा, केरळ, कर्नाटक या ठिकाणी खारफुटीची वनं आढळतात.
 
खारफुटीची जंगलं: नैसर्गिक भिंती
कधी कॊकणात गेला असाल तर खाडीच्या किनाऱ्यावर पाण्यात बुडालेल्या झाडांचं वन तुम्ही पाहिलं असेल. यांची मुळं मुळी दिसतच नाहीत. दिसतात ते फक्त भले-थोरले बुंधे. भोवती प्रचंड चिखल आणि त्यात उगवून वर आलेली धार धार काठीसारखी मुळं. पाणी आणि क्षारांसाठी मुळांनी खरं तर जमिनीत जायला हवं, पण इथे मात्र काही मुळं उलटी मातीतून वर आलेली असतात. या मुळांच्या वर असतात लहान लहान छिद्र. आता हा उलटा प्रकार का बरं होतो, तर होतं काय की दलदलीत खोलवर गेलेल्या झाडाला आधाराबरोबरच श्वासोश्वासही करायचा असतो, त्यासाठी  ही रचना. पण म्हणून खारफुटीच्या जंगलातील सगळ्याच झाडांना अशीच मुळं असतात, असं काही नाही. काही झाडांची मुळं ही जमिनीत तिरकी घुसणारी असतात. या मुळांना कोकणात 'पाळं' म्हणतात. (पाळं-मुळं खणून काढणे हा वाक्प्रचार आठवला ना!) ही पाळं म्हणजेच आधारमुळं असतात. 
 
खारफुटी म्हणजे खरं तर आपल्या अवाढव्य शहरांची फुफ्फुसं. शहराला शुद्ध वायू पुरवणारी कोठारं. पण विस्ताराच्या नावाखाली मात्र आज त्यांची बेसुमार तोड होतेय. काहीशा बेंगरूळ दिसणाऱ्या या खारफुटीच्या वनाचं परिसंस्थेतलं महत्त्व अनन्यसाधारण आहे. वादळ, वारे, त्सुनामी यांच्याशी भक्कमपणे मुकाबला करणारी ही वनं प्राणी-पाखरांची विशेष आवडती आहेत.  
खारफुटी वृक्षांच्या मुळांच्या पसाऱ्यात मासे आपली अंडी घालतात. त्यांच्यासाठी ती जागा मोठीच सुरक्षित असते. अंगावर सुरेख नऊ रंग मिरवणारा नवरंग पक्षी तर खास इथलाच रहिवासी. याशिवाय अनेक स्थलांतरीत जीवांना मुबलक अन्न पुरवणारी, पाणथळ जागी राहाणाऱ्या तुतारी, शेरटी, पाणकोंबड्या यांचा अधिवास होणारी ही खारपुटी तर आदिमायच. 
 
नवरंग पक्षी
तिवर, मारांडी, चिपी, कांदळ यांसारखे महत्त्वाचे उपयोगी वृक्ष ही खारफुटीची देणगी. 
सागरगोट्याचा वेल याच खाजणवनात उगवतो. सागरगोट्याचं फळ हे बाळगुटीच्या सामानातला महत्त्वाचा घटक. अगदी लहानपणी आपल्या सगळ्यांना ते उगाळून पाजलं गेलेलं असतं. त्यायोगे आपलं एक जणू नातच आहे त्यांच्याशी. मेसवाक नावाचा अजून एक वृक्ष जो या खारफुटीमुळेच आपल्याला मिळाला. त्याच्या औषधी गुणांचा उपयोग करून मेसवाक याच नावाची टुथपेस्ट बनते. याशिवाय कोकणात प्रसिद्ध असलेली चिपीची फुलं. ती चिपीसुद्धा खारफुटीतच मोडते. 
तिवर, सुंदरी, कांडळ, झुंबर, केवडा अशा कितीतरी औषधी वनस्पती या खारफुटीच्या जंगलातच आढळतात. 
 
खाजणातल्या या वृक्षांची आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे यांच्या बिया झाडावरच अंकुरतात. बियांना बाणासारखं टोकदार मुळ येतं, अनकूल परिस्थिती निर्माण झाली की बाणासारखं खोल दलदलीत घुसतं आणि कालांतरांने एका मोठ्या वृक्षाचं रूप घेतं. 
 
अशी वैशिष्टय पूर्ण खारफुटी म्हणजे आपला ठेवा. तिची उपेक्षा आणि ऱ्हास  थांबवण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे. म्हणूनच आपण खारफुटी संरक्षण आणि संवर्धनासाठी कटिबद्ध  होऊ या.
 
आदिमाय खारफुटीला वाचवू या. 
 
खारफुटीला सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याने  राखीव  जंगलांचा दर्जा दिला. महाराष्ट्रातल्या मुंबई शहर आणि उपनगरे , रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे याठिकाणी खारफुटी आहेत. त्यातली सर्वात मोठी खारफुटी रायगड इथली आहे.
 
- मैत्रयी केळकर