विद्यार्थ्यांनो, नदीला घ्या जाणून, इतिहास आणि भूगोलातून.
नदी म्हणजे जीवन, नदी म्हणजे जलचरांचा अधिवास. महाराष्ट्रातील नद्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नदी ही काठावर घडणार्‍या सर्व घटनांची साक्षीदार असून काठावर वसलेल्या गावांचे जीवन असते. नदीचे जीवनातील महत्त्व, नदीची उपयुक्तता महनीय आहे. पाण्याशिवाय सजीवसृष्टी जगू शकत नाही. पृथ्वीवर पाणी आढळले म्हणूनच सजीवसृष्टी जिवंत राहू शकली. नदीकाठी संस्कृती निर्माण होण्याचेदेखील हेच कारण आहे. सिंधू नदीकाठी हडाप्पा मोहेंजोदाडोसारख्या संस्कृती अस्तित्वात आल्या, त्या तेथील पाण्याच्या उपलब्धतेमुळेच. नदी वाहत असलेल्या परिसरात माणसांच्या वस्त्या वसल्या आणि पाहता पाहता तिथे गावे तयार झाली. ही गावे, हे जनजीवन पाण्यावरच अवलंबून असते. सण व उत्सवांतून आपण नदीविषयीची कृतज्ञता व्यक्त करत असतो. अनेक देशांमध्ये नदीकाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व नदी महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. यामुळे नदीकाठच्या परिसराची माहिती मिळतेच. नदीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या उत्सवातून नदीविषयीची आपुलकी वाढत जाते. 
पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असलेल्या व प्रदूषणासारख्या गंभीर समस्येला सहन करणार्‍या नदीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नदीच्या स्वच्छतेवर पर्यावरणाचे संतुलन अवलंबून असते. परिसरातील मैला, सांडपाणी तसेच कारखान्यातील रसायनयुक्त पाणी नदीच्या पाण्यात सोडल्याने पाण्याचे प्रदूषण होते. शहरात वाहणार्‍या नद्यांचे स्वरूप नाल्यांप्रमाणे झाले आहे. प्लास्टिक, कचरा, निर्माल्य नदीच्या पाण्यात टाकल्याने पाणी दुषित होते. दुषित पाण्यामुळे अनेक प्रकारचे आजार बळावतात. नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. इतकेच नव्हे, तर त्या पाण्यात राहणार्‍या जलचरांचे अस्तित्वही धोक्यात येते. 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकत्याच तयार केलेल्या अहवालात महाराष्ट्रातील आठ नद्यांचा प्रदूषित नद्यांमध्ये समावेश केला आहे. शाळेत निबंध लेखन करताना आपण नदीचे मनोगत लिहितो. म्हणजे नदीला होणारा त्रास व त्यावरील उपायही आपल्याला माहीत आहेत. नद्यांना स्वच्छ राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. लहानपणापासूनच नदीविषयी जाणीव झाली तर प्रदूषणाच्या राक्षसाला टाळता येणे सहज शक्य आहे. 
लोकसहभागाशिवाय नदी पुनर्जिवित होऊ शकत नाही. आजकाल शाळांमधून, स्वयंसेवी संस्थांकडून पर्यावरणाविषयी जाणीवजागृती होत आहे. पर्यावरण संवर्धनाची आस असणार्‍या अनेक शाळादेखील अशा उपक्रमांना प्रतिसाद देतात. नदीविषयी जाणीवजागृती व काठावरील परिसराची माहिती हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिक्षणविवेकने एक उपक्रम आयोजित केला आहे, ‘एक सफर नदीची.’ या उपक्रमात तज्ज्ञ मंडळींकडून नदीचा इतिहास व भूगोल जाणून घेता येणार आहे. नदीकाठावरील घडामोडींचे वर्णन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. काठावरील ऐतिहासिक वास्तू पाहून त्याची माहिती मिळण्याची ही एक चांगली संधी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना मिळणार आहे. प्रत्यक्ष नदीशी संवाद साधून तिच्याविषयी माहिती घेणे हा उपक्रमाचा हेतू आहे. मग होताय ना या उपक्रमात सहभागी..... 
अगदी माफक शुल्कात आजच नावनोंदणी करा. 
 
-रुपाली सुरनिस